पूर्वीपेक्षा आम्ही अधिक खरेपणाने वागू लागलो, अधिक सत्यनिष्ठ झालो असे नाही. परंतु नितांत सत्याची मूर्ती म्हणून गांधीजी सदैव समोर असत.  ते आम्हांला वर खेचीत, लाजवीत आणि सत्याकडे ओढीत.  सत्य म्हणजे काय ?  मला तरी निश्चित सांगता येत नाही.  आणि आपली दैनंदिन सत्ये ही बहुधा सापेक्ष असतात.  निरपेक्ष सत्य हे आपल्या पलीकडे आहे.  निरनिराळी माणसे सत्यासंबंधी निरनिराळी दृष्टी घेऊ शकतील, घेतात; आणि प्रत्येक व्यक्तीवर विशिष्ट पार्श्वभूमीचा, शिक्षणाचा, भावभावनांचा, सहजप्रवृत्तींचा जबरदस्त परिणाम झालेला असतो.  गांधीजींची तीच गोष्ट.  परंतु स्वत:ला जे वाटते की हे सत्य आहे, ते आपले सत्य. व्यक्तीला जी गोष्ट सत्य म्हणून वाटते ते त्या व्यक्तीचे सत्य.  या व्याख्येप्रमाणे गांधीजींच्या इतका सत्यनिष्ठ पुरुष मला तरी माहीत नाही. राजकारणी मनुष्यांत इतकी सत्यनिष्ठा असणे म्हणजे हा धोक्याचा सद्‍गुण होय; कारण असा पुरुष स्वत:चे मन बोलून दाखवितो आणि मनातील फेरबदल, मनातील घडामोडी तो लोकांसमोर उघड्या करून ठेवतो की त्यांनी पाहावे.

गांधीजींनी कमी-अधिक प्रमाणात लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम केला आहे.  काहींनी आपल्या जीवनाचा सारा प्रवाहच बदलला.  काहींवर तितका खोल परिणाम झाला नाही, किंवा तो परिणाम निघून गेला म्हणा; परंतु सर्वस्वी पुसला जाणे शक्यच नव्हते.  निरनिराळ्या लोकांवर निरनिराळ्या प्रतिक्रिया झाल्या.  आणि जो तो या प्रश्नाला स्वत:चे काय ते उत्तर देईल.  प्लेटोच्या संवादातील अल्सिबायडीसप्रमाणे कोणी म्हणतील, ''दुसरा कोणी बोलू लागला आणि तो कितीही वक्तृत्वपूर्ण बोलत असला तरी त्याचे बोलणे ऐकावेसे वाटत नाही; तो काय बडबडत आहे याची आम्हाला मुळीच फिकीर नसते.  परंतु जेव्हा तुमचे बोलणे आम्ही ऐकू लागतो, किंवा तुमचे शब्द म्हणून जेव्हा कोणी सांगू लागतो (जरी तितक्या चांगल्या रीतीने त्याला तुमचे म्हणणे मांडता आले नाही तरी) तेव्हा आम्ही सारी चकित होतो, थक्क होतो, मुग्ध होतो.  स्त्री असो, पुरुष असो वा लहान बाळ असो.  सर्वांवर हा असा विलक्षण परिणाम होतो.  आणि सभ्यगृहस्थहो, माझ्याविषयी मी काय सांगू ?  तुम्ही कदाचित म्हणाल की अतिशयोक्तीने बोलत आहे.  परंतु मला त्याची भीती नाही.  मी प्रतिज्ञेवर सांगतो की, त्यांच्या शब्दांचा आश्चर्यकारक परिणाम माझ्यावर झालेला आहे.  खरे म्हणजे अद्यापही तो परिणाम आहे.  त्यांची वाणी कानी पडू लागताच एक प्रकारचा सात्त्विक संताप हृदयात प्रज्वलित होतो.  एक प्रकारचा पवित्र संताप हृदयावर आघात करतो; गळा दाटून येतो, डोळे भरून येतात, मी सद्‍गदित होतो-गहिवरतो.  आणि खरेच सांगतो माझ्या एकट्याचीच अशी स्थिती होत नाही, हजारोंची होते.

''होय, पेरिक्लिससारख्या थोर थोर वक्त्यांची भाषणे मी ऐकली आहेत.  ते सारे उत्कृष्ट वक्ते आहेत यात संशय नाही,  परंतु त्यांच्या शब्दांचा इतका परिणाम झाला नाही.  त्यांनी माझे स्वरूप मला उघडेनागडे करून कधी दाखविले नाही.  किती मी हीनदीन किती पतिताहून पतीत अशी भावना त्यांनी माझ्यामध्ये कधीही निर्माण केली नाही.  परंतु याची गोष्टच निराळी.  परवाचीच गोष्ट, माझ्या मनाची विलक्षण स्थिती झाली.  ज्या रीतीने आपण जगत आहोत त्याचप्रमाणे अत:पर जगता कामा नये; अत:पर तसे जगणे केवळ अशक्य असे माझ्या मनात आले.  कितीतरी वेळा माझ्या मनाची याच्या बोलण्याने अशी स्थिती होते.

''आणि दुसर्‍या कोणत्याही संमतीने किंवा संभाषणाने न वाटणारी अशी आणखीही एक गोष्ट आहे.  माझ्यामध्ये तुम्ही ती गोष्ट कधी अपेक्षिणारही नाही.  कोणती बरे ती गोष्ट?  लज्जा, शरम.  जगात सॉक्रे़टिस ही एकच व्यक्ती आहे, की जी मला खाली पाहायला लावते; माझ्यात लज्जा, शरम उत्पन्न करू शकते.  निरुपाय होतो आणि त्याने सांगितल्याप्रमाणे वागलेच पाहिजे असे वाटू लागते.  परंतु त्याच्या दृष्टिपथातून दूर जाताच पुन्हा लोकांबरोबर मी वाटेल ते करू लागतो.  काही विधिनिषेध ठेवीत नाही.  म्हणून एखाद्या चोराप्रमाणे, पळून गेलेल्या गुलामाप्रमाणे त्याच्या दृष्टीस न पडण्याची मी खबरदारी घेतो; शक्यतोवर त्याच्यापासून दूर राहतो.  परंतु पुन्हा कधी गाठ पडली म्हणजे पूर्वी कबूल केले होते त्याची आठवण येते आणि साहजिकच लाजेने माझी मान खाली होते.

''सर्पाहूनही भयंकर विषारी अशा कोणीतरी आत दंश घेतला असे वाटते; खरोखर इतकी वेदना देणारा तो चावा असतो की काय सांगू; सदसव्दिवेक बुध्दीचा हा हृदयाला घेतलेला, मनाला घेतलेला, आत्म्याला घेतलेला-जे काय म्हणायचे असेल ते म्हणा-त्या आतल्या गाभ्यातील हा चावा असतो.''*
-------------------------
*  '' फाईव्ह डायलॉग्ज ऑफ प्लेटो - प्लेटोचे पाच संवाद '' (एव्हरीमन्स लायब्ररी.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel