हिंदुस्थानात युध्दकाळात कोठल्याही प्रकारची वाहतूक ही एक मोठी अडचणीची बाब होऊन बसली.  वाहतुकीच्या मोठमोठ्या मोटारी, पेट्रोल, रेल्वेची इंजिने व आगगाड्यांचे डबे सगळ्यांचाच तुटवडा पडत होता, दगडी कोळसासुध्दा मिळत नव्हता.  युध्द सुरू होण्यापूर्वीच हिंदुस्थानतर्फे या बाबतीत ज्या योजना सुचविण्यात आल्या होत्या त्या जर अशा नापसंत झाल्या नसत्या तर ह्यातल्या बहुतेक सार्‍या अडचणी अधिक सुलभतेने सोडविता आल्या असत्या.  रेल्वेची इंजिने, डबे, मोठ्या मोटारी, इतकेच नव्हे तर चिलखती वाहनेसुध्दा हिंदुस्थानात तयार करता आली असती.  पेट्रोलच्या दुर्भिक्ष्यामुळे आलेली अडचण, वाईट गुळाच्या राबेपासून काढता येणारा व हरतर्‍हेच्या यंत्रांना चालणारा मद्यार्क जळण म्हणून वारपूर ते दुर्भिक्ष्य थोडेफार हटविता आले असते.  दगडी कोळशाची बाब घेतली तर त्याचा वाटेल तेवढा साठा हिंदुस्थानातील भूमीत पडला होता, हा कोळसा वाटेल तेवढा भूमिगर्भात शिलकी पडून होता.  पण त्याला वापरण्याकरता असा फारच थोडा खणून काढण्यात आला.  दगडी कोळशाची मागणी सारखी वाढत असूनही प्रत्यक्षात कोळशाचे उत्पादन युध्दकाळात उलटे फारच कमी झाले.  कोळशाच्या खाणीतून काम करणारांच्या भोवतालची परिस्थिती इतकी वाईट होती व पगार इतका थोडा होता की, मजुरांना ते काम करायला काही ओढ नव्हती.  स्त्रियांनी खाणीतून काम करू नये असा जो निर्बंध तोपर्यंत होता तो सुध्दा सरकारने काढून टाकला, कारण त्या अपुर्‍या मजुरीत काम करायला स्त्रियाच मिळण्यासारख्या होत्या.  कोळशाच्या धंद्यात लक्ष घालून जरूर ती उलथापालथ, कामाच्या तर्‍हेत आवश्यक ती सुधारणा करून व मजुरी वाढवून हे खाणीतले काम करायला मजुरांचे मन घेईल अशा तर्‍हेचा काहीही प्रयत्न करण्यात आला नाही.  कोळशाच्या तुटवड्यामुळे यांत्रिक कारखान्यांची वाढ भलतीच खुंटली.  इतकेच नव्हे तर चालू कारखाने सुध्दा बंद ठेवावे लागले.

शेकडो इंजिने व हजारो डबे हिंदुस्थानातून मध्य पूर्वप्रदेशात पाठविण्यात आल्यामुळे हिंदुस्थानातली वाहतुकीची अडचण अधिकच वाढली.  काही काही ठिकाणचे रेल्वेच्या कायम लोहमार्गाचे रूळसुध्दा दुसरीकडे नेण्याकरता उपटून काढण्यात आले.  मागचापुढचा काहीही विचार न पाहता सहजासहजी हे सारे प्रकार असे काही चालले होते की, तो निष्काळजीपणा पाहून कोणीही आश्चर्याने तोंडात बोट घालावे.  पुढचा काही विचार, काही योजना यांचा मागमूससुध्दा दिसत नव्हता आणि त्याचा परिणाम असा झाला की, आलेला प्रसंग जेमतेम अपुरा निभावता निभावता त्यामुळे ताबडतोब तिसरेच काही अरिष्ट उभे राही.

सन १९३९ च्या शेवटी किंवा १९४० च्या आरंभी, हिंदुस्थानात विमाने तयार करणार्‍या कारखान्यांचा धंदा काढण्याचा एक प्रयत्न करण्यात आला.  पुन्हा एकदा एका अमेरिकन कंपनीशी सगळेच करारमदार नक्की करून इकडच्या कंपनीच्या चालकांनी हिंदुस्थान सरकार व हिंदुस्थानातील सैन्याचे सर्वश्रेष्ठ कार्यालय यांच्याकडे त्यांची संमती मिळविण्याकरता अगदी निकडीच्या तारा पाठविल्या.  पण त्या तारांचे एका शब्दानेही उत्तर आले नाही.  त्यानंतर वेळोवेळी उत्तराकरता आठवण म्हणून तगादा लावल्यावर अखेरचे एकदा उत्तर आले.  ते हे की, ही योजना त्या सरकारला व त्या कार्यालयाला नापसंत आहे.  इंग्लंड किंवा अमेरिकेकडून विमाने विकत घेता येण्यासारखी आहेत, तेव्हा येथे हिंदुस्थानात विमाने तयार कशाला करावयाची ?

युध्दापूर्वकालात हिंदुस्थानात नाना प्रकारची औषधे व रोगप्रतिबंधक लस मोठ्या प्रमाणावर जर्मनीतून येत असे, ते या युध्दामुळे बंद झाले तेव्हा लागलीच काही लोकांनी अशी सूचना केली की, यांपैकी अगदी अवश्य अशा जिनसा हिंदुस्थानात तयार होण्याजोग्या आहेत, हे काम काही सरकारी संस्थांमधून सहज करता येण्यासारखे आहे.  पण हिंदुस्थान सरकारला ही सूचना मान्य नव्हती.  त्यांचे म्हणणे जी लागतील ती औषधी द्रव्ये इंपिरीयल केमिकल इंडस्ट्रीज या विलायती कंपनीकडून मिळण्याजोगी आहेतच.  याला मूळ सूचना करणारांचे असे उत्तर होते की, ही द्रव्ये पुष्कळ कमी खर्चाने तयार होऊन त्यांचा उपयोग सैन्यालाच नव्हे तर सर्वसामान्य जनतेला ही होईल व त्यात खाजगी वैयक्तिक नफेबाजीही टाळता येईल.  तेव्हा या उत्तरात राज्याच्या धोरणासारख्या उच्च विषयात नफेबाजीसारख्या क्षुद्र विचारांचा शिरकाव होऊ देणे म्हणजे घोर पाप आहे असा आव 'सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सत्ताधारी' यांनी आणला व असल्या भिकार चाळ्यांचा आपल्याला मोठा उद्वेग वाटत असल्याचे नाटक केले.  त्यांचे उद्‍गार असे की, ''सरकार म्हणजे वाण्यासारखे नफातोटा पाहात बसणारे दुकार थोडेच असे !''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel