व्याख्या केली आहे.  ''आपली सारी अंतर्गत मूलतत्त्वे, क्रिया, शक्ती सारे अंतर्गत संमिश्र प्रकार यांचे पृथक्करण करता येते, ती वितळवता येतात; त्यांचे नवे संमिश्र प्रकार करून अशक्य वाटलेल्या अपूर्व प्रकारे त्याचा उपयोग करून घेता येतो; किंवा काही ठरीव अंतर्गत क्रिया पध्दती वापरून त्यांचे रुपान्तर करता येऊन त्यांची सर्वांची वेगळी नवी घटना घडविता येते; या सिध्दान्ताचे ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यांवर राजयोग अधिष्ठित आहे.''

यानंतरचे दर्शन म्हणजे मीमांसा.  मीमांसेचा यज्ञयागाशी, कर्मकांडाशी संबंध आहे, व मीमांसाशास्त्राचा कल सगुण देवदेवता मानण्याकडे आहे.  अर्वाचीन बहुजनसमाजाच्या हिंदुधर्मावर तसेच हिंदू कायद्यावर मीमांसाशास्त्राचा पुष्कळ परिणाम झालेला आहे.  मीमांसा शास्त्राने सम्यक जीवनाचे, सदाचाराचे नियमधर्म म्हणून सांगितले आहेत.  लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की हिंदूंचे देव जगावेगळे आहेत.  कारण ते तेजाने देदीप्यमान म्हणून ' देव ' संज्ञा पावलेले.  देव जरी विशिष्ट शक्तींनी संपन्न असले तरी सृष्टिक्रमात मानवाहून ते खालच्या पायरीवरचे मानलेले आहेत.  हिंदू आणि बौध्दधर्मी यांचेही आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील मनुष्यजन्म हा परमश्रेष्ठ जन्म, ही शेवटची वरची पायरी असे मानतात.  देवांना हा आत्मसाक्षात्कार, हा मोक्ष मिळवायचा असेल तर त्यांनासुध्दा तो मिळवायचा अखेर मानवजन्म घेऊनच.  म्हणजे असे की, हिंदुधर्मातही देवदेवतांबद्दलची कल्पना अनेक देवदेवता मानलेल्या इतर धर्मांहून अगदी वेगळी आहे.  बौध्दधर्मीयांचे म्हणणे असे की फक्त मानवच बुध्दत्वाप्रत, शेवटच्या निर्वाणाप्रत जाऊ शकतो.

आणि आता शेवटचे सहावे दर्शन म्हणजे वेदान्त.  हे उपनिषदांतून निघाले.  हळूहळू या शास्त्राची वाढ होता होता नाना रूप, नाना आकार येत गेले; परंतु विश्वासंबंधाचे अद्वैत तत्त्वज्ञान सदैव मुळाशी होते.  सांख्यांची पुरुष व प्रकृती ही दोन मूलतत्त्व वेगळी नसून ती दोन्ही तत्त्वे म्हणजे मूळच्या एका शाश्वत सत्याची ब्रह्म याचीच संकुचित रूपे मानलेली आहेत.  आरंभीचा हा वेदान्त घेऊन शंकराचार्यांनी अद्वैत वेदान्ताचा सिध्दान्त स्थापन केला.  आजच्या हिंदुधर्मातील प्रमुख तत्त्वज्ञानात्मक दृष्टी अद्वैताची आहे.

हे तत्त्वज्ञान केवळ अद्वैतावर उभारलेले आहे.  आध्यात्मिक दृष्ट्या आत्मा, परमात्मा हेच शाश्वत अंतिम सत्त्व आहे व हे ब्रह्म स्वतंत्र, आत्मनिष्ठ मानलेले आहे व त्याखेरीज बाकीचे सारे जगत वस्तुनिष्ठ मानलेले आहे.  हा परमात्मा सर्वव्यापी कसा आहे, एकच असता अनेकरूप कसा होतो, आणि असे होऊनही त्याची संपूर्णता कशी राहिली, कारण आत्मा अविभाज्य आहे इत्यादी गोष्टींचा तार्किक बुध्दिवादाने उलगडा होणे अशक्य आहे.  कारण आपली मनोबुध्दी सान्त जगाने मर्यादित आहे.  उपनिषदांनी आत्म्याचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे.  (अर्थात हे वर्णन असेल तर) ''ते पूर्ण आहे हे पूर्ण आहे; पूर्णातून पूर्ण प्रकटते, पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच उरते.''

शंकराचार्यांनी ज्ञान कसे होते याचा सूक्ष्म व गुंतागुंतीचा सिध्दान्त मांडला आहे.  काही गोष्टी गृहीत धरून हळूहळू न्यायतर्कांच्या खंडनमंडन पध्दतीने पायरी चढत चढत शेवटी त्यांनी अद्वैताची स्थापना केली आहे.  जीव म्हणजे समर्याद, सोपाधिक झालेला परमात्मा आकाश सर्वव्यापी असून घटाकाश, मठाकाश, आपण म्हणतो त्याप्रमाणे आत्मा सर्वव्यापी असूनही जीवरूपाने पृथक भासतो.  व्यवहारासाठी आपण जीव वेगवेगळे मानावे परंतु हा फरक वरवरचा आहे.  तो खरा नव्हे.  जीवाचे शिवाशी, व्यक्तीचे परमात्म्याशी संपूर्ण ऐक्य अनुभवणे म्हणजेच स्वातंत्र्य, मोक्ष.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel