१९३५ च्या हिंदुस्थान सरकारच्या कायद्यात प्रथमत:च हिंदी संस्थाने आणि ब्रिटिश हिंदुस्थान यांचे ब्रिटिश पार्लमेंटशी जे संबंध असतात त्यात काही फरक करण्यात आला आहे.  हिंदुस्थान सरकारच्या अधिसत्तेखालून संस्थाने काढून खास व्हाईसरॉयच्या देखरेखीखाली त्यांना देण्यात आले; आणि व्हाईसरॉय म्हणजे राजाचा प्रतिनिधी असे ठरले.  हिंदुस्थान सरकारचे राजकीय खातेच आतापर्यंत संस्थानांच्या बाबतीतही जबाबदार असे.  परंतु आता ते खाते खास व्हाईसरायच्या प्रत्यक्ष ताब्यात देण्यात आले, आणि कार्यकारी मंडळाचा त्या खात्याशी काहीही संबंध राहिला नाही.

ही संस्थाने कशी अस्तित्वात आली ?  काही ब्रिटिशांनी नवीनच निर्माण केली; काही मोगलांचे सुभे होते, तेथील सुभेदारांच्या हाताखाली ते प्रदेश तसेच मांडलिक म्हणून राहू दिले; काहींचा विशेषत: मराठे सरदारांचा प्रत्यक्ष पराजय केल्यावर त्यांना सरंजामी मांडलिक राजे म्हणू ठेवले.  ब्रिटिश सत्तेच्या उदयापासूनच बहुतेक संस्थानांचाही इतिहास सुरू होतो, त्यापूर्वी त्यांचा इतिहास नाही.  थोडा वेळ काही स्वतंत्रपणे वावरू लागली होती.  परंतु लढाई किंवा नुसत्या धमकीनेच त्यांचे स्वातंत्र्य समाप्त झाले. फक्त काही थोडीशी संस्थाने आणि विशेषत: रजपुतान्यातील संस्थाने मोगलांच्याही आधीची आहेत.  त्रावणकोर तर फारच जुने असून एक हजार वर्षांची त्याची परंपरा आहे.  काही अभिमानी रजपूत घराणी आपली परंपरा इतिहासपूर्वकाळापर्यंतही नेऊन भिडवितात. मिकाडोच्या वंशवृक्षाशीच त्याची तुलना होईल.  परंतु हे सारे रजपूत राजेरजवाडे पुढे मोगलांचे मांडलिक बनले व नंतर मराठ्यांची अधिसत्ता त्यांनी मान्य केली आणि शेवटी ब्रिटिशांचे ते संस्थानिक झाले.  एडवर्ड थॉम्प्सन लिहितो, ''ईस्ट इंडिया कंपनीने हे संस्थानिक जिकडेजिकडे माजलेल्या त्यांच्या राज्यातल्या अंदाधुंदीतून सोडवून त्यांच्या राज्यावर नीट बसविले. अशा रीतीने त्यांना उचलून नीट बसविण्यात आल्यावर त्यांची दशा अशी केविलवाणी, मोडकीतोडकी झाली की, जगाच्या आरंभापासून पाहू तर असे राजे आपणास दिसणार नाहीत.  ब्रिटिश आडवे आले नसते तर सारे रजपूत राजे मराठ्यांच्यापुढे तुटून फुटून नष्ट झाले असते. निजामाचे राज्य, अयोध्येचे राज्य किंवा अशीच काहीतरी केवळ उपटसुंभ, पोकळ होती. 'रक्षणकर्ती सत्ता' अशी पदवी स्वत:ला लावणार्‍या सरकारने त्या पोकळ बाहुल्यांत वारा फुंकून ती जिवंत असल्याचा देखावा कसाबसा केला होता इतकेच.'' *

---------------------

* 'दी मेकिंग ऑफ इंडियन प्रिन्सेस' ('हिंदी संस्थानांची निर्मिती', लेखक-एडवर्ड थॉम्प्सन : पृष्ठे २७०-२७१) याच ग्रंथकाराचे 'लाईफ ऑफ लॉर्ड मेटकाफ-मेटकाफचे चरित्र' म्हणून एक पुस्तक आहे.  या दोन्ही पुस्तकांत हैदराबादची, तेथील ब्रिटिश सत्तेची, लाचलुचपतीची हुबेहूब वर्णने आहेत व दिल्ली, रणजितसिंगचा पंजाब येथेही ब्रिटिशांनी काय केले ते असेच सारे आहे.  १९२८-२९ मध्ये हिंदी संस्थानांसंबंधी ब्रिटिश सरकारने नेमलेल्या बटलर कमिटीने पुढीलप्रमाणे लिहिले आहे. :''ब्रिटिश सत्तेशी या संस्थानांचा संबंध आला तेव्हा ती स्वतंत्र होती, हे ऐतिहासिक सत्याला धरून नाही.  काहींना ब्रिटिशांनी सोडविले व काहीतर त्यांनी नवीनच निर्मिली.''


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel