काळानेच नुसते मागे जाऊन चालणार नाही, तर प्रवाहही अवश्य आहे.  तो शरीराने करता आला नाही तर मनाने तरी ज्या ज्या देशात अनेक स्वरूपात पूर्वी भारत पसरून, त्या देशांवर त्याने आपल्या वृत्तीचा, आपल्या सामर्थ्याचा, आपल्या सौंदर्यप्रीतीचा अमर ठसा ठेवला आहे, त्या देशांतून केला पाहिजे. भूतकाळात आपल्या देशाने ह्या इतर देशांत केलेल्या कार्याचा व साधलेल्या यशाचा प्रचंड व्याप आपल्या फारच थोड्या लोकांनी वाचला आहे.  हा आपला देश जसा तत्त्वज्ञान व विचारांच्या विषयात थोर होता तसाच प्रत्यक्ष कृतीतही महापराक्रमी होता, हे सत्य फारच क्वचित आपल्या लोकांना उमगले आहे.  भारतातील नर-नारींनी स्वत:च्या मायभूमीतून द्वीपांतरी जाऊन जो इतिहास निर्माण केला तो अद्याप लिहिला जायचा आहे.  बहुतेक पश्चिमात्य अद्यापही समजून चालतात की, प्राचीन इतिहास जो काही घडला तो बहुतेक भूमध्यसमुद्राच्या भोवती घडला आणि सारा मध्यकालीन आणि अर्वाचीन इतिहास त्या लहान परंतु भांडकुदळ युरोपखंडातल्या घडामोडींत सामावला आहे.  आणि अजूनही पुढचे भविष्यकाळचे बेत करताना त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त युरोपच असतो, बाकी सारी दुनिया कशीतरी कोठेतरी राहिली तरच विचारात घेण्याच्या लायकीची.

सर चार्ल्स इलियट लिहितो, ''हिंदुस्थानचे जगाच्या इतिहासात जे स्थान आहे त्याबाबतीत युरोपियन इतिहासकारांनी बेपर्वाई दाखविली आहे.  हिंदुस्थानवर स्वार्‍या करणार्‍यांचे, त्यांच्या पराक्रमाचे ते पोवाडे गातात आणि समुद्र व पर्वतांनी आजूबाजूंनी वेढल्यामुळे एका कोपर्‍यात पडून पृथ्वीवरच्या इतर मनुष्यजातीतून अलग झालेल्या दुबळ्या व स्वप्नाळू लोकांचा देश आहे असा भास निर्माण करतात. परंतु भारतीयांनी ज्ञानविज्ञानात घातलेली भर ते लक्षात घेत नाहीत.  भारतीयांनी मिळविलेले राजकीय विजयही कमी महत्त्वाचे नाहीत.  त्यांनी जिंकून ताब्यात घेतलेला मुलूख जरी थोडा दिसला तरी त्या मुलुखामधले प्रचंड अंतर डोळ्यांत भरते.  परंतु भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रसाराचा विस्तार लक्षात घेतला तर त्याच्यापुढे लष्करी किंवा व्यापाराच्या रूपाने केलेल्या स्वार्‍या क:पदार्थ आहेत.''*

इलियटने ज्या वेळेस लिहिले, त्या वेळेस आग्नेय आशियातील ज्या अर्वाचीन शोधांमुळे हिंदुस्थान आणि आशिया यांच्या भूतकालीन कल्पनेच्या स्थितीत आमूलाग्र फरक पडलेला आहे त्या शोधांची इलियटला माहिती नसावी. त्या शोधांचे इलियटला ज्ञान असते तर जो मुद्दा तो मांडीत होता, त्याला अधिकच बळकटी आली असती आणि त्याला दाखवून देता आले असते की वैचारिक नव्हे प्रादेशिक विजयही क्षुद्र नसून अती महत्त्वाचे आणि व्यापक
---------------------
*  इलियट : 'हिंदुधर्म आणि बौध्दधर्म,' भाग १ ला (पृष्ठ १२ : प्रस्तावना)
होते.  पंधरा वर्षांपूर्वी मी प्रथम आग्नेय आशियाचा सविस्तर असा एक इतिहासग्रंथ वाचला.  तो वाचताना मला वाटलेले आश्चर्य व मनाची खळबळ मला अजून आठवते.  नवेनवे दूरवरचे देखावे माझ्या डोळ्यांसमोर उलगडत लांबलांब पसरत चालले, इतिहासाची मांडणी नवीनवी होत चालली, भारताच्या गतेतिहासाचे नवे चित्र माझ्या अंतश्चक्षूं पुढे उभे ठाकले व माझ्या सार्‍या जुन्या कल्पना व जुनी विचारांची तर्‍हा मला झालेल्या या नव्या दर्शनाला जुळेल अशी नीटनेटकी करावी लागली.  अकस्मात जणू शून्यातून माझ्यासमोर चंपा, काम्बोडिया, अंग्कोर, श्रीविजय, मजपहित इत्यादी स्थाने भव्यपणे उभी राहून सजीव साकार झाली व ज्या भावनांमुळे मनुष्य भूतकालाचा वर्तमानाशी संबंध जोडून भूतकाल सजीव करतो त्या भावना माझ्या मनात उचंबळून ती स्थाने जणू थरथरत आहेत असे मला वाटले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel