आजच्या थायलंडमध्ये जेव्हा सरकारी कामकाजासंबंधीचे, तसेच विज्ञानशास्त्रातले नवे पारिभाषिक शब्द बनविण्याची जरुरी भासली तेव्हा त्यांनी संस्कृतचे साहाय्य घेऊन अनेक शब्द तयार केले हे विशेष आहे.

प्राचीन भारतीय लोक ध्वनीला, नादाला फार महत्त्व देत.  त्यामुळे लिखाण गद्य असो की पद्य असो; त्यात एक प्रकारची नादमधुरता, संगीत आहे.  शब्दोच्चार नीट व्हावेत म्हणून फार काळजी घेण्यात येई.  त्यासाठी कितीतरी नियम वगैरे करण्यात आले होते.  प्राचीन काळी शिक्षण तोंडी असल्यामुळे या गोष्टीला अधिकच प्राधान्य आले.  ग्रंथच्या ग्रंथ मुखोद्गत केले जाऊन असे मुखोद्गत ग्रंथ पिढ्यान् पिढ्या याच तर्‍हेने चालत.  शब्दांच्या ध्वनीकडे जास्त लक्ष पुरविले जाई, त्यामुळे पुढे ध्वनी व अर्थ यांचे संयोगीकरण करण्याचे प्रयत्न होऊ लागले व या प्रयत्नात केव्हा नादमधुर, हृदयंगम प्रकार निघत तर केव्हा कृत्रिम अर्धे कच्चे नीरस प्रकार निघत.  यासंबंधी ई. एच. जॅन्स्टोन लिहितो, ''हिंदुस्थानातील थोर थोर कवींना ध्वनीतील फरकांचे फार सूक्ष्म ज्ञान आहे.  जगातील इतर वाङ्मयातून असे ध्वनींचे नाना प्रकार क्वचितच आढळतात.  शब्दांनी अशी काही सुंदर व सुकुमार गुंफण हे संस्कृत कवी करतात की अखंड आनंद निर्माण होतो.  मात्र काही काही कवींना ध्वनी व अर्थ यांचा मेळ घालताना मार्मिकपणाचे भान सुटले व त्यांनी ठरविले व्यंजने किंवा एखादे एकच व्यंजन वापरलेले रटाळ काव्य काढण्याचे घोर अत्याचार चालविले.'' *

आजही वेदपठण करताना जे उच्चार केले जातात ते प्राचीन काळी घालून ठेवलेल्या काटेकोर नियमानुसारच केले जातात.  आजच्या हिंदी भाषा या संस्कृतोद्भव  आहेत; त्यांना इंडो-आर्यन भाषा असे म्हणतात.  हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराथी, मराठी, उरिया, आसामी, राजस्थानी (हिंदीचाच एक पर्याय), सिंधी, पुश्तू आणि काश्मिरी या सार्‍या इंडो-आर्यन भाषा आहेत.  तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम् या द्राविडी भाषा आहेत.  या पंधरा भाषांनी मिळून सारे हिंदुस्थान व्यापले आहे.  परंतु हिंदी (आणि तिचाच एक पर्याय म्हणजे उर्दू) भाषा जास्तीत जास्त बोलली जाते, आणि ज्यांना बोलता येत नाही त्यांनासुध्दा निदान समजते. या भाषांशिवाय काही प्रादेशिक भाषा आहेत.  डोंगर-पहाडातून राहणार्‍या लोकांच्या भाषा आहेत व त्या बोलण्यापुरत्या आहेत.  त्यांचा काहीही विकास झालेला नाही.  परंतु हिंदुस्थानात पाचशेहून अधिक भाषा आहेत असे जे म्हटले जाते ते खरे नाही.  व्युत्पत्तिशास्त्रज्ञांचा, खानेसुमारी करणार्‍यांचा तो एक भ्रम आहे.  एकाच भाषेतील बोली जरा बदलली की त्यांना निराळी भाषा वाटते.  आसाम, बंगाल व ब्रह्मदेश यांच्या सीमेवरील प्रत्येक डोंगर-पहाडावरील किरकोळ हजार-पाचशे लोकांची वेगवेगळी बोली म्हणजे जणू स्वतंत्र भाषा असे ते धरतात.  या ज्या शेकडो भाषा
--------------------------
* ई. एच. जॉन्स्टोनकृत 'अश्वघोषाच्या बुध्दचरिताच्या भाषान्तरातून' (लाहोर १९३६).

खानेसुमारी करणारे भाषाशास्त्रज्ञ बळेच काढतात, त्या बहुतेक हिंदुस्थानच्या पूर्वभागातील, विशेषत: हिंदुस्थान व ब्रह्मदेश यांच्या सीमाप्रांतात आहेत.  खानेसुमारी करणारांचे जे शास्त्र आहे, त्याचप्रमाणे युरोपातही शेकडो भाषा आहेत, आणि एका जर्मनीतच साठ आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel