या संबंधामुळे नवीन इस्लामी धर्माची हिंदी जनतेला माहिती होणे अपरिहार्य होते.  या नवधर्माचा प्रसार करणारेही हिंदुस्थानात आले आणि त्यांचे स्वागत करण्यात आले.  मशिदी बांधण्यात आल्या.  लोकांनी किंवा राज्यसत्तेने हरकत घेतली नाही; धार्मिक झगडेही नव्हते. सर्व धर्मांच्या बाबतीत सहिष्णू असणे, सर्व पूजाप्रकार सहानुभूतीने बघणे ही तर भारताची सनातन परंपरा.  राजकीय सत्ता म्हणून हिंदुस्थानात येण्यापूर्वी कित्येक शतके आधी इस्लाम धर्म म्हणून आला होता.

उम्मेयदे खलिफांची नवी राजधानी दमास्कस येथे होती, तेथे एक सुंदर शहर उभे राहिले.  परंतु लौकरच अब्बासी खलिफा सत्ताधीश झाले.  त्यांनी इ. सन. ७५० च्या सुमारास राजधानी बगदाद येथे आणिली.  अंतर्गत झगडे वाढले.  मध्यवर्ती साम्राज्यापासून स्पेन स्वतंत्र झाला.  हळूहळू बगदाद साम्राज्यही मोडकळीला येऊन अनेक लहानलहान राज्ये त्यातून निर्माण झाली व तिकडून, मध्य आशियातून सेल्जुक तुर्क आले.  बगदाद येथे खलिफा जरी अद्याप गादीवर होता तरी हे सेल्जुक तुर्कच तेथे खरे सत्ताधारी बनले.  खलिफा त्यांच्या हातातील बाहुले होता.  इकडे अफगाणिस्तानात गझनीचा सुलतान महंमद पुढे आला.  तो तुर्कच होता व मोठा लढवय्या आणि कुशल सेनापती होता.  खलिफाला तो क:पदार्थ मानी, टोमणेसुध्दा मारी.  तरीही तोपावेतो बगदादच संस्कृतीचे केंद्र होते.  इस्लामी संस्कृती सुधारणेचे माहेरघर म्हणून दूरचे स्पेनही स्फूर्तीसाठी बगदादकडे लक्ष ठेवी.  त्या वेळी विद्या, कला, विज्ञान, जीवनाच्या सुखसोयी यांत युरोप मागासलेले होते.  अरबी सत्तेखालच्या स्पेनने विशेषत: त्यातील कार्डोबा विद्यापीठाने बौध्दिक जिज्ञासेचा, विद्येचा दिवा तेवत ठेवला होता. युरोपात त्या वेळेस अज्ञान युग होते.  त्या अज्ञानातून, त्या युरोपीय अंधारातून स्पेनमधून आलेल्या प्रकाशाने मार्ग उजळला.

ख्रिश्चन आणि इस्लामी धर्माची (क्रूसेड्स) धर्मयुध्दे इ. सन १०९५ च्या सुमारास सुरू होऊन जवळजवळ दीडशे वर्षे चालली होती.  प्रसिध्द इतिहासकार प्रोफेसर ट्रेव्हिलियन लिहितात, ''युरोपात नवे चैतन्य येऊन पूर्व दिशेला जाण्याची जी ओढ युरोपला लागली त्या ओढीचे धार्मिक व लढाऊ रूप म्हणजे ही (क्रूसेड्स) धर्मयुध्दे.  या धर्मयुध्दांतून ख्रिश्चन राष्ट्रांचे एकीकरण जन्मले नाही किंवा पवित्र ख्रिश्चन स्थानेही कायमची स्वतंत्र करता आली नाहीत.  ज्यासाठी म्हणून युध्द सुरू करण्यात आले त्या गोष्टी तशाच राहिल्या, परंतु एक बक्षिस मात्र मिळाले. ही युध्दे करून युरोपने नवीन कलाकौशल्य, नवीन धंदे, सुखसाधने, विज्ञान, बौध्दिक जिज्ञासा हे सारे युरोपात आणले,  ही युध्दे पेटविणार्‍या त्या ख्रिश्चनधर्मी भिक्षू पीटरने या गोष्टींचा संपूर्णत: धिक्कारच केला असता.

क्रूसेड्समधील शेवटचा प्रयत्न अयशस्वी होण्यापूर्वी इकडे मध्य आशियात भूकंप होऊन प्रचंड उलथापालथ व्हावी, प्रचंड वादळ उठावे तसे काहीतरी घडले होते.  चेंगीजखानाने दिसेल ते भस्मसात करणारी आपली मोहीम पश्चिमेकडे सुरे केली होती.  इ.स. १२१९ मध्ये तो या भयंकर स्वारीवर निघाला, व सार्‍या मध्य आशियाची होळी केली, तेव्हा इ.स.११५० मध्ये जन्मलेला हा चेंगीझ काही तरणाबांड नव्हता.  बुखारा, समरकंद, हिरात, बल्ख, केवढाली एकेक शहरे, दहादहा लाखांहून अधिक एकेकाची लोकसंख्या; परंतु सर्वांची राखरांगोळी करण्यात आली.  रशियातील कीव्ह शहरात जाऊन चेंगीझ थांबला आणि परतला.  त्याच्या मार्गावर बगदाद नव्हते म्हणून ते कसेतरी वाचले.  चेंगीझ १२२७ मध्ये ७२ वर्षांचा होऊन मरण पावला.  त्याच्या पाठीमागून येणारे युरोपमध्ये अधिकच दूरवर आत घुसले आणि हु लागूने इ.स. १२५८ मध्ये बगदाद जमीनदोस्त करून कला, विद्या यांचे घर मातीत मिळविले.  पाचशे वर्षे जगातील उत्तमोत्तम वस्तू तेथे येत होत्या, सारे खजिने तेव्हा जमा झाले होते, ते सारे नष्ट झाले.  आशियातील अरबी-इराणी संस्कृतीला हा फारच मोठा धक्का बसला तरी ही संस्कृती या मोगलांच्या तडाख्यातून कशीबशी जिवानिशी सुटली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel