रामकृष्ण हे जुन्या भारतीय परंपरेचे प्रतीक होते.  परंतु त्यांच्यापूर्वी बंगालमध्ये आणखी एक थोर विभूती राजा राममोहन रॉय अठराव्या शतकात होऊन गेली होती.  त्या काळच्या हिंदुस्थानातील सुशिक्षित वर्गावर हिंदु-मुस्लिम संमिश्र संस्कृतीची छाप होती, व त्या संस्कृतीतूनच भारतीय विचारसृष्टी व तत्त्वज्ञान यांचे गाढे ज्ञान व संस्कृत, अरेबिक, पर्शियन भाषेवर प्रभुत्व मिळविलेला विद्वान निघाला.  ब्रिटिश हिंदुस्थानात आले व ते अनेक गोष्टींत वरचढ ठरले.  या घटनांमुळे राममोहन रॉय यांची जिज्ञासू व साहसी बुध्दी ब्रिटिशांच्या संस्कृतीची मुळे कशात आहेत त्याचा शोध घेण्याकडे वळली.  त्यांनी इंग्रजीचा अभ्यास केला, परंतु तेवढ्याने समाधान न झाल्यामुळे ग्रीक, लॅटिन, हिब्रू सर्वच भाषांचे अध्ययन पाश्चिमात्यांचा धर्म व संस्कृती यांची मुळे शोधण्याकरता त्यांनी केला.  त्या वेळेस विज्ञान आणि यांत्रिक शोध-बोध जरी फार वाढले नव्हते तरी राममोहनांचे लक्ष तिकडे गेल्याशिवाय राहिले नाही.  परंतु त्यांची वृत्ती तत्त्वजिज्ञासूही होती, पंडिताची होती.  म्हणून प्राचीन वाङ्मयाकडेच त्यांचा अचूक ओढा होता.  प्राचविद्याविशारद मोनियर वुईल्यम्स म्हणतो, ''तुलनात्मक धर्मशास्त्राचा अभ्यास करणारा जगातील पहिला तळमळीचा पुरुष म्हणजे राममोहन हे होत.''  असे असूनही शिक्षण अर्वाचीन तर्‍हेचे व्हावे, जुन्या पांडित्यप्रचुर परंपरेतून ते मुक्त करावे असे त्यांना मनापासून वाटे.  त्या काळातसुध्दा विज्ञान पध्दतीचा त्यांनी पुरस्कार केला आहे.  ते गव्हर्नर जनरलला लिहितात, ''गणित, सृष्टिशास्त्र, रसायनशास्त्र, शारीरशास्त्र आणि अन्य उपयोगी विज्ञाने यांच्या शिक्षणाची अत्यंत जरूर आहे.''

परंतु राममोहन नुसते पंडित किंवा संशोधक नव्हते.  ते प्रामुख्याने सुधारक होते.  आरंभी इस्लामी धर्माचा आणि पुढे ख्रिस्ती धर्माचा त्यांच्यावर परिणाम झाला, तरी ते स्वत:च्याच धर्माच्या मूलभूत तत्त्वांना चिकटून राहिले.  परंतु त्यात सुधारणा करण्याचा त्यांनी प्रयत्न करून धर्मात शिरलेले वाईट प्रकार दूर करण्याची खटपट केली.  त्यांच्याच विशेष प्रयत्नामुळे ब्रिटिशांनी सतीची चाल बंद केली.  सतीची चाल सार्वत्रिक अशी कधीच नव्हती.  परंतु वरिष्ठ वर्गात अधूनमधून अशी उदाहरणे होत.  सिथियन तार्तर लोकांहून ही चाल हिंदुस्थानात आली असावी.  त्या लोकांत धनी मेला म्हणजे त्याच्या आश्रित व अंकित लोकांनी आत्महत्या करण्याची रूढी होती, प्राचीन संस्कृत वाङ्मयात सतीच्या चालीचा निषेधच आहे.  अकबराने ही चाल बंद पाडण्याची पराकाष्ठा केली.  मराठ्यांचाही या चालीला विरोधच होता.

हिंदी वृत्तपत्रे स्थापणार्‍यांपैकी राममोहन रॉय हे एक आहेत.  १७८० पासून हिंदुस्थानातील इंग्रजांनी अनेक वृत्तपत्रे चालविली.  त्यात सरकारवर नेहमी खूप टीका येई.  त्यामुळे खटके उडून कडक वृत्तपत्र नियंत्रण कायदे होऊ लागले.  वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याचा पक्ष घेऊन भांडणारे या देशातले पहिले, आरंभीचे वीर इंग्रज पत्रकारच होते व त्यांपैकी जेम्स सिल्क बकिंगहॅम याचे नाव अद्यापही घेतले जाते.  त्याला तर येथून हद्दपार करण्यात आले.  हिंदी मालकीचे आणि हिंदी संपादनाखाली निघणारे पहिले पत्र १८१८ मध्ये इंग्रजीत सुरू झाले.  त्याच वर्षी श्रीरामपूरच्या बॅप्टिस्ट मिशनर्‍यांनी एक बंगाली मासिक व साप्ताहिक सुरू केले.  ती देशी भाषेतील पहिली नियतकालिके होत.  कलकत्ता, मद्रास, मुंबई येथे इंग्रजी व देशी भाषांत चालणारी वृत्तपत्रे व नियतकालिके त्यांनतर निघू लागली.

ह्या मध्यंतरीच्या काळातसुध्दा वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली ती चढ-उताराने आजपर्यंत सुरूच आहे.  १८१८ मध्येच चौकशीशिवाय डांबून ठेवण्याची परवानगी देणारा 'तिसरा रेग्युलेशन अ‍ॅक्ट' हा प्रसिध्द कायदा जन्माला आला, तो आजही जारी आहे; १२६ वर्षांपूर्वीच्या या जुन्या हुकूमान्वये आज कितीतरी लोक तुरुंगात ठेवण्यात आलेले आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel