ब्रिटिश संग्रहालयात आणखीही एक नटराज शिवाचा पुतळा आहे.  त्याशिवाय एप्स्टिनने लिहिले आहे की, शिवाचे तांडवनृत्य चालले आहे.  त्या नृत्याच्या विलंबित लयीत कालाच्या विशाल विस्तारांचे खंड गुंफले जात आहेत, त्या अंगविक्षेपात मोहिनी मंत्राची कठोर अविचल शक्ती आहे असा भास होतो.  ब्रिटिश म्युझियम (संग्रहालय)-मध्ये एका ठिकाणी एक लहानसा मूर्तिसंग्रह मांडलेला आहे.  त्यात 'प्रेमाचे पर्यवसान मृत्यूत' ह्या मूळ कल्पनेची घटना अत्यंत शोकमय तात्पर्यरूपाने आली आहे.  मनोविकाराला जडलेले अटळ, अदृष्ट इतके थोडक्यात दाखविले आहे की त्याला दुसर्‍या कोठच्याची कलाकृतीत तोड सापडणार नाही.  कलेचे हे गंभीर व परमोदात्त नमुने पाहिले म्हणजे आपली युरोपातील कलेची रूपके नीरस, अर्थहीन वाटू लागतात.  या शिल्पांत सांकेतिक साजशृंगाराच्या अवांतर गोष्टींना फाटा देण्यात आला आहे.  जे महत्त्वाचे आहे, ज्याला खरोखर आकार द्यायला पाहिजे त्यावरच सारे लक्ष ठेवलेले आहे. *

जावातील बोरोबुदूर येथील बोधिसत्त्वाचे शिरकमळ कोपनहेगन येथील 'ग्लिप्टोटेक' येथील संग्रहालयात आहे.  बाह्य सौंदर्याच्या दृष्टीने, आकारसौंदर्याच्या दृष्टीनेही ते सुंदर आहेत, परंतु हॅव्हेल म्हणतो त्याप्रमाणे त्यात काहीतरी अधिक आहे.  आरशात प्रतिबिंब दिसावे त्याप्रमाणे बोधिसत्त्वाचा विशुध्द आत्मा त्या मुद्रेवर प्रकट होतो असे वाटते.  तो लिहितो, ''सागराच्या अथांग अंतर्यामीची शांती, निरभ्र आकाशाचे गांभीर्य, मर्त्य लोकाच्या दृष्टीपथापलीकडचे मांगल्य यांचा मृर्तिमंत साक्षात्कार या मुद्रेत येतो.''

हॅव्हेल पुढे म्हणतो, ''जावातील भारतीय कला जरी हिंदुस्थानात आली तरी तिची स्वतंत्र, वेगळी तर्‍हा आहे.  दोन्ही कलांमध्ये गंभीर शांतीची एक समान भावना आहे, ही गोष्ट खरी, परंतु जावातील दैवी आदर्श अधिक सौम्य आहे.  घारापुरी आणि मामल्लपुरम् येथील हिंदी शिल्पात जे प्रखर वैराग्यविशेष दाखविले आहे तसे वैराग्य जावा येथील शिल्पकलेतल्या देवदेवतांच्या दैवी मूर्तीत नाही.  ह्या यवद्वीप-भारतीय कलेत मानवलोकी दिसणारा मानवी संतोष, आनंद खूप आढळतो.  प्रत्यक्ष भरतखंडात राहात असताना पूर्वजांनी शतकानुशतके जी धामधूम व धडपडीचा काळा काढला तो संपून या यवद्वीपवासी वंशजांना जो निवांतपणा, जे निरामय स्वास्थ्य लाभले ते या शिल्पातील या तर्‍हेने प्रकट झालेले आहे.''**
------------------
*  एप्स्टिन : 'शिल्प असू दे', 'Let There be Sculpture', (१९४२), पृष्ठ १९३.
** हॅव्हेल : 'भारतीय कलेची ध्येये' (१९२०) पृष्ठ १६९.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel