बोलली जात नाही या अर्थाने किती वर्षांपासून संस्कृत ही मृत भाषा झालेली आहे हे मला माहीत नाही.  कालिदासाच्या काळातही ती जनतेची भाषा नव्हती, फक्त हिंदुस्थानभरच्या सुशिक्षितांची ती राष्ट्रभाषा होती.  सुशिक्षितांची सामान्य भाषा या नात्याने ती सर्वत्र पसरून मध्यआशिया आणि आग्नेय आशियातील वसाहती यांतही ती गेली.  इसवी सनाच्या सातव्या शतकात कांबोडियात संस्कृत काव्ये पाठ केली जात, संस्कृत नाटके केली जात असे उल्लेख आहेत. सयामातील थायलंड भागात अद्यापिही नाना धार्मिक विधींत संस्कृत भाषेचा उपयोग केला जातो.  हिंदुस्थानात तर संस्कृत भाषेने दाखविलेला जिवंतपणा अपूर्व आहे.  तेराव्या शतकात अफगाण राजे दिल्लीच्या तख्तावर बसले आणि पार्शियन ही हिंदुस्थानच्या बहुतेक भागांत राजभाषा होऊन पुष्कळ पंडित लोक संस्कृतपेक्षा पर्शियन भाषेला अधिक महत्त्व देऊ लागले.  याच सुमारास अर्वाचीन प्रांतभाषाही पुढे सरसावल्या आणि सारस्तते निर्मू लागल्या.  तरीही संस्कृत भाषेने त्यांच्यात टिकाव धरला, तिच्यातील गुणवत्ता कमी झाली तरी टिकाव धरला.  त्रिवेंद्रममध्ये १९३७ मध्ये प्राच्यविद्यापरिषद भरली होती.  डॉ. एफ. एफ. थॉमस हे तेथे अध्यक्ष होते.  ते म्हणाले की, संस्कृत भाषा म्हणजे राष्ट्र एकजीव करणारी मोठी शक्ती होती व हल्लीही त्या भाषेचा सर्वत्र खूप उपयोग होतो.  संस्कृतची एक साधी भाषा तयार करावी, काही धातू आणि मूलभूत शब्द यांवर ती उभारून तीच हिंदुस्थानची राष्ट्रभाषा करावी, अशी सुध्दा त्यांनी सूचना केली.  मॅक्समुल्लरच्या भाषणातील एक उतारा आपण सहमत आहोत असे सांगून त्यांनी वाचून दाखविला.  मॅक्समुल्लर म्हणतो, ''भारतातील वर्तमानमाळ आणि भूतकाळ यांत अशी काही एक अखंड आश्चर्यकारक परंपरा आहे की, पुन: पुन्हा सामाजिक उत्पात झाले, धार्मिक सुधारणा झाल्या, परकीयांच्या स्वार्‍या आल्या, तरीही या सर्व विशाल देशभर अद्याप जर कोणती भाषा बोलली जात असेल तर ती संस्कृत.  इंग्रजी सत्ता व इंग्रजी शिक्षण आज तेथे शंभर वर्षे आहे.  तथापि दांतेच्या काळात युरोपात लॅटिन भाषा जितक्यांना समजे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोकांना हिंदुस्थानात अद्यापही संस्कृत समजते.''

दांतेच्या काळात कितीतरी लोकांना युरोपात लॅटिन समजे, किंवा आज हिंदुस्थानात किती जणांना संस्कृत समजते हे मला आकडेवार माहीत नाही.  परंतु संस्कृत समजणार्‍यांची संख्या अद्यापही मोठी विशेषत: दक्षिण हिंदुस्थानात आहे.  हिंदी, गुजराथी, मराठी, बंगाली इत्यादी संस्कृतोद्भव भाषांपैकी एकीचेही ज्याला नीट ज्ञान असेल, त्याला सोपे बोललेले संस्कृत समजायला कठीण नाही.  आजकालच्या उर्दूतही शेकडा ८० शब्द संस्कृतोद्भव आहेत.  उर्दू ही इंडो-आर्यनच भाषा आहे.  एखादा शब्द संस्कृतातून आला की पर्शियन भाषेतून आला हे सांगणे कठीण जाते.  कारण दोन्ही भाषांतील मूळचे धातू पुष्कळसे तेच आहेत,  आणि आश्चर्य हे की दक्षिणेकडील द्राविडी भाषा या संपूर्णपणे स्वतंत्र असूनही त्यांनी इतके संस्कृत शब्द आपलेसे केले आहेत की, जवळजवळ निम्मे शब्द संस्कृत आहेत असे म्हटले तरी चालेल.

नाना विषयांवर संस्कृतमध्ये ग्रंथरचना, नाटकेसुध्दा मध्ययुगापासून तो आतापर्यंत सुरूच आहेत.  नवीन संस्कृत पुस्तके सारखी, वेळोवेळी अजूनही प्रसिध्द होत आहेत.  संस्कृत भाषेतील मासिकेही सुरू आहेत.  त्यांचा दर्जा सामान्य असतो.  त्यामुळे वाङ्मयात मोलाची भर पडत नसते हे खरे.  पण आश्चर्य हे की, अद्यापही संस्कृत भाषेची मनावर पकड आहे.  कधी कधी सभा-परिषदांतून आजही संस्कृत भाषेत व्याख्याने दिली जातात; संस्कृतातून चर्चा चालतात; अर्थात अशा परिषदांतील श्रोतृवर्गही वेचकच असतो.

संस्कृत भाषेचा अखंड उपयोग सुरू असल्याने प्राकृत अर्वाचीन भाषांची वाढ व्हावी तशी होण्याला अडचण आली.  सुशिक्षित बुध्दिमान लोक या लोकभाषांकडे तुच्छतेने पाहात व विद्वत्ता प्रकट करायला, प्रतिभासंपन्न काही लिहायला ही लोकभाषा निरुपयोगी असे मानून ते संस्कृतमध्ये तरी लिहीत किंवा पुढे पर्शियनमध्ये लिहू लागले.  लोकभाषांची अशी उपेक्षाच झाली.  तरी अशा अडचणीतून हळूहळू अनेक शतके धडपडून प्रांतिक भाषांनी वर डोके काढलेच; आणि त्यांनी स्वत:चे वाङ्मयप्रकार, स्वत:ची सारस्वते उभी केली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel