सनातनत्व आणि अराष्ट्रीयत्व यांच्या या किल्ल्यावर अबुल कलाम आझादांनी हल्ले चढविले.  हे हल्ले प्रत्यक्ष नव्हते, तर अलीगढी वातारवण आणि परंपरा यांना सुरुंग लावणार्‍या विचारांचा प्रसार करून त्यांनी हे काम चालविले.  या तरुण लेखकाने मुस्लिम बौध्दिक गोटात विलक्षण खळबळ उडवून दिली, आणि पोक्त मंडळींनी जरी डोळे वटारले आणि आठ्या पाडल्या तरी तरुण पिढीच्या मनात नवचैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहिले नाही.  तुर्कस्थान, इजिप्त, इराण इत्यादी देशांतील घडामोडींनी, तसेच हिंदी राष्ट्रीय चळवळीच्या वाढीमुळे हे चैतन्य, हा प्रक्षोभ आधीच सुरू झाला होता.  आझादांनी या प्रक्षोभाला निश्चित वळण दिले.  त्यांनी दाखवून दिले की, इस्लाम आणि इस्लामी राष्ट्रांविषयी सहानुभूती आणि हिंदी राष्ट्रवाद यांत विरोध नाही.  त्यामुळे मुस्लिम लीग राष्ट्रसभेच्या जवळ यायला मदत झाली.  आझाद लीगमध्ये अगदी लहानपणीच दाखल झाले होते.  १९०६ मधील लीगच्या पहिल्या अधिवेशनाला लीगचे सभासद म्हणून ते हजर राहिले होते.  ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधींना अल्-हिलाल रुचेना.  त्याच्याजवळ जामिनकी मागण्यात आली आणि महायुध्द सुरू झाल्यावर छापखानाच जप्त करण्यात आला.  दोन वर्षांच्या अल्पजीवी कारकीर्दीनंतर अल्-हिलाल बंद पडले.  आझादांनी ''अल्-बलाघ'' म्हणून नवीन साप्ताहिक सुरू केले.  परंतु १९१६ मध्ये आझादांना स्थानबध्द करण्यात आल्यामुळे या पत्रकाचीही इतिश्री झाली. चार वर्षे आझाद स्थानबध्दतेत होते, आणि बाहेर येताच राष्ट्रीय सभेच्या अव्वल पुढार्‍यांपैकी ते एक झाले.  त्या वेळेपासून राष्ट्रीय सभेच्या उच्च कार्यकारिणी समितीत ते सदैव आहेत.  ते वयाने लहान असले तरी काँग्रेसमधील वडील मंडळींपैकी तेही एक समजले जातात.  राष्ट्रीय आणि राजकीय महत्त्वाच्या गोष्टींत तसेच जातीय आणि अल्पसंख्याकांच्या प्रश्नांच्या बाबतीत त्यांचा सल्ला मोलाचा मानण्यात येतो.  राष्ट्रीय सभेचे दोनदा ते अध्यक्ष निवडले गेले आणि तुरुंगात कितीतरी वर्षे त्यांची गेली.

अल्-हिलालच्या आधी १९१२ मध्येच दुसरे निघालेले साप्ताहिक म्हणजे इंग्रजीतील ''दि कॉम्रेड'' हे होय.  मुसलमानांतील तरुण इंग्रजी सुशिक्षित वर्गावर या पत्राचा फार परिणाम झाला.  मौलाना महंमद अली हे या पत्राचे संपादक.  इस्लामी परंपरा आणि ऑक्सफर्ड येथील शिक्षण यांचे एक विचित्र मिश्रण म्हणजे मौलाना.  प्रथम अलीगड परंपरेचे ते कट्टे पुरस्कर्ते होते.  चढाऊ राजकारणाच्या ते विरुध्द होते.  परंतु त्या चकटबद चौकटीत कोंडून पडणारे त्यांचे व्यक्तिमत्व नव्हते.  त्यांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी, समर्थ आणि शक्तिशाली होते. ते पुढे जाणारे होते, गतिशील होते.  त्यांची भाषा जोरदार असे; विशिष्ट अशी त्यांची शैली होती.  १९११ मध्ये बंगालची फाळणी रद्द झाली आणि ब्रिटिशांवरचा त्यांचा विश्वास उडाला.  बाल्कन युध्दामुळे त्यांचे हृदय द्रवले आणि तुर्कस्थान आणि इस्लामी परंपरा यांच्यासंबंधी भावनोत्कट असे लिखाण त्यांनी केले.  ते अधिकाधिक ब्रिटिशद्रोही होत गेले आणि पहिल्या महायुध्दात तुर्कस्थानचा प्रवेश झाल्यावर तर त्यांच्या ब्रिटिश विरोधीची परिसीमा झाली.  कॉम्रेड पत्रात त्यांनी तो विख्यात असा मोठा लेख लिहिला.  (त्यांची भाषणेही लांबलचक असत.  थोडक्यात सांगण्याची चूक त्यांनी कधी केली नाही.) 'चॉइस ऑफ द टर्क्स—तुर्कांनी घेतलेला निर्णय', हे त्या लेखाचे नाव.  त्या लेखामुळे सरकाने ते पत्र तत्काळ बंद केले.  लौकरच त्यांना आणि त्यांचे बंधू शौकत आली यांनाही सरकाने अटक करून बंदिस्त करून ठेवले.  लढाई संपल्यावरही एक वर्ष ते स्थानबध्दच होते.  १९१९ च्या अखेरीस त्यांना मुक्त करण्यात आले.  दोघे ताबडतोब राष्ट्रसभेचा येऊन मिळाले.  १९२० च्या त्या काळात खिलाफतीच्या चळवळीत आणि काँग्रेसच्या राजकारणात अलीबंधूंनी महत्त्वाची कामगिरी बजावली.  त्यांना त्यासाठी कारागृहवास भोगावा लागला.  राष्ट्रीय सभेचे मौलाना महमद अली अध्यक्षही निवडे गेले होते आणि बरीच वर्षे राष्ट्रीय सभेच्या सर्वश्रेष्ठ कार्यकारी मंडळाचे ते सभासदही होते.  १९३० मध्ये ते निधन पावले.

महंमद अलींत झालेला बदल हिंदी मुसलमानांच्या बदलत्या वृत्तीचे द्योतक होता.  राष्ट्रीय विचारधारेपासून मुसलमानांना अलिप्त राखण्यासाठी मुस्लिम लीगचा जन्म झालेला, प्रतिगामी आणि अर्धवट सरंजामशाही वृत्तीच्या लोकांची तिच्यावर सत्ता, असे असूनही तरुण पिढीचा वाढता जोर, तिचे वाढते दडपण मुस्लिम लीगला मान्य करावे लागले.  राष्ट्रयतेच्या वाढत्या लाटेबरोबर नाखुशीने का होईना लीग हळूहळू काँग्रेसच्या जवळ येत होती.  १९१३ मध्ये राजनिष्ठेचे ध्येय बदलून हिंदी स्वराज्याच्या मागणीचे ध्येय नमूद करण्यात आले.  अल्-हिलालमध्ये आपल्या प्रभावी आणि सामर्थ्यसंपन्न लेखातून मौलाना अबुल कलाम आझाद यांनीच या फरकाचा पुरस्कार केला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel