कोंडीत पडलेल्या हिंदी विचारसृष्टीत व अर्थव्यवस्थेत या पुन:पुन्हा होणार्‍या स्वार्‍यांनी काही नवीन गोष्टी आल्या.  सर्वांत महत्त्वाचा परिणाम म्हणजे इस्लाम धर्म म्हणजे क्रूरपणाने तरवारीच्या जोरावर विजय मिळविणारा धर्म हा अनुभव प्रथचम आला.  आतापर्यंत तीनशे वर्षे इस्लाम धर्म या नात्याने, प्रथम शांततामय मार्गाने हिंदुस्थानात येऊन नांदत होता.  हिंदुस्थानातील अनेक धर्मांत फारशी भानगड, कटकटी न करता त्याने आपले स्थान घेतले होते.  परंतु धर्म जेव्हा तरवार घेऊन आला, विजयतृष्णेने आला तेव्हा लोकांच्या मनावर फार जोराची प्रतिक्रिया झाली व मनात कडवटपणा पैदा झाला.  नवीन धर्माला कसलीच हरकत नव्हती, परंतु जबरदस्तीने लोकांच्या नेहमीच्या जीवनक्रमात, रीतीभातीत, राहणीत ढवळाढवळ करून उलटेपालटे करण्याच्या ह्या प्रकाराची लोकांना चीड आली.

हिंदुस्थानात धर्म अनेक होते; जरी हिंदुधर्माचे नाना स्वरूपांत प्रभुत्व होते तरी इतरही धर्म येथे होते हे विसरून चालणार नाही.  जैन आणि बौध्दधर्माची गोष्ट बाजूलाच ठेवा, कारण हिंदुधर्माने त्यांना बर्‍याच अंशी आत्मसात केल्यामुळे त्यांचे तेज तितके राहिले नव्हते.  परंतु येथे ख्रिश्चन आणि हिब्रू धर्मही होते.  पहिल्या ख्रिस्त शतकात हे दोन्ही धर्म बहुधा येथे आले असावेत, आणि दोघांनीही या देशात घर केले, त्यांना जागा मिळाली दक्षिण हिंदुस्थानात.  सीरियातील व नेस्टोरियन पंथी ख्रिश्चन होते, तसेच ज्यूही होते, तशीच इराणातून सातव्या शतकात आलेली झरथुष्ट्री मंडळीही येथे होती.  या सर्वांप्रमाणे हिंदुस्थानच्या पश्चिम तीरी आणि वायव्य भागात मुसलमान धर्मही नांदत होता.

महमूद जेता म्हणून आला व पंजाब नुसता त्याचा एक कडेचा भाग झाला.  परंतु जेव्हा पंजाबात त्याने आपली सत्ता दृढ करणे सुरू केले तेव्हा त्याला पूर्वीच्या पध्दतीत सौम्यपणा आणणे भाग पडले, कारण प्रांतातील लोकांची मने थोडीफार तरी त्याला जिंकून घ्यायची होती.  लोकांच्या जीवनव्यवहारात ढवळाढवळ करणे कमी झाले.  लष्करात आणि राज्यकारभारात मोठमोठ्या हुद्दयांवर हिंदूंचीही नेमणूक होऊ लागली.  महमुदाच्या काळात ह्या प्रकाराचे आरंभ दिसतात, हीच पध्दती पुढे वाढायची होती.

इ. सन १०३० मध्ये महमूद मरण पावला.  त्याच्या मरणानंतर जवळ जवळ १६० वर्षे हिंदुस्थानवर पंजाबच्या पलीकडे दुसरी स्वारी आली नाही, किंवा आक्रमण आले नाही.  नंतर शहाबुद्दीन घोरी- एक अफगाण- याने गझनी जिंकून गझनीचे साम्राज्य बुडविले.  तो लाहोरवर आणि नंतर दिल्लीवर चालून आला, परंतु दिल्लीच्या पृथ्वीराज चव्हाणाने त्याचा पुरेपूर मोड करून त्याला पिटाळून लावले.  शहाबुद्दीन माघारा गेला.  परंतु पुढच्या वर्षी पुन्हा नवे सैन्य घेऊन परत आला.  या खेपेस तो विजयी झाला आणि ११९२ साली दिल्लीच्या तख्तावर बसला.

महापराक्रमी वीर अशी पृथ्वीराजाची ख्याती आहे.  अजूनही त्याचे नाव काव्यात, पोवाड्यांत, आख्यायिकांत गाजते आहे.  प्रेमाकरता वाटेल ते धाडस करणार्‍या निधड्या छातीच्या वीरावर लोक नेहमीच खूष असतात.  कनोजच्या राजा जयचंदाची मुलगी संयुक्ता हिचे पृथ्वीराजावर आणि त्याचे तिच्यावर प्रेम होते.  पृथ्वीराजाने स्वयंवरमंडपात तिची प्रेमयाचना करण्याकरता जमलेल्या पोषाखी राजेरजवाड्यांना न जुमानता जयचंदाच्या खुद्द राजवाड्यातून संयुक्तेला पळविले.  पृथ्वीराजाने थोड्या काळापुरती नवरी मिळविली, परंतु प्रतापी राजाशी आमरण वैराची, दोन्ही बाजूंच्या शूरांतल्या शूरांच्या प्राणांची किंमत द्यावी लागली.  दिल्ली आणि मध्य हिंदुस्थान दोहोंमध्ये क्षत्रियांचे आपसांतील युध्द जुंपले.  पुष्कळच प्राणहानी झाली, आणि याच यादवीत पुढे पृथ्वीराजाला सर्वस्व गमावून, एका स्त्रीच्या प्रेमासाठी सिंहासन, स्वत:चे प्राण सर्व काही द्यावे लागले, व साम्राज्याची राजधानी दिल्ली परकीय आक्रमकांच्या हातात पडली.  परंतु पृथ्वीराजाच्या प्रेमाची ही कथा अद्यापही गायिली जाते.  तो वीरपुरुष ठरला आहे व जयचंदाला देशद्रोही समजले जाते.

दिल्ली जिंकली गेली म्हणजे सारा देश जिंकला गेला असे नाही.  दक्षिणेकडे प्रतापी चोल राजे राज्य करीत होते; दुसरीही स्वतंत्र्य राज्ये होती.  दक्षिणेकडे बर्‍याचशा भागावर पसरायला अफगाणांना आणखी दीडशे वर्षे जायची होती.  परंतु नवीन घटनेचे दिल्ली हे सूचक प्रतीक होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel