खरोखर पाहिले तर जो देश स्वतंत्र असेल त्या देशातच आंतरराष्ट्रीय वृत्तीची वाढ होऊ शकते.  कारण देश परतंत्र असला म्हणजे त्या देशातील जनतेचे सारे विचार, सारा उत्साह, आपल्या देशाचे स्वातंत्र्य संपादन करण्याकडे एकमेव लागलेला असतो.  शरीराला आतून पोखरणारा एखादा दुष्ट रोग लागला म्हणजे त्या शरीराचा कोणताही अवयव तो निरोगी राहू देत नाही, एवढेच नव्हे तर त्याच्या त्रासाने मनही सारखे चिडखोर बनून सारे विचार, सार्‍या क्रिया, त्या रोगामुळे रोगट बनतात, त्या शरीरासारखी अवस्था परतंत्र देशाची असते.  पारतंत्र्य म्हटले की संघर्ष आला, व संघर्ष आला की सारे लक्ष तिकडे गुंतून पडल्यामुळे संघर्षापलीकडचे काही दुसरेतिसरे सुचेनासे होते.  स्वातंत्र्याकरता करावे लागलेले लढे, त्यापायी सोसलेले क्लेश यांची रांगच्या रांग मनात उभी राहते व तो सारा इतिहास व्यक्तीच्याच नव्हे तर राष्ट्राच्या स्मृतीचा सतत सांगाती होऊन बसतो.  त्या इतिहासाच्या छंदाने पछाडलेल्या मनाला सोडविण्याचा उपाय उरतो तो एवढाच की त्याचे मूळ कारण जे पारतंत्र्य ते नाहीसे केले पाहिजे.  आणि ते साधले, पारतंत्र्याची भावना नाहीशी झाली, तरीसुध्दा या माला झालेल्या बाधेला उतार हळूहळू पडत जातो, कारण देहावरच्या घावापेक्षा मनावरचे घाव भरून निघायला वेळ अधिक लागतो.

ही पूर्वेतिहासाच्या स्मृतींच्या बाधेची पार्श्वभूमी आम्हाला हिंदुस्थानात फार काळची आहे, पण गांधींनी राष्ट्रीय चळवळीला असे काही वळण लावले की, त्यामुळे देशाच्या मनोवृत्तीतील कडूपणा, निराशा कमी झाली.  ती मनोवृत्ती अजिबात नाहीशी झाली नाही, पण द्वेषाच्या भावनेपासून अलिप्त अशी आमच्याइतकी दुसरी कोठलीही राष्ट्रीय चळवळ मला माहीत नाही.  गांधींचे राष्ट्रप्रेम मोठे गाढ होते, पण त्या स्वदेशप्रीतीबरोबरच त्यांच्या मनात अशीही भावना होती की, आपल्याला जो काही संदेश द्यावयाचा आहे तो नुसता स्वत:च्या देशापुरता नसून सार्‍या जगाला आहे.  गांधींना सार्‍या जगभर शांतता नांदावी अशी तीव्र तळमळ होती.  त्यामुळे त्यांच्या स्वदेशप्रीतीला एक प्रकारे जागतिक दृष्टी येऊन तिच्यात आक्रमक वृत्तीचा लवलेशही नव्हता.  त्यांना हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळावे अशी इच्छा होतीच, पण त्यांची अशी श्रध्दा बनली होती की, कितीही लांबवरचे का होईना, पण खरे एकमेव ध्येय हे असावे की, सार्‍या जगातील राष्ट्रे स्वतंत्र राहून त्या सर्वांचा एक जागतिक राष्ट्रसंघ व्हावा.  त्यांनी म्हटले होते की-''स्वदेशप्रीतीची माझी कल्पना ही की, माझ देश स्वतंत्र व्हावा, मानववंश जिवंत ठेवण्याकरता अवश्यच झाले तर माझ्या देशाने सर्वस्वी मृत्यूही स्वीकारावा.  या भावनेत वंशद्वेशाला थारा नाही.  आमची स्वदेशप्रीती ह्या स्वरूपाची झाली पाहिजे.''  ते अन्यत्र म्हणतात, ''मला सार्‍या जगाच्या दृष्टीने विचार करावयाचा आहे.  माझ्या स्वदेशप्रेमात अखिल मानववंशाच्या हिताचाही अंतर्भाव होतो.  म्हणून स्वदेशाची सेवा करताना मी सार्‍या जगाच्या सेवेचाही त्यात अंतर्भाव करतो.  जगातील राष्ट्रांचे ध्येय प्रत्येक देशाने इतरांपासून तुटून स्वतंत्र असावे हे नाही; प्रत्येक राष्ट्राने स्वेच्छेने इतर राष्ट्रांवर अवलंबून सहकार्य करीत राहावे हे आहे.  जगातील सुविचारसंपन्न थोर लोकांची इच्छा अशी नाही की जगात एकमेकापासून अलग अशी स्वतंत्र राष्ट्रे राहून त्यांची एकमेकाशी युध्दे होत राहावी; उलट त्यांची इच्छा ही की, सर्व राष्ट्रांत एकमेकांबद्दल स्नेहवृत्ती नांदून सर्वांच्या सहकार्याने चालणारा सार्‍या राष्ट्रांचा एक संघ व्हावा.  ही घटना प्रत्यक्षात घडून येणार्‍या फार कालावधी लागेलही.  माझ्या देशाकरता काही विशिष्ट, मोठे भव्य असे उद्दिष्ट उच्चारण्याची माझी इच्छा नाही. सर्व राष्ट्रांनी एकमेकांपासून अलग वागून स्वतंत्र राहावे यापेक्षा सर्वांनी एकमेकांशी मिळून मिसळून राहावे, या तत्त्वाने चालण्यास आम्ही सिध्द आहोत, असे म्हणून दाखविण्यात आम्ही काही विशेष करतो आहोत किंवा अशक्य ते बोलतो आहोत असे मला वाटत नाही.  आम्हाला वाटल्यास स्वेच्छेने इतरांपासून अगदी अलग राहण्याचे सामर्थ्य असावे, परंतु त्या सामर्थ्यांचा आम्ही उपयोग करू नये अशी माझी इच्छा आहे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel