भाषेचा पसारा वाढला, समृध्दी झाली; ती अधिक अलंकारिक, अधिक अर्थपूर्ण होत गेली.  परंतु सदैव मूळच्या धातूंना ती चिकटून राहिली.  संस्कृत वाङ्मयाच्या अवनतीच्या काळात, या भाषेची काही शक्ती कमी झाली.  साधेपणा जाऊन कृत्रिमता आली, अधिक गुंतागुंतीची होऊन मोठमोठी रूपके, उपमा यांची गर्दी उडाली.  समासाने शब्द जोडण्याची व्याकरणाने परवानगी दिली होती.  त्याचा फायदा घेऊन काही काही ग्रंथकार एकेका सामासिक शब्दांच्या ओळीच्या ओळी लिहून आपली हुषारी दाखवू लागले.

इ.सन १७८४ मध्ये सर वुईल्यम जोन्स याने लिहिले की, ''भाषा किती जुनी हा प्रश्न बाजूला ठेवला तरी एक गोष्ट खरी की, हिची रचना आश्चर्यकारक आहे.  ग्रीक भाषेहून अधिक परिपूर्ण, अधिक निर्दोष, लॅटिन भाषेहून अधिक विपुल व समृध्द आणि दोहोंहून अधिक सुसंस्कृत अशी ही भाषा आहे.  परंतु या दोन्ही भाषांशी तिचे समान धातू असण्यात साम्य आहे.  व्याकरणातीलही काही प्रकार समान आहेत.  आकस्मित योगायोग नाही.  हे साधर्म्य इतके डोळ्यांत भरण्यासारखे आहे की, कोणाही व्युत्पत्तिशास्त्रज्ञाला असे म्हणण्यावाचून गत्यंतर नाही की, या सर्व भाषा मुळात कोणत्या तरी एकाच भाषेपासून निघालेल्या असल्या पाहिजेत, आणि ती मूळची भाषा आता मृत झाली असावी.''

वुईल्यम जोन्सच्या पाठीमागून इंग्लिश, फ्रेंच, जर्मन असे अनेक युरोपियन पंडित संस्कृत भाषेचा अभ्यास करायला पुढे सरसावले.  त्यांनी तुलनात्मक व्युत्पत्तिशास्त्राचा नवा पाया घातला.  या नव्या शास्त्रात जर्मन पंडितांनी फारच आघाडी मारली व संस्कृत संशोधनाचे जास्तीत जास्त श्रेय एकोणिसाव्या शतकातील जर्मन पंडितांनाच दिले पाहिजे.  जवळजवळ प्रत्येक जर्मन विद्यापीठात संस्कृतचे अध्ययन सुरू झाले व एक दोन आचार्य त्यासाठी असत.  हिंदुस्थानातील संस्कृतचे अध्ययन खोल आणि भरपूर असले तरी ते परंपरागत पध्दतीचे होते.  त्यात टीकात्मक, विवेचनात्मक दृष्टी नसे.  तसेच हिंदी शास्त्री-पंडितांना लॅटिन, ग्रीक इत्यादी प्राचीन परदेशी भाषांचा क्वचितच परिचय असे.  फक्त अरेबिक, पर्शियन या भाषा त्यांना थोड्याफार अवगत असत.  परंतु युरोपियनांच्या प्रेरणेने व स्फूर्तीने भारतातही नवीन पांडित्य निर्माण झाले व हिंदी विद्यार्थी युरोपात विशेषत: जर्मनीत तौलनिक अभ्यासाची नवीन चिकित्सक पध्दती शिकण्यासाठी जाऊ लागले.  युरोपियनांपेक्षा हिंदी पंडितांना काही गोष्टी अधिक अनुकूल असत तर काही गोष्टी प्रतिकूल होत्या.  पक्षातीत टीका करण्याच्या बाबतीत पूर्वग्रह, परंपरागत आलेल्या कल्पना व रूढी या आड येत.  म्हणून संशोधन करताना प्रतिकूलता निर्माण होई.  परंतु त्याचबरोबर लेखनातील अर्थाच्या गाभ्याला हात घालण्याची अधिक शक्ती आणि पात्रता हिंदी पंडितांजवळ असे.  ज्या परिस्थितीत ते लिखाण झाले त्या परिस्थितीचे चित्र ते अधिक स्पष्टपणे कल्पू शकत.  प्राचीन वाङ्मयाशी ते वृत्तीने अधिक एकरूप होऊ शकत, ही संशोधनाच्या दृष्टीने अनुकूलता होती.

भाषेचे व्याकरण व व्युत्पत्ती याखेरीजचा भाषेचा उरलेला व्याप फार मोठा असतो.  त्या त्या मानवंशाच्या संस्कृतीचे, प्रतिभेचे काव्यमय असे अधिकृत प्रमाण, त्या त्या मानवजातीला आकार देणार्‍या कल्पनांचे आणि विचारांचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे भाषा.  शब्दांचे अर्थ त्या त्या युगानुसार बदलत जातात व जुन्या कल्पना, जुने विचार यांचे नव्यांत स्थित्यंतर होताना बाह्य आकार, बाह्य वेष तोच राहिला तरी आतील अर्थाचे स्वरूप बदलते.  एखाद्या प्राचीन शब्दाचा, वचनाचा साधा अर्थसुध्दा पटकर समजणे कठीण, त्यातले मर्म लक्षात येणे तर दूरच राहिले.  प्राचीन काळी ज्यांनी ती भाषा वापरली, त्यांच्या अंतरंगात जर आपणांस शिरायचे असेल, त्या शब्दांच्या अर्थात जरी डोकवायचे असेल तरी आपणांस एक प्रकारची काव्यमय व सहानुभूतिमय अशी भावनात्मक दृष्टी ठेवूनच चालले पाहिजे.  भाषा ज्या मानाने अधिक विपुल व वैभवशाली त्या मनानाने तिच्या शब्दांतील अर्थछटा समजणे अधिक कठीण.  जगातील इतर ग्रीक. लॅटिन इत्यादी प्राचीन भाषांप्रमाणे, संस्कृत भाषाही अशी आहे की तिच्यातील शेकडो शब्दांत काव्यमय सौंदर्यच केवळ नव्हे तर खोल अर्थसूचकताही आहे; अनेक शब्दांभोवती शेकडो कल्पनांची गुंफण आहे.  दृष्टीने व वृत्तीने विजातीय असलेल्या परभाषेत असे शब्द अनुवादणे सुतराम् अशक्य असते.  संस्कृत भाषेचे व्याकरण, तिचे तत्त्वज्ञान यातही प्रबळ काव्यात्मकता आहे; संस्कृत भाषेचा एक जुना कोश काव्यस्वरूपात आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel