बौध्द धर्म हा निराशावादी निष्क्रिय धर्म होता ?  बौध्द धर्माचे विवरण करणारे असे वाटले तर म्हणोत; बौध्द धर्माच्या पुष्कळ भक्तांनी हा अर्थ काढलेला असो.  त्यातील शब्दच्छल समजण्याची माझी शक्ती नाही, आणि बौध्द धर्माची पुढे जी अती गुंतागुंतीची आध्यात्मिक वाढ झाली, तिच्यावरही मत देण्याइतका मी समर्थ नाही.  परंतु मी जेव्हा बुध्दाचा विचार करतो, तेव्हा अशी कोणतीही भावना माझ्या मनात उभी राहात नाही; आणि जो धर्म केवळ उदासीन, निष्क्रिय, निराशा सांगणारा, मुकेपणाने सारे सोसा असे उपदेशिणारा असेल त्याला कोट्यवधी लोकांच्या मनाचा ताबा कधीही फार वेळ घेता येणार नाही; आणि ह्या कोट्यवधी लोकांत कितीतरी पहिल्या प्रतीची, ईश्वरी देण्याची माणसे होती.

बुध्दावताराच्या कल्पनेला साकार करताना अनंत भक्तगणांच्या हातून शिला, संगमरवर, पंचरसी धातू या विविध प्रकारच्या मूर्ती घडल्या आहेत.  त्या पाहिल्या म्हणजे असे वाटते की, भारतीय तत्त्वज्ञानाचे सारसर्वस्व किंवा निदान त्या तत्त्वज्ञानाचे एक प्रमुख रूप या मूर्तीच्या प्रतिरूपाने आपल्यापुढे आहे.  कमलासनावर ध्यानस्थ बसलेली ती प्रशान्त, निश्चल मूर्ती पाहून असे वाटते की, वासना, विकार जिंकून बसलेली जगाच्या जंजाळात व झंझावातात अचल राहिलेली ही विभूती तूमच्या आमच्या आटोक्याबाहेर कोठेतरी दूरदूर अगम्य आहे.  पुन्हा पाहावे, निरखून पाहावे तो त्या शांत अविचल मुद्रेच्या मागे तुम्ही आम्ही जाणल्या नाहीत. अनुभवल्या नाहीत, अशा अपार भावना उत्कट आवेग आहेत असे वाटते.  त्या मिटलेल्या पापण्यांतून अंतर्ज्ञानाने सर्वांवर दृष्टी आहे असे वाटते, व सबंध मूर्ती चैतन्याने भरलेली रसरशीत दिसते.  युगानुयुगे लोटलेली आहेत पण बुध्ददेव काही लांब गेलेले वाटत नाहीत.  जीवनात विरोध आला तर कच खाऊन पळून न जाता, शांतपणे संकटांना तोंड द्या, जीवन म्हणजे विकास, उन्नती करून घेण्याची संधी समजा, हा त्यांचा संदेश ते मृदुस्वरात आपल्या कानात हळूच अजूनही सांगत आहेत.

व्यक्ति-माहात्म्य पूर्वी होते तसेच आजही आहे.  मानवजातीवर ज्यांनी अपार परिणाम केला आहे, मानवी विचारावर ज्यांनी खोल ठसा उमटविला आहे, ज्यांची कल्पना मनात आणली की एकदम प्रेरणा मिळते, ज्यांचे विचार जिवंत वाटतात, असे ते बुध्द म्हणजे एक अती महान विभूती असली पाहिजे.  बार्थ म्हणतो त्याप्रमाणे, ''बुध्द म्हणजे शांत आणि मधुर भव्यतेची निर्दोष पूर्ण प्रतिमा; प्राणिमात्राविषयी अनंत करुणा असलेली, आणि दु:खितांविषयी अपार दया दाखविणारी मूर्ती; सर्व प्रकारच्या पूर्वग्रहांपासून विमुक्त आणि संपूर्ण नैतिक स्वातंत्र्य असणारी थोर विभूती.  जे राष्ट्र अशा भव्य, दिव्य विभूतीला जन्म देते, ज्या लोकांत अशी अलौकिक मुद्रा आढळते, त्या राष्ट्राजवळ, त्या लोकांजवळ प्रज्ञेचे, अंत:सामर्थ्याचे सुप्त-गुप्त असे खोल निधी असलेच पाहिजेत हे निश्चित.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel