अकबराने स्वत:भोवती अनेक थोरामोठ्यांची प्रभावळ गोळा केली होती.  त्या सर्वांचे अकबरावर भक्तिप्रेम होते, त्याच्या ध्येयाशी ते एकरूप होते.  फौजी आणि अबुल फझल हे दोघे प्रसिध्द बंधू, तसेच बिरबल, मानसिंग अब्दूल रहिम खानखाना इत्यादी प्रभावी माणसे अकबराभोवतीच्या मेळाव्यात होती.  सर्व धर्मांच्या लोकांचे त्याचा दरबार म्हणजे मीलनस्थान होते.  ज्याला ज्याला म्हणून काही नवीन विचार सुचे, नवीन कल्पना येई, नवीन शोध लागे त्या सर्वांना त्याच्या दरबारात जायला मुभा होती.  सर्व मतांविषयी आणि पंथांविषयीची त्याची सहिष्णुता पाहून काही अतिसनातनी मुसलमानांस रागही येई.  शेवटी शेवटी तर सर्वांना अनुरूप असा एक समन्वयी धर्म, एक नवनी साररूप धर्म सुरू करण्याचा त्याने प्रयत्न केला.  अकबराच्याच कारकीर्दीत हिंदू व मुस्लिम संस्कृतीचे संमिश्रण करण्याच्या बाबतीत उत्तर हिंदुस्थानने बरीच मोठी मजल मारली.  हिंदू काय, मुसलमान काय दोघांतही तो सारखा प्रिय होता.  मोगल घराणे हिंदी घराणे या दृष्टीने दृढमूल झाले.

यांत्रिक प्रगती आणि निर्माण शक्ती या बाबतीत
आशिया व युरोप यांतील विरोध


अकबराची जिज्ञासूवृत्ती त्याच्या रोमारोमांत भरली होती.  भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील नवीन नवीन गोष्टी शोधण्याचा त्याला नाद होता.  यांत्रिक शोधबोध, युध्दशास्त्र यांकडे त्याचे फार लक्ष होते.  लढाऊ हत्तींचे त्याला फार महत्त्व वाटे, आणि त्याच्या सैन्यात गजदळ हा महत्त्वाचा भाग असे.  त्याच्या दरबारातील पोर्तुगीज जेसुइट लिहितात, ''नाना गोष्टींचा त्याला नाद असून त्या जाणून घेण्याची त्याला इच्छा असे; लष्करी आणि राजकीय बाबतीतच नव्हे, तर कितीतरी यांत्रिक कलाकुसरींची त्याला उत्तम माहिती होती.  ज्ञानाची त्याला अशी हाव होती की, एखादा भुकेलेला मनुष्य एकाच घासात सारे गिळू पाहतो, त्याप्रमाणे एकदम आपणांस सारे कळावे अशा हिरीरीने तो सारे शिकू पाही.''

परंतु त्याची ही जिज्ञासू बुध्दी अमक्या एका मुक्कामावर अमक्या एका गोष्टीशी का थांबली याचे आश्चर्य वाटते.  वास्तविक कितीतरी क्षेत्रे त्याच्यासमोर उघडी होती.  त्याची जिज्ञासा तिकडे फिरकली नाही.  थोर मोगली सम्राट म्हणून जरी त्याची अपार प्रतिष्ठा होती, जमिनीवर जरी त्याची प्रबळ सत्ता होती, तरी समुद्रावर तो हतबल होता.  आफ्रिकेच्या टोकास वळसा घालून वास्को-डी-गामा कालिकत बंदरात १४९८ मध्ये येऊन पोहोचला होता; अल्बुकर्कने १५११ मध्ये मलाक्का घेऊन हिंदी महासागरात पोर्तुगीजांची समुद्रसत्ता स्थापिली होती.  हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावर गोवा हे पोर्तुगीजांचे प्रबळ ठाणे झाले होते.  हे सारे प्रकार होत होते तरी अकबराचे व पोर्तुगीजांचे प्रत्यक्ष युध्द असे कधी जुंपले नाही.  परंतु समुद्रमार्गाने जे हिंदी मुसलमान मक्केच्या यात्रेला जात, त्यांच्यात कधीकधी बादशहाच्या कुटुंबातलीही माणसे असत, अमीर-उमरावांचीही मंडळी असत, त्यांनासुध्दा पोर्तुगीज कधीकधी खंडणीसाठी अडकवून ठेवीत.  त्यावरून हेच दिसते की, अकबर जमिनीवर कितीही अजिंक्य असला तरी दर्यावर पोर्तुगीज प्रभुत्व होते.  हिंदुस्थानचे गतकालीन वैभव व महात्म्य समुद्रावरील सत्तेवर पुष्कळसे अवलंबून असले तरी नुसत्या भुमिखंडावर प्रबळ सत्ता गाजविण्याची इच्छा असणार्‍या राष्ट्राला समुद्रावरच्या सत्तेचे महत्त्व का वाटत नव्हते हे समजणे कठीण नाही.  अकबराला प्रचंड खंडप्राय देश जिंकून घ्यायचा होता आणि पोर्तुगीजांकडे लक्ष द्यायला त्याला सवडही नव्हती; आणि मधूनमधून जरी ते चावे घेत, डंख मारीत तरी अकबराला त्याचे फारसे महत्त्व वाटले नाही.  मोठमोठी गलबते बांधण्याचा विचार एकदा त्याच्या डोक्यात आला होता.  परंतु आरमारी सत्तेचा त्यात मुख्य हेतू नसून त्या नाना नौका षोक व करमणुकीसाठी म्हणूनच बांधल्या जायच्या होत्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel