बंगाली हिंदुसमाजाच्या वरच्या पातळ थरावर हा असा परिणाम होत होता.  बहुजन हिंदुसमाजावर या गोष्टींचा प्रत्यक्ष परिणाम फारसा होत नव्हता, आणि हिंदू पुढारीही बहुजनसमाजाकडे क्वचितच लक्ष देत.  मुसलमानांवर काही वैयक्तिक अपवाद सोडले तर कसलाच परिणाम झाला नाही.  नवीन शिक्षणापासून हेतुपुरस्सर ते दूर राहिले.  आर्थिक दृष्ट्या ते आधीपासूनच मागासलेले होते व आता तर ते अधिकच मागे पडले.  एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये एकाहून एक वरचढ अशा थोर हिंदूंची मालिकाच्या मालिका दिसते, परंतु त्या काळात नाव घेण्यासारखा एकही बंगाली मुसलमान पुढारी दिसत नाही.  बहुजनसमाजाच्या दृष्टीने हिंदू काय, मुसलमान काय दोघांची एकच दशा होती.  त्यांच्यात फारसा फरक नव्हता.  त्यांच्या चालीरीती, त्यांची राहणी, त्यांची भाषा, त्यांचे समान दारिद्र्य आणि समान विपन्नावस्था यांत काही फरक नव्हता.  बंगाली हिंदु-मुसलमानांत धार्मिक दृष्ट्या जितका कमी भेद होता तितका हिंदुस्थानात अन्यत्र क्वचितच आढळेल.  बंगालमधील शेकडा ९८ मुसलमान हिंदुधर्मातून आलेले होते.  ते हिंदू समाजाच्या अत्यंत खालच्या थरातून बहुधा आलेले होते.  लोकसंख्येत हिंदूंहून थोडेसे अधिक मुसलमानांचे प्रमाण होते. (आज बंगालमध्ये पुढीलप्रमाणे आहेत-५३ टक्के मुसलमान, ४६ टक्के हिंदू, १ टक्का इतर.)

ब्रिटिश संबंधांचे हे पहिले परिणाम आणि त्यातून उत्पन्न होणार्‍या आर्थिक, सामाजिक, राजकीय, बौध्दिक, इत्यादी नानाविध चळवळी ज्याप्रमाणे बंगालमध्ये दिसतात, त्याचप्रमाणे इतर प्रांतांतही थोड्या कमी प्रमाणात दिसू येतात.  बंगाल सोडून इतर प्रांतांमध्ये जुन्या सरंजामशाहीचा आणि जुन्या आर्थिक व्यवस्थेचा तितका संपूर्ण विनाश एकदम न होत हळूहळू होत गेला.  तसे खरोखर पाहिले तर १८५७ चे बंड सरंजामशाहीनेच केले, आणि मोड झाला तरीही संपूर्णपणे त्या पध्दतीचा नाश झाला नाही.  उत्तर हिंदुस्थानातील मुसलमान बंगाली मुसलमानांपेक्षा कितीतरी सुसंस्कृत आणि सुसंपन्न होते.  परंतु पाश्चिमात्य शिक्षणापासून ते सुध्दा मुद्दाम दूर राहिले.

हिंदूंनी हे शिक्षण मुसलमानांपेक्षा लवकर, सहज उचलले आणि पाश्चिमात्य विचारांचा त्यामुळे त्यांच्यावर अधिक परिणाम झाला.  प्रतिष्ठित व्यवसायात आणि दुय्यम सरकारी नोकरीत हिंदूच अधिक असत, मुसलमान कमी होते.  फक्त पंजाबात हा फरक कमी दिसे. 

१८५७ च्या बंडाचा भडका उडाला व बंडाचा मोड झाला.  परंतु बंगालला त्याचा स्पर्शही झाला नाही.  सर्व एकोणिसाव्या शतकभर नवीन इंग्रजी शिक्षण घेतलेला हा मुख्यत: हिंदू वर्ग इंग्लंडकडे मोठ्या कौतुकाने पाही, व इंग्लंडच्या सहकार्याने व साहाय्यानेच हिंदुस्थानची प्रगती होईल अशी त्यास आशा वाटे.  बंगालमध्ये सांस्कृतिक नवयुग जन्माला आले व बंगाली भाषेची चांगलीच भरभराट झाली, आणि बंगाली पुढारी हेच राजकीय क्षेत्रात हिंदुस्थानचेही पुढारी झाले.

त्या काळातील बंगाली लोकांची मने इंग्लंडवरच्या श्रध्देने कशी भारलेली होती आणि जुन्या सामाजिक चालीरीतींविरुध्द बंडखोरी करायला कशी उत्सुक होती याची काहीशी कल्पना रवींद्रनाथ टागोर यांची आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जो सहृदय संदेश दिला त्यावरून येईल.  १९४१ च्या मे महिन्यात त्यांनी हा संदेश दिला व लवकच ते मरण पावले.  त्या संदेशात ते म्हणतात : ''माझ्या आयुष्यातील पाठीमागच्या अनेक वर्षांच्या कालखंडाकडे मी जेव्हा दृष्टी फिरवतो व माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या आरंभीच्या विकासाचा इतिहास मला यथाप्रमाणे स्पष्ट दिसतो, तेव्हा माझ्या आणि माझ्या देशबांधवांच्याही वृत्तीत आणि मनारचनेत झालेले स्थित्यंतर विशेष लक्षात भरते.  हा जो फरक पडला आहे त्यातच गंभीर आणि दु:खद घटनांची कारणे सामावली आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel