तरीही अनेक प्रतिष्ठित मुसलमान राष्ट्रीय सभेला येऊन मिळाले.  ब्रिटिशांचे धोरण मुसलमानांना, विशेषत: राष्ट्रीय चळवळीला जे विरोधी होते त्या मुसलमान गटांना तरी निश्चितपणे अधिक अनुकूल दिसू लागले.  परंतु विसाव्या शतकाच्या आरंभी मुसलमानांच्या तरूण पिढीत तरी राष्ट्रीयतेचे राजकीय वारे अधिक वाहू लागले.  या वाढत्या राजकीय आकांक्षांचा भडका होऊ नये, या राजकीय विचारांना सोवळे रूप यावे म्हणून ब्रिटिश सरकारच्या स्फूर्तीने १९०६ मध्ये 'मुस्लिम लीग' स्थापन करण्यात आली.  आगाखान हे त्या वेळेस या नवीन संस्थेचे अध्वर्यू होते, एक आधारस्तंभ होते.  लीगचे मुख्य हेतू दोन होते : १ ब्रिटिशांशी राजनिष्ठा; २ मुस्लिम हितसंबंधांचे संरक्षण.

एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, १८५७ च्या भडक्यानंतर जे जे मुसलमान पुढारी दिसतात- त्यांत सर अहमदसुध्दा-ते ते परंपरागत मुस्लिम शिक्षण घेतलेले होते.  काहींनी पुढे इंग्रजी शिक्षण घेतले आणि नवीन विचारांचा त्यांच्यावर परिणाम झाला ही गोष्ट निराळी.  नवीन पाश्चिमात्य शिक्षणाने अद्याप एकही थोर व्यक्ती त्यांच्यात झाली नव्हती.  एकोणिसाव्या शतकातील महाकवी गालिब हा उर्दूतील कवींचा कवी होता.  १८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दापूर्वी तो ऐन भरात होता.

विसाव्या शतकाच्या आरंभाला हिंदी सुशिक्षित मुसलमानांत दोन विचारधारा दिसून येतात; दोन विचारप्रणाली दिसतात.  तरुणांच्या मनात विशेषेकरून राष्ट्रीयतेचे विचार होते, तर काहींच्या मनात भारतीय भूतकाळापासून निराळा असा, भारताच्या वर्तमानकाळापासूनही निराळा असा सूर होता; त्यांचे लक्ष बाहेरच्या इस्लामी देशांकडे अधिक जाऊ लागले; विशेषत: खिलाफतीचे स्थान जो तुर्कस्थान तिकडे त्यांची दृष्टी गेली.  तुर्की सुलतान अब्दुल हमीद याने सर्वंकष इस्लामी चळवळ सुरू केली होती.  हिंदी मुसलमानांमधील वरिष्ठ वर्गातील काहींना या चळवळीविषयी सहानुभूती वाटत होती.  सर सय्यद अहमद यांनी तुर्कस्थान आणि तेथील सलतनत यांच्या भानगडीत हिंदी मुसलमानांनी पडू नये असे निक्षून लिहिले.  पुढे तुर्कस्थानात तरुण तुर्क पक्षाच्या चळवळी सुरू झाल्या.  हिंदी मुसलमानांच्या मनात त्यांच्यासंबंधी संमिश्र भावना होत्या.  आरंभी बहुतेक सर्व मुसलमानांची तरुण तुर्कांच्या चळवळीविरुध्द मते होती.  त्यांची सहानुभूती सुलतानाकडे होती.  युरोपियन सत्ताधार्‍यांची तुर्कस्थानासंबंधी जी कारस्थाने चालू होती, त्यांना पुरे पडणारा हा सुलतानच आहे अशी भावना होती.  परंतु तरुण तुर्कांच्याकडे सहानुभूतीने पाहणारेही काही मुसलमान येथे होते आणि त्यातच अबुल कलाम आझाद हेही होते.  त्यांनी तरुण तुर्कांच्या संघटनेचे आणि त्यांनी ज्या राजकीय सुधारणांचे सुलतानाकडून अभिवचन घेतले त्याचे अभिनंदन केले.  पुढे १९११ मध्ये इटलीने त्रिपोलीच्या युध्दात एकाएकी तुर्कस्थानवर हल्ला केला; पुढे १९१२-१३ मध्ये बाल्कन युध्द सुरू झाले.  तुर्कस्थानवर आलेल्या या संकटामुळे हिंदुस्थानभर सुलतानांविषयीच्या सहानुभूतीची एक प्रचंड लाट उसळली.  सर्वच हिंदी लोकांनाही सहानुभूती वाटत होती; परंतु मुसलमानांच्या भावना अधिक खोल होत्या.  त्यांना जणू स्वत:वर संकट आल्यासारखे वाटले.  आपले काहीतरी धोक्यात आहे असे वाटले.  एकुलते एक स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रही अस्तंगत होणार आणि धर्माचा भविष्यकालीन एकमात्र आधारही जाणार असे त्यांना वाटले.  डॉ. एम. ए. अन्सारींनी एक चांगले शुश्रूषापथक स्वत:च्या नेतृत्वाखाली नेले.  गरिबातल्या गरिबांनीही त्या पथकास मदत दिली.  हिंदी मुसलमानांच्या हितकारक गोष्टींसाठी पैसा जमला नसेल इतक्या त्वरेने या कामासाठी पैशांचा पाऊस झाला.  पुढे ते पहिले जगड्व्याळ युध्द आले.  तुर्कस्थान ब्रिटिशांच्या विरुध्द असल्यामुळे हिंदी मुसलमानांची कसोटीच होती.  परंतु अगतिक असल्यामुळे ते काही करू शकले नाहीत.  जेव्हा युध्द थांबले तेव्हा त्यांच्या कोंडलेल्या भावनांचा खिलाफतीच्या चळवळीच्या रूपाने आगडोंब पेटला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel