सनदी नोकरशाहीची कार्यक्षमतेविषयी प्रसिध्दी आहे.  त्यांनी स्वत:चीच केलेली ही जाहिरात आहे.  परंतु स्वत:च्या कामाच्या मर्यादित क्षेत्राबाहेर ते नालायक असतात, अगतिक असतात असे दिसून आले.  ज्या कामाची सवय ते त्यांना जमे.  लोकशाही पध्दतीने काम करण्याचे त्यांना अजिबात शिक्षण नसे.  त्यामुळे जनतेची सदिच्छा आणि सहकार्य ते मिळवू शकत नसत.  जनतेची त्यांना भीती वाटे आणि तिरस्कारही वाटे.  सामाजिक प्रगतीच्या दूरगामी, मोठमोठ्या योजनांची त्यांना कल्पना नसे; त्या कामात ते आपल्या कायदेशीरपणाने, प्रतिभा आणि कल्पनाशक्तीच्या अभावाने अडथळे मात्र आणू शकत.  काही व्यक्ती सोडल्या तर हे वर्णन गोर्‍या व हिंदी दोन्ही प्रकरच्या अंमलदारांना लागू आहे.  समोर येऊन पडणार्‍या नवीन कामांना हे इतके कसे नालायक असे मनात येऊन आश्चर्य वाटे.

राष्ट्रसभेच्या प्रांतिक सरकारांतही कार्यक्षमतेचा, पात्रतेचा बराचसा अभाव होता.  परंतु त्यांना अपार उत्साह होता, स्फूर्ती होती.  जनतेशी त्यांचा संबंध होता.  चुकांतून, अनुभवातून शहाणे होत जाण्याची इच्छा आणि पात्रता होती.  त्यांच्यात प्राणमयता होती; उतू जाणारी जीवनशक्ती होती; कधी होतात सार्‍या गोष्टी अशी उत्कंठा होती.  मनावर ताण होता. जबाबदारी होती.  भराभरा कामे व्हावी अशी इच्छा होती.  नोकरशाहीच्या वृत्तीतील आणि राष्ट्रसभेच्या मंत्र्यांच्या वृत्तीतील हा जमीन-आस्मानाचा फरक दिसून येई.  सत्ताधारी ब्रिटिशवर्ग आणि त्यांचे आधारदाते हे उदासीन असत, प्रतिगामी असत. हिंदुस्थान देश परंपरेचा भक्त.  परंतु भूमिकांत बदल झाल्याचा अपूर्व देखावा येथे दिसून येत होता.  गतिमान समाजाचे प्रतिनिधी म्हणून जे ब्रिटिश येथे आले, तेच आता अपरिवर्तनीय परंपरेचे, गतिहीण स्थाणुवत परंपरेचे मुख्य पुरस्कर्ते झाले; आणि हिंदी समाजातच अनेकजण नवीन गतिमान व्यवस्थेचे, प्रगतीचे पुरस्कर्ते दिसू लागले.  बदल व्हावा म्हणून ते अधीर झाले होते.  राजकीय क्षेत्रातीलच बदल नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील बदल केव्हा होतो यासाठी ते तहानले होते.  या प्रगतिपर हिंदी लोकांच्या पाठीमागे नवीन प्रचंड शक्ती कार्य करून राहिल्या होत्या.  त्यांची या प्रगतिपर हिंदी लोकांनाही नीटशी जाणीव नव्हती.  या भूमिकांच्या अदलाबदलीमुळे भूतकाळात हिंदुस्थानात ब्रिटिशांनी जर काही नवनिर्मितीचे, प्रगतीचे कार्य केले असेल तर तेही संपुष्टात आले होते.  आता ते केवळ प्रगतिविरोधी दगड होऊन पडले होते.  त्यांचे अधिकारी जीवनही मंदावत चालले होते, आणि हिंदुस्थानसमोर असलेल्या नानाविध प्राणमय प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत ते केवळ अक्षम होते; नालायक होते.  त्यांच्या बोलण्यासवरण्यात पूर्वी नि:संदिग्धता आणि सामर्थ्य असे.  परंतु आता त्यांचे बोलणेही अर्थहीन, गोंधळलेले, बावळटपणाचे दिस लागले.

ब्रिटिश अधिकार्‍यांनी बरेच वर्षांपासून एक दंतकथा पसरवून ठेवली आहे.  कोणेती बरे ही दंतकथा ?  ही दंतकथा अशी की ब्रिटिश सरकार हिंदुस्थानातील वरिष्ठ सनदी नोकरांच्या द्वारा राज्य कसे चालवावे ही कठीण आणि गुंतागुंतीची कला हिंदी जनतेला शिकवीत आहे.  परंतु ब्रिटिश येथे येण्यापूर्वी दोनचार हजार वर्षे तरी आम्ही कारभार केला होता, आम्ही त्यात यशस्वीही झालो होतो.  या कित्येक हजार वर्षांच्या शिक्षणाने ब्रिटिशांपेक्षा आम्हीच यात अधिक पुढारलेले होतो.  जे काही सद्‍गुण असायला पाहिजेत ते आमच्यात नाहीत ही गोष्ट खरी.  परंतु ब्रिटिश सत्तेखालीच आमच्यातील ही उणीव विशेषकरून वाढली असे काही लोकांचे म्हणणे आहे.  कदाचित असे म्हणणारी माणसे राजद्रोही असतील.  ते काही असो.  आमच्यात कितीही दोष असोत, उणिवा असोत.  एक गोष्ट; स्पष्ट होती की, कायमच्या सनदी नोकरीतील बडे लोक हिंदुस्थानला प्रगतीच्या दिशेने न्यायला संपूर्णपणे नालायक होते.  जे त्यांचे गुण म्हणून होते, ते गुणामुळेच आम्हाला ते मुळीच उपयोगी पडू शकत नव्हते.  कारण पोलिस-दंडेलीच्या राज्यात जे गुण लागत असतात, ते प्रगतिपर लोकसत्ताक राज्यात लागणार्‍या गुणाहून निराळेच असतात.  दुसर्‍यांना शिकविण्याचे धाडस करण्यापूर्वी, त्यांनी स्वत:चेच काही शिक्षण आधी विसरून जाणे जरूर आहे; आपले पूर्वीचे स्वरूप अजिबात विसरून जाण्यासाठी विस्मृती पाडणार्‍या लिथी नदीच्या पाण्यात त्यांनी स्नान करून येणे बरे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel