आणि नंतर गांधीजी आले.  पर्वतावरून येणार्‍या प्राणदायी वार्‍याच्या झुळकीप्रमाणे ते वाटते.  आम्ही जरा नीट हवा आत घेतली.  छाती जरा रुंद झाली.  सभोवतालच्या अंधकाराला भेदीत सूर्यकिरणाप्रमाणे ते आले.  आमच्या डोळ्यावरची झापट त्यांनी उडविली.  एखादा झंजावात यावा आणि उलथापालथ व्हावी तसे झाले.  विशेषत: आमच्या मनोव्यापारात त्यांनी क्रांती केली.  ते आकाशातून अवतरले असे वाटले नाही.  कोट्यवधी हिंदी जनतेतूनच ते पुढे आले असे दिसत होते.  ते बहुजनसमाजाची भाषा बोलत; त्यांच्याकडे आणि त्यांच्या अपरंपार दारिद्र्याकडे ते बोट दाखवीत.  ''तुम्ही सारे त्यांच्या रक्तावर जगत आहात, त्यांच्या शोषणावर जगत आहात; त्यांच्यावर तुमचे ओझे घालू नका; उतरा त्यांच्या पाठीवरून खाली,'' असे ते म्हणाले. ''हे दु:ख आणि दारिद्र्य ज्या पध्दतीमुळे पैदा होते, ती पध्दत फेका,'' ते म्हणाले.

राजकीय स्वातंत्र्याला नवीन रंगरूप आले.  त्यात नवीन अर्थ आला.  गांधीजींच्या म्हणण्यातील सारेच आम्ही स्वीकारीत असू असे नव्हे; पुष्कळदा बरेचसे स्वीकारीतही नसू.  परंतु मुद्दयाची गोष्ट ही नव्हती.  त्यांच्या शिकवणीचे सार निर्भयता, सत्य आणि प्रत्यक्ष कृती यात साठविलेले होते.  आणि जनतेचे, दारिद्री नारायणाचे कल्याण सदैव दृष्टीसमोर ठेवून वागणे.  प्राचीन ग्रंथातून पुन:पुन्हा आम्हाला सांगण्यात आले आहे की व्यक्तीला काय किंवा राष्ट्राला काय, सर्वांत मोठा वर जर कोणता असेल तर तो अभय हा होय.  केवळ शारीरिक धैर्यच नव्हे तर नैतिक धैर्य, मनातून भीती अजिबात काढून लावणे.  आपल्या इतिहासाच्या प्रात:काळीच जनक आणि याज्ञवल्क्य यांनी सांगितले आहे की, लोकाग्रणींचे मुख्य काम लोकांना निर्भय करणे हे आहे.  परंतु ब्रिटिश सत्तेचा आधार येथे असलेल्या सर्वव्यापी भीतीवर होता.  प्राणघेणी, गुदमरवणारी, अपार भीती.  सैन्याचे भय, पोलिसांचे भय, गुप्त पोलिसांचे भय, सरकारी अधिकार्‍यांचे, चिरडणार्‍या कायद्यांचे, तुरुंगाचे भय, जमीनदारांच्या हस्तकांचे भय, सावकाराचे भय, बेकारीचे आणि उपासमारीचे भय; उपासमार तर रोज उठून दारात; अशा या सर्वव्यापी भीतीविरुध्द गांधीजींनी आपली शान्तदान्त परंतु वज्रसम निश्चयाची धीरगंभीर वाणी उच्चारिली.  ''मा भी:'', असे नाभिवचन, निर्भयतावचन त्यांनी उच्चारिले.  हे का सारे इतके सोपे होते ?  केवळ भिऊ नको असे म्हणून का भीती जाणार होती ? सारे साधणार होते ? असे नव्हे.  परंतु भीतीमुळे नसती विघ्नेही उत्पन्न होत असतात.  भीती काल्पनिक भुतेही निर्माण करते.  आपण शांतपणे प्रत्यक्ष परिस्थितीचे जेव्हा पृथक्करण करू लागतो, तिचे शांत परिणाम स्वेच्छेने स्वीकारायला तयार होतो, तेव्हा प्रत्यक्षाचा मग फारसा बाऊ वाटेनासा होतो.

आणि एकाएकी लोकांच्या देहावरचे भीतीचे ते कफन दूर झाले.  संपूर्णपणे भीती गेली असे नव्हे.  परंतु बरीच भीती दूर झाली.  आश्चर्यकारक अशी ती घटना होती.  आणि भीती आणि असत्य ज्याप्रमाणे जवळजवळ राहतात त्याप्रमाणे निर्भयतेजवळ सत्य असते.  हिंदी लोक होते त्यापेक्षा अधिक सत्यमय झाले असे नव्हे; एका रात्रीत त्यांनी आपला स्वभाव बदलला असे नव्हे, तरीही प्रचंड फरक दिसून येऊ लागला.  हांजीहांजीपणाची, खोटेपणाची गरज भासेनाशी झाली.  हा मनोरचनेतील बदल होता.  एखादा बरेच दिवसाचा रुग्णाईत असावा आणि मानसोपचार पध्दतीतील एखाद्या पारंगताने यावे, रोग्याच्या गतजीवनात खूप खोल शिरून सर्व गुंतागुंतीचा छडा त्याने लावावा; आणि ती सारी कारणे रोग्यासमोर मांडून मनातील ओझे दूर करावे त्याप्रमाणे गांधीजींनी केले.

दुसरे म्हणजे मानसिक प्रतिक्रियाही त्याचबरोबर होती.  ज्या परसत्तेमुळे आपण इतके अध:पतित झालो, दीनहीन केले गेलो, तिच्यापुढे इतके दिवस आपण मान कशी झुकविली याची राष्ट्राला शरम वाटू लागली, आणि काहीही झाले तरी अत:पर या सत्तेला शरण जायचे नाही ही इच्छा राष्ट्रात निर्माण झाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel