तोफखान्याच्या बाबतीतही मोगल फौजा त्याचप्रमाणे त्या काळातील इतर राज्येही परकी तज्ज्ञावर विसंबून असत.  तुर्की साम्राज्यातून येणार्‍या तुर्कांवर बहुधा मदार असे.  त्या वेळेस कॉन्स्टँटिनोपलला इस्तंबूल किंवा रूम-पूर्वेकडील रोम असे नाव हाते आणि तोफखान्यावरील प्रमुखाला हिंदुस्थानात रूमीखान अशी पदवी असे.  हे विदेशी तज्ज्ञ एतद्देशीयांस शिकवून तयार करीत.  परंतु अकबराने किंवा दुसर्‍या कोण्या राजाने स्वत:चे लोक शिकून येण्यासाठी का पाठविले नाहीत ?  किंवा या बाबतीत शोधबोध करण्यासाठी स्वत:चे कारखाने, प्रयोगशाळा का उघडल्या नाहीत ?

आणखीही लक्षात येण्यासारखी एक गोष्ट आहे.  जेसुइट लोकांनी अकबराला छापील बायबलची एक प्रत आणि आणखीही दुसरी दोन छापील पुस्तके भेट म्हणून दिली होती.  पुस्तके कशी छापली जातात, यासंबंधी त्याची जिज्ञासा का जागृत झाली नाही ?  जर त्याने या गोष्टींकडे लक्ष दिले असते तर सरकारी पसार्‍यात त्याचप्रमाणे हाती घेतलेल्या अनेक प्रचंड उद्योगांत त्याला केवढे साहाय्य मिळाले असते ?

आणखी एक-घड्याळे.  मोगल सरदारांना घड्याळांचा फार षोक होता.  पोर्तुगीज ती आणीत आणि पुढे इंग्रज युरोपातून आणीत.  घड्याळ म्हणजे श्रीमंतांची चैनीची वस्तू मानली जाई.  सामान्य जनता वाळूची घड्याळे, घटिकापात्रे, शंकुयंत्रे यावरच समाधान मानी. स्प्रिंगची ही घड्याळे कशी चालतात, कशी केली जातात हे समजून घेऊन येथे तयार करावीत असे कोणाच्याही डोक्यात आले नाही.  यांत्रिक शोधबोधाकडे एकंदरीत असा कमी कल असे व हिंदुस्थानात अतिकुशल कारागीर होते, असे असूनही इकडे लक्ष नसे ही आश्चर्यकारक गोष्ट आहे.

या काळी निर्माणशक्ती व नवे शोध लावण्याची बुध्दिबळ लुळे पडले होते असे हिंदुस्थानातच दिसून येते, असे नाही तर सार्‍या मध्य व पूर्व आशियात हाच प्रकार अधिकांशाने आढळतो.  चीनमध्ये काय परिस्थिती होती ते मला माहीत नाही.  परंतु तेथेही सारे साचीव, ठरीव जीवन झाले होते असे वाटते.  आरंभीच्या काळात हिंदुस्थान व चीन या दोन्ही देशांत विज्ञानाच्या अनेक क्षेत्रांत नाव घेण्यासारखी प्रगती झालेली होती.  दर्यावर्दी व्यापार खूप चालत होता; गलबते बांधावी लागत, आणि त्यामुळे यांत्रिक शोधा व सुधारणा करायला प्रेरणा मिळे.  चीन काय किंवा हिंदुस्थान काय, या दोन्ही देशांत किंवा त्या काळात इतर कोणत्याच देशात महत्त्वाचा असा एखादा यांत्रिक शोध लागत नाही हे खरे.  या दृष्टीने पंधराव्या शतकातील जग हजार दोन हजार वर्षांपूर्वीच्या जगाहून फारसे निराळे नव्हते.

अरबांनी व्यावहारिक विज्ञानात आरंभी आरंभी तरी बरी गती केली होती.  युरोपात मध्ययुगातील ज्या काळास अंधारयुग असे म्हणतात त्या काळात अरबांनी ज्ञानाची अनेक क्षेत्रांत वाढ केली होती.  परंतु अरब ह्या काळात मागे पडून, त्यांचे महत्त्व संपले होते.  असे म्हणतात की, काही सर्वांत जुनी घड्याळे सातव्या शतकातील अरबांनी केलेली होती.  दमास्कस शहरातील घड्याळ प्रसिध्द होते; आणि हरून-अल्-रशीदच्या बगदादमधील घड्याळही लोकविख्यात होते.  परंतु अरबांना अवकळा आली व घड्याळे बनविण्याची कलाही या देशातून अस्तास गेली.  परंतु युरोपात मात्र ती कला वाढतच होती आणि तिकडे घड्याळ ही काही मोठी दुर्मिळ चीज म्हणून उरली नव्हती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel