भारत आणि इराण
ज्या अनेक लोकसमूहांचा व मानववंशांचा हिंदी जीवनाशी व संस्कृतीशी संबंध येऊन त्या जीवनावर व संस्कृतीवर त्यांचा परिणाम झालेला आहे, त्यात इराणी लोकांचा संबंध सर्वांत जुना असून तो सारखा चालू राहिलेला होता.  खरे म्हणजे इंडो-आर्यन सुधारणांच्याही पूर्वीपासून हा संबंध होता.  कारण हिंदुस्थानात जे आर्य आले ते, आणि मूळचे इराणी हे एकाच मानववंशापासून आलेले दोन प्रवाह अलग झाले, आणि निरनिराळे वाहू लागले.  त्यांची वंशिकदृष्ट्या एक आणि धार्मिक व भाषिक दृष्ट्याही समान पार्श्वभूमी होती.  वैदिक धर्म आणि झोरोअ‍ॅस्टर धर्म यांत पुष्कळसे साम्य आहे; तसेच वैदिक संस्कृत आणि अवेस्ता ग्रंथातील जुनी पहेलवी भाषा यांतही बरीच सदृशता आहे.  पुढची संस्कृत भाषा आणि इराणातील फारसी भाषा यांचा स्वतंत्रपणे विकास झाला.  परंतु दोहोंत पुष्कळ मूळ धातू तेच सापडतात.  सर्वच आर्यभाषांत असे काही तेच मूळ धातू सापडतात.  संस्कृत आणि फारसी भाषा, तसेच दोन्ही देशांतील कला आणि संस्कृती यांच्यावर त्यांच्या त्यांच्या विशिष्ट परिस्थितीचा परिणाम झाला.  इराणी कला ही इराणी सृष्टिसौंदर्याशी, इराणी भूमीशी निगडित आहे; इराणी कलेची परंपरा त्याचमुळे हिंदुस्थानातील इंडोआर्यांच्याही बाबतीत दिसून येते.  हिंदी आर्यांची कलात्मक परंपरा, हिंदी आर्यांची ध्येये, यांचा जन्म हिमाच्छादित पर्वतांतून, विशाल वनांतून, आणि उत्तर हिंदुस्थातील विशाल सरितांतून झाला आहे.

हिंदुस्थानवर इराणचा परिणाम सारखा होत होता.  हिंदुस्थानातील अफगाण व मोगल काळात पर्शियन भाषाही सरकारी कामकाजांची दरबारी भाषा होती.  ब्रिटिश आमदानीच्या आरंभापर्यंत ही गोष्ट चालू होती.  सर्व अर्वाचीन हिंदी भाषांतून पुष्कळ पर्शियन शब्द आढळतील.  संस्कृत भाषेपासून निघालेल्या भाषांच्या बाबतीत व विशेषत: हिंदुस्थानी या संमिश्र भाषेबाबत हे असे घडणे स्वाभाविक आहे.  परंतु आश्चर्य हे की, दक्षिणेकडील अजिबात विभिन्न अशा द्राविडी भाषांवरसुध्दा पर्शियन भाषेचा परिणाम झाला आहे.  पर्शियन भाषेत पूर्वी कितीतरी उत्तम एतद्देशीय कवी होऊन गेले, आणि आजही कितीतरी हिंदू आणि मुसलमान पर्शियन भाषेतले नामांकित विद्वान आहेत.

सिंधू तीरावरील संस्कृतीचा समकालीन इराणी आणि मेसापोटेमियन संस्कृतीशी संबंध होता, याविषयी फारशी शंका नाही.  या तिन्ही संस्कृतींतील काही नमुने व मुद्रा यांच्यात कितीतरी साम्य दिसून येते.  अ‍ॅकेमियन काळापूर्वीही इराण आणि हिंदुस्थान यांच्यामध्ये संबंध होते असा पुरावा आहे.  अवेस्तात हिंदुस्थानचा उल्लेख आहे आणि उत्तर हिंदुस्थानचे थोडेसे वर्णनही आहे.  ॠग्वेदात पर्शियाचा उल्लेख आहे.  पर्शियन लोकांना पर्शव: असे संबोधण्यात आले आहे; पारसिक असाही शब्द पुढे आला आहे.  पारसिक शब्दावरूनच पारशी शब्द आला आहे.  पार्थियन लोकांना पार्थव म्हणून उल्लेखिलेले आहे.  अकेमियन घराण्यापूर्वीपासून हिंदुस्थान आणि इराण यांना एकमेकांविषयी आस्था होती.  त्यांचे परंपरागत अतिप्राचीन संबंध होते.  राजाधिराज सायरस याच्या वेळेपासून पुढील संबंधांचे अधिक पुरावे मिळू लागतात.  सायरस हिंदुस्थानच्या सीमेपर्यंत आलेला होता, तो काबूल, बलुचिस्थान येथपर्यंत तरी आलेला असावा.  ख्रि.पूर्व सहाव्या शतकात इराणचा डरायस हा सम्राट होता.  त्याच्या साम्राज्यात सरहद्दप्रान्त आणि पंजाबचा पश्चिम भागही, तसेच सिंध यांचा अंतर्भाव होता.  या काळाला कधी कधी हिंदी इतिहासातील 'झोरोआस्ट्रियन काळ' असेही म्हणण्यात येते व त्याचा परिणाम त्या वेळेस दूरवरच्या प्रदेशावरही झाला असेल.  सूर्योपासनेला चालना मिळाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel