हिंदुस्थानातील हा वंशश्रेष्ठतेचा प्रश्न हिंदी विरुध्द इंग्रज असा नसून, हिंदी विरुध्द युरोपियन असा आहे, असे म्हटले तर अधिक बरोबर होईल.  हिंदुस्थानात आलेला प्रत्येक युरोपियन- मग जर्मन असो वा पोलिश असो किंवा रुमेनियन असो— आपोआप सत्ताधारी वर्गापैकी ठरतो.  रेल्वेचे डबे, स्टेशनातील आरामस्थाने, उद्यानातील बाके सर्वत्र 'फक्त युरोपियनांसाठी' असे लिहिलेले आढळते.  दक्षिण आफ्रिकेत व इतरत्रही असे लिहिणे वाईटच.  परंतु आम्हाला आमाच्या देशात हे निमूटपणे सोसावे लागले म्हणजे आमच्या या गुलामगिरीच्या हीन जिण्याची पदोपदी टोचणी लागून चीड येते.

हे खरे आहे की, वंशश्रेष्ठतेची घमेंड आणि साम्राज्य-मदांधता यांच्या व्यक्तीकरणात हळूहळू बदल होत होता, पण त्याचा वेग अल्प होता आणि किरकोळ प्रसंगी तो दिसून येत असे.  राजकीय दबाव आणि लढाऊ राष्ट्रीयता यांच्या योगे असे प्रसंग हाणून पाडले जात.  परंतु हीच लढाऊ राष्ट्रीयता जेव्हा क्रांतीच्या टोकाला पोचते आणि सत्ताधार्‍यांना ती वाटेल त्या मार्गाने चिरडायची असते तेव्हा पुन: ती तात्पुरती दाबून ठेवलेली वांशिक श्रेष्ठतेची घमेंडखोर वृत्ती, तो साम्राज्यशाहीचा उन्माद आत्यंतिक स्वरूपात प्रगट व्हायला मागेपुढे बघत नसतो.

इंग्रज लोक वास्तविक बारीकसारीक फेरफारही ध्यानात घेणारे लोक आहेत.  चटकन त्यांच्या सारे लक्षात येते.  परंतु नवल हे की, ते स्वदेश सोडून जेव्हा परदेशात जातात तेव्हा मात्र त्यांच्या ठिकाणी आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव असण्याची वृत्ती फारशी दिसत नाही.  हिंदुस्थानात शास्ते आणि शासित-जित आणि जेते असा संबंध असल्यामुळे एकमेकांस समजावून घेणे हे आधीच कठीण, आणि तेथेही जर ते आंधळेपणाने आणि डोळे मिटून वागू लागले तर ते विशेषच लक्षात येते.  आपल्या सोयीचे असेल तेवढेच नेमके पाहावे, व बाकी सगळ्या गोष्टींकडे मुद्दाम डोळेझाक करावी असे हे लोक जाणूनबुजून सोंग करीत आहेत असे सुध्दा वाटू लागते.  परंतु खर्‍या गोष्टी त्यांनी डोळ्याआड केल्या तरी त्या काही पाहतापाहता हवेत विरून जात नाहीत.  मग त्या इतर लोकांना डोळ्यांसमोर धडधडीत दिसल्या की हा अनपेक्षित प्रकार घडल्यामुळे राज्यकर्ते नाराज होऊन त्यांच्या रागाचा पारा चढतो व त्यांना वाटते की हे लोक लबाडीने कांगावा करीत आहेत.

जाती व वर्ण यांच्या या देशात ब्रिटिशांनी व विशेषत: इंडियन सिव्हिल अधिकार्‍यांनी आपलीही एक कोणाशी न मिसळणारी ताठर जात निर्माण केली आहे.  या नोकरीतील हिंदी लोक जरी या अधिकारपदाची पदवी लागणारे, या नोकरीतील नियमाप्रमाणे व इतमामाप्रमाणे वागणारे असले तरी ते खरोखर या जातीत मोडत नाहीत.  धर्मावर श्रध्दा असावी तशी या गोर्‍या नोकरशाहींची आपल्या जातीच्या विशेष महत्त्वावरची निष्ठा अढळ झाली आहे, व या निष्ठेला यथायोग्य कल्पित पुराणे रचली जाऊन ती जाज्वल्य ठेवण्यात आली आहेत.  निष्ठा व परंपरा, हितसंबंध यांची जोडी जमली की तिचा प्रभाव फार विलक्षण पडतो व या जोडीविरुध्द कोणी ब्र काढला तरी या जातीला पराकाष्ठेचा त्वेष येऊन संताप चढतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel