नायक हा नेहमी सत्प्रवृत्त असा नायक असतो, खलपुरुष हा सदैव खलता दाखवीत असतो.  मानवी मनाच्या मध्यंतरीच्या नाना छटा क्वचितच दाखविल्या आहेत.

तथापि संस्कृत नाटकांतूनही अत्यंत नाट्यपूर्ण प्रसंग व प्रवेश आहेत.  त्याने प्रेक्षक तन्मय होतो.  नाटकात दाखविलेली जीवनाची पार्श्वभूमी स्वप्नातील चित्राप्रमाणे एका अर्थी खरी तर एका अर्थी असंभाव्य वाटते व ही सारी मनोहर कल्पनासृष्टी काव्यमय उत्कृष्ट भाषाशैलीत गुंफलेली असते.  असे वाटते की, भारतीय जीवन त्या काळात अधिक सुस्थिर होते, प्रशांत होते, जीवनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेली होती, मूलभूत गोष्टींचा उलगडा झाला होता.  असे खरे नसेलही परंतु असा भास होतो हे नक्की.  जीवनाचा प्रवाह शांतपणे, गंभीरपणे जात आहे असे दिसते.  सोसाट्याचे वारे, फिरती वादळे यांचा परिणाम वरवर जरासा होतो.  परंतु खाली अथांग प्रवाह शांत, धीरगंभीर वहात असतो.  ग्रीक शोकान्त नाटकातील भयंकर वादळे इकडे मुळीच नाहीत.  परंतु भारतीय नाट्यात मानवी मनाचा उत्तम आविष्कार आहे.  रचनासौंदर्य व सुसंबध्दता आहे.  सिल्व्हॉ लेव्ही म्हणतो, ''भारतीय बुध्दीने आतापर्यंत निर्माण केलेली अतिसुन्दर वस्तू म्हणजे भारतीय नाटक होय.''

आचार्य ए. बेरिएडेल कीथही म्हणतो की, ''भारतीय काव्यशक्तीची परमोच्च निर्मिती म्हणजे भारतीय नाटक होय.  भारतीय साहित्याचे निर्माते अत्यंत चिकित्सक होते; त्यांनी शेवटी साधलेले साहित्यकलेचे सर्वोत्तम रूप त्यांच्या कल्पनांचे सारसर्वस्व म्हणजेच भारतीय नाटक.''  ब्राह्मणांना या ना त्या अनेक गोष्टींत दोष देण्यात येतो, परंतु भारतीय बुध्दीचे त्यांनीच वैशिष्ट्य व स्वातंत्र्य राखिले.  त्यांनी त्यांच्या बुध्दीला पुन्हा एकवार काम करायला लावून मनावर युक्तीने परिणाम करणारा नाट्य हा साहित्यप्रकार घडवून ठेवला.

१९२४ मध्ये न्यू यॉर्क येथे शूद्रकाच्या मृच्छकटिकाचा इंग्रजी अवतार रंगभूमीवर दाखविण्यात आला.  'नेशन' पत्राचा नाट्यटीकाकार श्री. जोसेफ वुड कृच हा लिहितो, ''प्रेक्षकाला खरी शुध्द कलात्मक रंगभूमी कोठे पाहायला हवी असेल तर, ती या नाटकात मिळेल.  शुध्द कलात्मक रंगभूमीविषयी भराभर लिहिण्यात येत असते, परंतु या नुसती तात्त्विक चर्चा करणार्‍या पंडितांनी येथे येऊन बघावे आणि क्षणभर विचार करावा.  पौर्वात्यांची खरी परिणत प्रज्ञा येथे दिसेल.  ही प्रज्ञा म्हणजे एखादी सांप्रदायिक गुप्त विद्या नसून करुणा, कृपापूर्ण मनाची कोमलता आहे.  परंपरागत ख्रिश्चन धर्मातील कोमलतेपेक्षा ही कोमलता अधिक यथार्थ आणि सखोल आहे.  परंपरागत ख्रिश्चन धर्मातील कोमलता हिब्रूंच्या कठोर आणि कडव्या धार्मिकतेमुळे, न्यायनिष्ठुरतेमुळे भ्रष्ट झाली आहे.  प्रस्तुत नाटक संपूर्णपणे कृत्रिम आहे, तरीही ते अपार परिणाम करते, हृदयाला हलविते; ते यथार्थ सदृश नसून यथार्थ आहे.  या नाटकाचा कर्ता कोणीही असो.  तो चौथ्या शतकातील असो वा आठव्या शतकातील असो.  तो भला माणूस होता,  खरोखरचा शहाणा होता; त्याचा तो चांगुलपणा व शहाणपणा ओठावरचा नाही; किंवा नीतिशास्त्राच्या लेखणीतला नाही, तो हृदयातला आहे.  यौवन आणि प्रेम यांचीच नवसुंदरता असते, त्यांच्यात जो घवघवीतपणा असतो त्याचा परिणाम ग्रंथकाराच्या शांत, दान्त स्वभावावरही होतो.  त्याची प्रखर गंभीरता मृदू होते.  एका साध्या गुंतागुंतीच्या संविधानकातून मनाची माणुसकी व स्थिर सत्प्रवृत्ती यांनी भरलेले असे नाटक निर्माण करता येईल असे समजण्याइतका तो परिणतप्रज्ञ आणि प्रौढ होता.  स्थैर्य पावलेल्या संस्कृतीतच असे नाटक निर्माण होणे शक्य आहे.  समोर आलेल्या नाना संकटांतून शहाणपणाने वाट शोधून काढलेल्या संस्कृतीलाच अशा एखाद्या शांत, निरागस, निष्कपट कृतीत विश्रांती मिळते, साध्या गोष्टींवर श्रध्दा ठेवून उभी राहते.  मॅबेथ, ऑथेल्लो इत्यादी शोकान्त नाटके कितीही मोठी असली, हृदय हलविणारी असली तरी त्यांतील ते नायक रानवट वाटतात.  कारण शेक्सपिअरने वासनाविकारांचा तेथे मांडलेला प्रक्षोभ म्हणजे रानटी युगातून आलेल्या नैतिक कल्पना आणि नवीनच जागृती झालेली सुबुध्दी यांच्यातील एक झगडा आहे.  अर्वाचीन काळातील, आपल्या काळातील यथार्थवादी नाटकांतही असाच गोंधळ दिसून येतो.  परंतु जेव्हा प्रश्नांचा उलगडा झालेला असतो, जेव्हा परस्परविरोधी वासनांचा मेळ बसून बुध्दीने दिलेल्या निर्णयाला वासना मानतात, तेव्हा मग इतर प्रश्न न उरता केवळ बाह्य आकाराचाच प्रश्न उरतो.  युरोपियनांच्या आजच्या साहित्यात, प्राचीन साहित्यानंतर अलीकडे अशी संपूर्णपणे सुसंस्कृत या नाटकासारखी कलाकृती दिसून येत नाही. *''

संस्कृत भाषेतील चैतन्य आणि तिचे सातत्य

संस्कृत भाषा समृध्द, बहरलेली, नाना प्रकारच्या अंगोपांगांनी विपुल वाढ झालेली वैभवशाली भाषा असूनही पाणिनीने सव्वीसशे वर्षांपूर्वी घालून दिलेल्या चौकटीतच, काटेकोर नियम पाळून ही सारी आश्चर्यकारक श्रीमंती तिला लाभली आहे. -------------------------
*  -हा लांब उतारा श्री. आर्. एस्. पंडित यांनी मुद्राराक्षस नाटकाची प्रस्तावना लिहिली आहे तिच्यातील आहे.  मुद्राराक्षसाच्या या पंडितकृत इंग्रजी भाषांतरात ठायी ठायी अनेक मनोरंजन व उद्‍बोधक टीपा, टिप्पणी आहेत.  सिल्व्हॉ लेव्हींचे १८९० मधील 'भारतीय रंगभूमी' हे फ्रेंच भाषेतील पुस्तक आणि ए. बेरिएडेल कीथ यांचे ऑक्सफर्ड येथे १९२४ मध्ये प्रसिध्द झालेले 'संस्कृत नाटके' हे पुस्तक या दोहोंचा मी उपयोग केला आहे आणि त्यातून उतारे दिले आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel