हिंदुस्थानातील पुष्कळसे मुसलमान मूळचे हिंदूच असल्यामुळे आणि अनेक शतके जवळजवळ राहिल्याने, हिंदु-मुसलमानांत पुष्कळशी समान राहणी निर्माण झाली.  समान संवयी, समान वृत्ती, समान जीवनप्रकार, समान कलात्मक अभिरुची, विशेषत: उत्तर हिंदुस्थानात तरी दिसून येतात.  संगीत, चित्रकला, शिल्प, खाणेपिणे, पेहराव, समान परंपरा या बाबतींत हिंदु-मुसलमानांचे समान जीवन होते, ते गोडी-गुलाबीने शेजारीशेजारी एकोप्याने नांदत.  एकमेकांच्या उत्सवांत, समारंभांत भाग घेत, दोघांची बोली एकच, दोघांची राहणी जवळ जवळ सारखीच आणि उभयतांसमोरचे आर्थिक प्रश्नही एकरूपच असत.  सरदार आणि जमीनदार आणि त्यांच्या भोवतालचे लाळघोट्ये हे सरकार-दरबारकडे बघून वागत (हे जमिनीचे मालक नसत.  ते खंडही घेत नसत.  फक्त सरकारचे पैसे वसूल करून तो पैसा ते आपल्याकडे ठेवू शकत.  ठराविक क्षेत्रफळातील जमिनीचा सरकार सारा ते वसूल करीत.  त्यांना मिळणार्‍या सनदा आमरण असत).  त्यांची एक निराळीच दरबारी संस्कृती निर्माण झाली.  त्यांचा पोषाख समान असे.  त्यांचे खाणेपिणे समान असे.  त्यांचे कलात्मक छंदही समान असत.  लष्करी खेळ, शिकार, द्वंद्वयुध्दे इतर खेळ-त्यांचे सारे समान असे.  पोलो मोठा आवडता खेळ होता व हत्तींच्या टकरा लोकांना फार आवडत.

वर्ण व जातिभेद असूनही हे असे एकत्र जाणे-येणे, राहणे चालू असे.  संमिश्र विवाह मात्र होत नसत, ते अपवादात्मक असत; आणि कधी कधी असा विवाह झालाच तर त्याला दोन्ही धर्मांच्या लोकांच्या एकीकरणाचा अर्थ नसे.  एखादी हिंदू स्त्री मुसलमान जमातीत जाई, एवढाच त्याचा अर्थ असे.  एकत्र खाणेपिणेही फारसे नसे, परंतु या बाबतीत बरीच शिथिलता असे.  बायका गोषात असल्यामुळे सामाजिक जीवनाची वाढ झाली नाही.  मुसलमानांना हे अधिकच लागू आहे, कारण त्यांच्यातील गोशा आपसात अधिकच कडक असे.  हिंदु-मुसलमान पुरुषमंडळी एकमेकांना वरचेवर भेटत; परंतु उभयतांच्या स्त्रीवर्गाला मात्र अशी संधी मिळत नसे.  सरदारवर्गाच्या, वरिष्ठवर्गाच्या बायका एकमेकांपासून पृथक असत, दूरदूर असत.  त्यांचे अलग अलग असे स्पष्ट गट पडले.  आणि एकमेकांची एकमेकांस फारशी कल्पनाही नसे.  त्या त्या गटांच्या कल्पना, विचार सारे निराळे असे.

खेड्यातील लोकांत म्हणजेच बहुजनसमाजात अधिक सहकारी व संयुक्त जीवन असे.  खेड्यातील मर्यादित वर्तुळात हिंदु-मुसलमान या दोघांत निकट संबंध असत.  जातीची काही अडचण येत नसे, कारण मुसलमान म्हणजे आणखी एखादी जात या दृष्टीनेच हिंदू त्यांच्याकडे बघत.  बहुतेक मुसलमान धर्मांतरित होते.  मूळचे ते हिंदूच होते व जुन्या परंपरा अद्याप जशाच्या तशा त्यांच्यातही भरपूर होत्या.  हिंदूंची पार्श्वभूमी, हिंदूंची रामायणमहाभारतादी काव्ये, दंतकथा, आख्यायिका सारे त्यांना माहीत असे.  हिंदूंप्रमाणेच ते काम करीत, तसेच जीवन जगत.  तसेच कपडे वापरीत, तीच भाषा बोलत.  एकमेकांच्या उत्सवसमारंभांत भाग घेत व काही निमधार्मिक उत्सव दोघांचेही तेच असत.  दोघांची लोकगीतेही तीच.  हे सारे लोक बहुधा शेतकरी, कारागीर, लहान मोठे धंदे करणारे असत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel