रणजितसिंगाची बुध्दीच चौकस आणि जिज्ञासू होती असे नव्हे, तर ज्या काळात हिंदुस्थानात किंवा जगात सर्वत्र अमानुषपणा व निर्दयपणा यांचा सुळसुळाट होता अशा काळात त्याची माणुसकी व दया अपूर्व होती.  एक प्रबळ राज्य त्याने स्थापिले; शक्तिशाली सैन्य त्याने उभारले; परंतु रक्तपाताचा त्याला वीट होता.  प्रिन्सेप लिहितो, ''इतक्या कमी गुन्हेगारीने एका माणसाने एवढे साम्राज्य स्थापल्याचे दुसरे उदाहरण क्वचितच सापडेल.''  गुन्हा कितीही भयंकर असो, देहान्त शिक्षा त्याने रद्द केली होती.  आणि त्याच काळात इंग्लंडमध्ये लहानसहान गुन्ह्यासाठी मरणाची शिक्षा असे.  त्याची भेट घेतलेल्या ऑस्बोर्नने लिहिले आहे ''रणांगणाशिवाय इतरत्र त्याने कधी कोणाचा जीव घेतल्याचे माहीत नाही.  त्याचा जीवन घेण्याचे मात्र अनेक वेळा प्रयत्न केले गेले. अनेक सुधारलेल्या राजांच्या कारकीर्दीतही इतका कमी जुलूम आणि कमी दुष्टता आढळणार नाही.''*

राजपुतान्यातील जयपूरचा सवाई जयसिंग हा एका निराळ्याच नमुन्याचा हिंदी मुत्सद्दी होता.  तो जरा आधीच, इ.सन १७४३ मध्ये मरण पावला.  औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जी बजबजपुरी माजली त्या कालखंडात तो वावरला.  भराभरा जे नाना प्रकार होत होते, उत्पात घडत होते; बदल होत होते, त्यांना यशस्वी रीतीने तोंड देण्याइतपत हुषारी व संधिसाधूपणा त्याच्याजवळ होता.  दिल्लीच्या सम्राटाची अधिसत्ता त्याने मान्य केली होती.  परंतु पुढे मराठे बळावले असे पाहून दिल्लीच्या बादशहाच्या वतीने त्याने त्यांच्याशी तडजोड केली.  परंतु मला त्याच्याविषयी कौतुक वाटते ते त्याच्या राजकीय किंवा लष्करी कामगिरीसाठी नव्हे.  तो एक शूर योध्द होता, कसलेला राजकारणपटू होता यात शंका नाही.  परंतु यापेक्षाही त्याच्यात काही अधिक होते.  तो गणिती होता, ज्योतिर्विद होता; तो शास्त्रज्ञ होता, नगररचना करणारा होता, इतिहासाच्या अभ्यासाचेही त्याला वेड होते.

जयसिंगाने जयपूर, दिल्ली, उज्जयिनी, काशी आणि मथुरा या ठिकाणी भव्य वेधशाळा बांधल्या.  पोर्तुगीज धर्मप्रसारकांकडून पोर्तुगालमध्ये ज्योतिषशास्त्राचा बराच अभ्यास झाल्याचे त्याला कळले. तेव्हा पोर्तुगीज मिशनर्‍यांबरोबर त्याने आपली माणसे पोर्तुगालचा राजा इमॅन्युअल याच्याकडे पाठवली.  इमॅन्युअलने झेव्हियर-डि-सिल्वा हा आपला वकील जयसिंगाकडे पाठवला.  या वकिलाबरोबर डी-ला-हिरे याची कोष्टकेही पाठविण्यात आली होती.  जयसिंगाने ही कोष्टके स्वत:च्या कोष्टकांशी जुळवून पाहिली.  त्याला असे दिसून आले की, पोर्तुगीज कोष्टके तितकी तंतोतंत बरोबर नाहीत.  त्यांच्यात अनेक चुका होत्या.  मोजमापाच्या साधनातील 'चुकीच्या व्यासामुळे' या चुका झाल्या असाव्यात असे त्यांचे म्हणणे होते.

हिंदी गणितविद्येशी जयसिंग चांगला परिचित होता.  प्राचीन ग्रीक गणितग्रंथांचाही त्याने अभ्यास केला होता; आणि युरोपातील गणितशास्त्रातील शोधबोधही त्याला ज्ञात होते.  त्याच्याजवळ युक्लीडची वगैरे ग्रीक पुस्तके होती.  ही पुस्तके, त्याचप्रमाणे सरळरेखात्मक त्रिकोणमिती आणि वर्तुळात्मक त्रिकोणमितीवरची युरोपियन पुस्तके आणि गुणाकारांची कोष्टके कशी करायची, कशी वापरायची यावरही पुस्तके त्याने संस्कृतमध्ये अनुवादून घेतली.  अरबी भाषेतीलही ज्योतिषशास्त्रविषयक ग्रंथांचे त्याने भाषांतर करून घेतले होते.

-----------------------
*  एडवर्ड थॉम्प्सनच्या ''The Making of the Indian Princes''-'भारतीय संस्थानांची निर्मिती' (१९४३) या पुस्तकातील उतारा, पृष्ठ १५७, १५८.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel