बाबरला हिंदी जीवनाची अगदी थोडी माहिती होती, व त्याच्या आसपासची प्रजा त्याला वैरी समजत असल्यामुळे त्याला कितीतरी गोष्टी कळल्या नाहीत.  परंतु त्याने आपल्या आत्मचरित्रात जो वृत्तान्त लिहून ठेवला आहे त्यावरून असे वाटते की, उत्तर हिंदुस्थान त्या वेळेस सांस्कृतिक दृष्ट्या कंगाल झाला होता.  तैमूरच्या स्वारीमुळे सर्वत्र उजाड झाले होते, त्याचाही हा परिणाम असेल.  पुष्कळसे पंडित कितीतरी कलावान व कारागीर, शिल्पी दक्षिणेकडे गेले.  परंतु हिंदी लोकांतील सर्जनशक्तीचे झरेच सुकत चालले होते, हेही खरे.  बाबर म्हणतो, ''कुशल कारागिरांची वाण नव्हती, परंतु यांत्रिक शोधबोध करायला लागणारी बुध्दी नव्हती, कुशलताही नव्हती.  तसेच जीवनातील सुखोपभोग, शिष्टाचार या बाबतींतही इराणच्या मानाने हिंदुस्थान मागेच होता.  जीवनाच्या या बाबतीत हिंदी वृत्तीला फारसे स्वारस्य वाटत नसल्यामुळे हे असे झाले, की नंतरच्या घडामोडींमुळे झाले ते मला सांगता येत नाही.  इराणी लोकांशी तुलना करता त्या काळचे हिंदी लोक या ऐषआरामाच्या शिष्टाचाराच्या बाबतीत जरा उदासीनच होते,  एवढेच कदाचित फार तर म्हणता येईल.  हिंदी लोकांनी या गोष्टीकडे पुरेसे लक्ष दिले असते तर इराणातून सारे काही त्यांना घेता आले असते.  कारण दोन्ही देशांमध्ये भरपूर दळणवळण होते.  परंतु हिंदी सांस्कृतिक जीवन ठराविक साच्याचे बनले होते.  त्याची अवनती होत होती.  त्याचाच हा सारा परिपाक असावा.

पूर्वीपासून ही हिंदी वृत्ती नव्हती.  भारताच्या र्‍हासाची ती एक निशाणी होती.  प्राचीन काळात निराळा भारत दिसतो.  वाङ्मय आणि चित्रकला यावरून तत्कालीन जीवन सुखी, विविध, समृध्द आणि राजविलासी होते असे दिसून येते.  बाबर हिंदुस्थानात आला त्या वेळेसही दक्षिणेकडे विजयानगर हे कला, समृध्दी, सुखविलास, संस्कृती यांचे माहेरघर होते असे तत्कालीन युरोपियन प्रवाशांनी नमूद केले आहे.

परंतु उत्तर हिंदुस्थानात उघड उघड सांस्कृतिक अवकळा आली होती.  सामाजिक रचना वज्रलेप झाली होती व लोकांची श्रध्दा ठराविक गोष्टींवरच पक्की बसली होती.  अशा प्रगतिविरोधी वातावरणात सामाजिक प्रयत्नांची, पुढे जाण्याची वृत्तीच नव्हती.  इस्लामच्या आगमनाने आणि हजारो विदेशी लोक येत असल्यामुळे जुन्या कल्पनांना, विचारांना धक्का बसला.  परकीयांच्या विभिन्न विचारसरणीमुळे, विभिन्न राहणीमुळे येथील सामाजिक घटनेवरही परिणाम होत होता. विदेशी सत्तेबरोबर शेकडो दु:खे, दुर्दैवे येतात, तो एक शापच असतो, परंतु एक गोष्ट चांगली होते.  जित लोक विचार करू लागतात, त्यांच्या विचाराचे क्षितिज वाढते, आपल्या कवचातून बाहेर पडून चौफेर पाहणे त्यांना भाग पडते.  आपण समजत होतो त्याहून हे जग कितीतरी मोठे आणि विविध आहे याची त्यांना जाणीव येते.  अफगाण येथे सत्ताधीश झाल्यामुळे असे परिणाम झाले आणि काही फरकही होऊ लागले.  मोगल तर अधिक सुसंस्कृत होते, अफगाणांपेक्षा त्यांचे जीवन अधिक सुधारलेले व प्रगत असे होते.  त्यांनी हिंदुस्थानात अनेक नवे नवे प्रकार आणले, जास्त फरक घडविले.  विशेषत: ज्या शिष्टाचाराबद्दल इराण प्रसिध्द होता ते सारे प्रकार त्यांनी इकडे आणले.  ते इतके की राजदरबारातील अगदी कृत्रिम व तंतोतंत नमुना करून बसविलेले दरबारी रीतिरिवाजसुध्दा इकडे आले व त्याचा अमीरउमरावांच्या राहणीवर परिणाम झाला.  दक्षिणेकडील बहामनी राज्यांचाही कालिकत बंदरामार्फत इराणशी प्रत्यक्ष संबंध असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel