परंतु या पुनरुज्जीवनाच्या नवयुगामुळे तोपावेतो युरोपीय बुध्दीला बध्द करणारी शत बंधने तुटून पडली होती.  आजवर उराशी धरलेल्या शेकडो कल्पनामूर्ती धुळीस पडल्या होत्या.  नवयुगामुळे असो की अन्य कारणाने असो, सर्व वस्तुजाताचे संशोधन करणारी प्रबळ जिज्ञासा जन्मली होती.  सनातनी लोकांच्या अधिकारवादाला ती जुमानीना व अमूर्त व मोघम तर्कटांना तिने दूर भिरकाविले; फ्रान्सिस बेकनने लिहिले, ''मानवी ज्ञान आणि मानवी सत्ता यांचे मार्ग अगदी जवळ जवळ असे आहेत, एकरूप आहेत असे म्हटल तरी चालेल.  आतापर्यंत अमूर्त आणि अदृश्य गोष्टींवर भर देण्याची दुष्ट खोड आपणांस लागली आहे.  म्हणून प्रयोगाशी संबध्द असलेला पाया घालून त्याच्यावर शास्त्रांची सुरुवात करून ती वाढवून उभी करणे अधिक सुरक्षिततेचे होईल.  जी चिंतनशील शास्त्रे आहेत त्यांना सुध्दा प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रयोगाचा शिक्का बसेल तेव्हाच किंमत येईल असे केले पाहिजे.  व्यवहार हे, प्रत्यक्ष जग हे, सर्व शास्त्रांची कसोटी होऊ दे.''  पुढे सतराव्या शतकात सर थॉमस ब्राऊननेही म्हटले होते, ''ज्ञानाचा सर्वांत मारक असा शत्रू जर कोणता असेल, सत्याचे सर्वांत जास्त खून पाडणारा कोणी असेल, तर तो अधिकारवाद हा होय.  अमका म्हणतो म्हणून माना, यामुळे ज्ञानाचे नुकसान झाले आहे, सत्य ठार झाले आहे.  प्राचीनांच्या आज्ञेबरहुकूम वागणे, त्यांच्या सांगण्यावर आपण विश्वास ठेवणे म्हणजे त्याहून भयंकर आहे, कारण कोणाच्याही लक्षात येईल की, आजचे लोक इतक्या आंधळेपणाने प्राचीनांवर विश्वास ठेवतात की त्यांची स्वत:ची बुध्दी दूरच राहते, आमच्या बुध्दीवर त्या मृतांच्या मताची हुकमत चालते.  वास्तविक ते लोक कितीतरी वर्षांपूर्वी होऊन गेले.  परंतु त्यांच्या आमच्यात फार अंतर पडले म्हणून जणू त्यांचे म्हणणे निमूटपणे मानायचे.  त्यांच्या काळात त्यांचे म्हणणे बिनविरोध कुणी मानीत नसे.  समकालीनांकडून किंवा त्यांच्या पाठोपाठ होऊन गेलेल्यांकडून त्यांच्यावर टीकाही होई.  ते त्यांच्या म्हणण्याला आळा घालीत, आक्षेप घेत.  परंतु आता मात्र आम्ही निरपवादपणे सारे मानायचे !  जितके काळाचे अंतर त्यांच्या आमच्यात अधिक तितके त्यांचे म्हणणे अधिकच सत्याच्या जवळचे, खरोखर अशाने आपण आपली वंचना करून घेत आहोत.  सत्याच्या मार्गापासून हे दूर जाणे आहे.''

अकबराचे शतक म्हणजे सोळावे शतक.  या शतकातच युरोपात गतिशास्त्राचा शोध लागून मानवी जीवनात एक क्रांतिकारक पाऊल पुढे टाकण्यात आले.  तो शोध हाती घेऊन युरोप पुढे निघाले.  प्रथम धीरे धीरे पावले पडत होती.  परंतु हळूहळू गती वाढतच गेली, आणि शेवटी एकोणिसाव्या शतकात युरोप इतके पुढे गेले की, एक नवीन दुनियाच त्यांनी निर्माण केली.  निसर्गशक्तीचा उपयोग करून, निसर्गावर स्वार होऊन युरोप आगेकूच करीत असता आशिया खंड सुस्त, स्वस्थ पडून होते.  आशियातील लोकांच्या डोळ्यांवर झापड होती.  जुनाट चाकोरीतूनच आपण जात होतो.  मनुष्याच्या श्रमावर आणि कष्टांवर केवळ विसंबून होतो.  सृष्टीच्या शक्तीचा आपणांस थांगपत्ताही लागला नाही.

हे असे का घडले ?  आशियाचा विस्तार व विविधता इतकी मोठी आहेत की, याला सर्वाला एकच उत्तर शक्य नाही.  प्रत्येक देशापुरती, विशेषत: हिंदुस्थान चीनसारख्या विशाल देशापुरती स्वतंत्र वेगवेगळी मीमांसा केली पाहिजे.  युरोपातील कोणत्याही देशापेक्षा त्या काळी व त्यानंतरही चीन देशात जास्त चांगली संस्कृती होती, व त्या देशातील लोकांची जीवनपध्दती जास्त सुधारलेली होती.  हिंदुस्थानातही निदान बाहेरच्या देखाव्यापुरते दृश्य असे होते की, तेथले राजदरबार तर अप्रतिम शोभिवंतच होते, पण व्यापार व उद्योगधंदेही अगदी भरभराटीत होते.  त्या काळी एखादा हिंदुस्थानचा मनुष्य युरोपातील देशात जाता तर त्याला ते पुष्कळ बाबतीत मागासलेले व अडाणी वाटले असते.  पण इतके असूनही युरोपात जो गतिमान वृत्तीचा गुण स्पष्ट दिसू लागला होता तो हिंदुस्थानात जवळजवळ कोठेच नव्हता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel