सुसंघटना व तंत्र यांच्या बाबतीतील हिंदुस्थानचा
मागासलेपणा आणि ब्रिटिशांचे श्रेष्ठपण


या कालखंडाकडे पाहू लागलो म्हणजे क्षणभर असे वाटते की, ब्रिटिशांना एकंदरीत दैवच अनुकूल होते.  घटनाच अशा घडत गेल्या की, त्या त्यांना अनुकूल होत्या.  जय पारितोषिकाच्या, प्रयत्नाअंती मिळवायच्या लखलखीत जयचिन्हाच्या मोलाच्या मानाने पाहता अगदी थोड्या प्रयासाने त्यांनी एक अवाढव्य साम्राज्य जिंकिले आणि एवढी संपत्ती त्यांना मिळाली की, तिच्या साहाय्याने ते जगातील सर्व प्रमुख सत्ताधारी झाले.  घटनांत थोडाफार बदल झाला असता, जर इकडचे तिकडे झाले असते तर ब्रिटिशांच्या आशाआकांक्षा धुळीत मिळाल्या असत्या असे वाटते.  अनेकदा त्यांचे पराजय झाले.  हैदर, टिपू, मराठे, गुरखे, शीख सर्वांनी ब्रिटिशांना अधूनमधून खडे चारले होते.  दैवाचा त्यांना तितकासा आधार नसता तर हिंदुस्थानात त्यांना पाय रोवता आला नसता.  फारफार तर किनार्‍यावर काही ठिकाणी ते चिकटून राहिले असते.

परंतु जरा खोल पाहिले तर असे दिसेल की, त्या परिस्थितीत जे झाले ते होणे अपरिहार्य होते.  दैव त्यांच्या बाजूने होते यात शंकाच नाही.  परंतु दैवाने हात दिला तरी संधीचा फायदा करून घ्यायला जवळ पात्रता व कर्तृत्व ही लागतात.  मोगल साम्राज्याचा मोड झाल्यावर हिंदुस्थानात सारे अस्थिर वातावरण होते.  सर्वत्र विस्कळितपणा होता.  कित्येक शतकांत इतका अगतिकपणा व दुबळेपणा आलेला नव्हता.  संघटित सत्ता नष्ट झाल्यावर सत्ता संपादन करण्याकरता निघालेल्या नव्या साहसी लोकांना रान मोकळे मिळाले.  सत्तेसाठी जे नवे हक्कदार पुढे आले त्या हक्कदारांमध्ये यशस्वी व्हावयास लागणारे गुण ब्रिटिशांच्या जवळच फक्त त्या वेळेस होते.  त्यांना एक अशी मोठी अडचण होती की, त्यांचा देश हजारो मैल दूर होता.  परंतु ही प्रतिकुलताच त्यांच्या पथ्यावर पडली.  कारण ब्रिटिश लोक सार्वभौम सत्तेसाठी प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येतील व ते त्या लायकीचे आहेत असे स्वप्नातही कोणास वाटले नव्हते.  प्लासीच्या लढाईनंतरही हा भ्रम कित्येक वर्षे होता ही आश्चर्याची गोष्ट आहे.  दिल्लीच्या नामधारी बादशहाचे आम्ही कारभारी आहोत असा बहाणा ब्रिटिशांनी दाखविला आणि त्यामुळेही हा भ्रम राहायला मदत झाली.  बंगालमधून त्यांनी जी लूट नेली आणि व्यापार करण्याची त्यांची जी विचित्र तर्‍हा होती त्यामुळे हे विदेशी लोक पैशाचे भुकेले आहेत; सत्तेचे नाहीत असेही लोकांना वाटले.  तैमूर, नादिरशहा यांच्याप्रमाणेच यांचे हे येणे दु:खदायक असले तरी त्यांच्याप्रमाणे हेही शेवटी आपल्या देशाला निघून जातील असे हिंदी लोकांस वाटे.

ईस्ट इंडिया कंपनी मूळ व्यापारासाठी म्हणूनच स्थापन झाली, व व्यापाररक्षणार्थच ती फौजफाटा ठेवी.  हळूहळू आणि कोणाच्या ध्यानात न येता स्वत:च्या ताब्यातील मुलूख त्यांनी वाढविला तो एतद्देशीयांच्या या ना त्या बाजूस मिळून, एका प्रतिस्पर्ध्याविरुध्द दुसर्‍या प्रतिस्पर्ध्यास साहाय्य करून.  कंपनीची फौज जास्त कवाईती असे आणि ज्याची बाजू ते घेत त्याचे पारडे वरचढ होई.  या मदतीसाठी कंपनी भरमसाट पैसा घेई.  अशा रीतीने कंपनीची शक्ती वाढली आणि तिचा लष्करी पसाराही वाढला.  ब्रिटिश सेना म्हणजे भाडोत्री अशा दृष्टीने लोक पाहात, परंतु ब्रिटिश कोणा दुसर्‍यासाठी डाव खेळत नसून, स्वत:साठी सारे करीत आहेत.  हिंदुस्थानला राजकीय प्रभुत्व प्राप्त व्हावे म्हणून त्यांची धडपड आहे, हे ओळखले जाऊ लागले, तोपावेतो त्यांची सत्ता देशात पाय रोवून उभीही राहिली होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel