सोळाव्या शतकातील एका प्रसिध्द चिनी कादंबरीचे नाव 'माकड' असे आहे.  वू-चेन-एन या कादंबरीचा कर्ता.  (आर्थर वॅले याने हिचे इंग्रजीत भाषांतर केले आहे.)  ह्युएनत्संगच्या भारताकडच्या प्रवासाचे काल्पनिक वर्णन, नाना दंतकथा, अद्‍भुत संकटे या सर्वांचे मिश्रण करून या कादंबरीत दिले आहे.  ग्रंथाच्या शेवटी ''बौध्दांच्या पवित्र भूमीला हे पुस्तक मी अर्पण करतो.  तेथील गुरू व आश्रयदाते यांनी जी कृपा केली त्याची अल्पशी फेड या अर्पणाने होवो.  जे भ्रमात पडले आहेत, ज्यांना यमयातना भोगाव्या लागत आहेत,  त्या सर्वांचे दु:ख कमी होवो, त्यांच्या हालअपेष्टा संपोत....'' अशा प्रकारची अर्पणपत्रिका आहे.
-----------------------
*  चिनी नवयुगाच्या चळवळीचा पुरस्कर्ता आचार्य हू-शीह याने 'चीनचे हिंदीकरणे' म्हणून जुन्या संबंधावर एक पुस्तक लिहिले आहे.

कैक शतके चीन व हिंदुस्थानचा संबंध पार तुटलेला होता.  त्यानंतर दैवाच्या विचित्र फेर्‍यात दोन्ही देश ईस्ट इंडिया कंपनीच्या तडाक्यात सापडले.  हिंदुस्थानला फर वर्षे हे दु:ख सोसावे लागले.  चीनचा या कंपनीशी संबंध अगदी थोडा आला तरी अफू आणि अफूची युध्दे झालीच.

आता नशिबाचा फेरा पुरा होऊन; चीन आणि हिंदुस्थान पुन्हा एकमेकांकडे पाहू लागले आहेत व गतकाळातील शेकडो स्मृती त्यांच्या मनात गर्दी करीत आहेत; नवीन काळातील नवीन यात्रेकरू या देशांच्यामध्ये आडवे पडलेले पर्वत ओलांडून किंवा विमानाने खाली घालून एकमेकांना धीर देता देता नवे वळण पाडीत आहेत व दोन्ही देशांमध्ये नवे संबंध जोडून अखंड स्नेह वाढवीत आहेत.

भारतीय वसाहती आणि आग्नेय आशियातील संस्कृती

हिंदुस्थान-भारतवर्ष म्हणजे खरोखर काय हे कळण्याकरता, त्याच्याशी तद्रूप, तन्मय होण्याकरता त्या देशाची हल्लीची दुर्दशा, आजकालचा संकुचितपणा व भोवतालची भयानक परिस्थिती क्षणभर दृष्टिआड करून, विसरून जाऊन फार प्राचीन कालात व दूरदूरच्या खंडातील प्रदेशांत यात्रा केली पाहिजे.  हा देश कसा होता व त्याने कायकाय केले त्याचे ओझरते दर्शन घेतले पाहिजे.  रवीन्द्रनाथ लिहितात, ''माझ्या देशाचे खरे स्वरूप समजून घ्यायला अशा काळात गेले पाहिजे की ज्या वेळेस स्वत:च्या आत्म्याचा भारताला साक्षात्कार झाल्यामुळे आपल्या पार्थिव देहाची सीमा ओलांडून भारत दूरवर जात होता; ज्या वेळेस सारे पूर्वेकडील क्षितिज भारताच्या मनाच्या मोठेपणाच्या तेजाने उजळून त्या प्रकाशाने परद्वीपाच्या तीरावरच्या लोकांशी जीवनजागृतीचा चमत्कार अनुभवला व हे तेजोमय भारतबिंब आपले आहे अशी त्यांना खूण पटली.  अज्ञातवासाच्या कोंदट कोपर्‍यात अंग चोरून बसलेल्या, एकलकोंडेपणाच्या गर्वात गढून गेलेल्या, तेज लोपलेल्या भूतकाळाच्या वैभवाचे अर्थशून्य पाठ बडबडताना भविष्यकाळाच्या यात्रेला निघालेल्या प्रवाशांना कोणताही महत्त्वाचा निरोप सांगायची शक्ती उरली नाही इतके बुध्दीचे दारिद्र्य आलेल्या अशा या हल्लीच्या भारताला पाहून त्याचे खरे रूप दिसणार नाही.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel