युध्दाविषयी प्रतिक्रिया

युरोपात युध्दाला आरंभ झाला तेव्हा मी चुंगकिंग येथे होतो.  मी ताबडतोब निघून परत यावे अशी काँग्रेस अध्यक्षांनी मला तार केली तेव्हा मी गर्दीने परत आलो. मी येऊन पोचलो तो काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक चालली होती.  या बैठकीला येण्याचे जिनांनाही मुद्दाम आमंत्रण पाठविले होते, पण आपल्याला येता येत नाही असे त्यांचे उत्तर आले.  व्हॉइसरॉयनी हिंदुस्थान देशाला या युध्दात यथाविधि गुंतवून टाकले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी बरेचसे वटहुकूमही काढले होते व ब्रिटिश पार्लमेंटने हिंदुस्थानच्या राज्यशासनपध्दतीच्या कायद्यात फेरफार करणारा नवा कायदाही मंजूर करून टाकला होता.  हे वटहुकूम व हा नवा कायदा यामुळे प्रांतिक सरकारांचे पुष्कळ अधिकार व कामे यांवर नव्या सीमा व नवे निर्बंध घातले होते.  त्यामुळे त्यांच्याबद्दल तीव्र असंतोष माजला व लोकांना विशेष राग असा आला की, लोकप्रतिनिधींचा सल्लासुध्दा याबाबत सरकारने विचारला नाही.  उलट झाले होते ते असे की, या लोकप्रतिनिधींनी जे आपल्याला पाहिजे म्हणून वारंवार बोलून दाखविले होते, जे ठराव केले होते तिकडे सरकारने मुळीच लक्ष दिले नाही.

पुष्कळ विचाराअंती तारीख १४ सप्टेंबर १९३९ रोजी काँग्रेस कार्यकारी समितीने या युध्दामुळे आलेल्या प्रसंगासंबंधी एक विस्तृत निवेदन-पत्रक प्रसिध्द केले.  व्हाईसरॉयनी चालविलेला उपक्रम व पदोपदी काढलेले वटहुकूम व आज्ञापत्रके यांचा निर्देश करून या निवेदन-पत्रकात म्हटले होते की, ''या उत्तरोत्तर वाढत्या प्रमाणावर चाललेल्या घटनांचा विचार करता त्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत असे कार्यकारी समितीचे मत होणे अपरिहार्य होते.'' फॅसिस्ट व नाझी सोटेशाहीचा या पत्रकात निषेध केला होता व तो जर्मन नाझी सरकारने पोलंडवर केलेले आक्रमण याबाबत विशेष तीव्र केला होता.  ह्या आक्रमणाला जे कोणी विरोध करतील त्यांच्याबद्दल काँग्रेसला सहानुभूती वाटते असेही त्या पत्रकात म्हटले होते.

या पत्रकात सरकारशी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्याबरोबरच असेही म्हटले होते की, ''आम्हाला न विचारता काही ठरवून ते आमच्यावर लादले तर त्याचा प्रतिकार करणे आम्हाला भाग आहे.  सत्कार्यात आमचे सहकार्य पाहिजे असेल तर ते दडपशाही करून व हुकूम फर्मावून मिळण्यासारखे नाही.  परकीय सत्तेने काढलेली आज्ञापत्रके हिंदी लोकांनी निमूटपणे पाळावी हा प्रकार या कार्यकारी मंडळाला संमत नाही.  सहकार्य करावयाचे तर ते बरोबरीच्या नात्याने, उभयतांच्या संमतीने, व उभयतांनाही योग्य वाटत असलेल्या कार्याकरताच झाले पाहिजे.  स्वदेशाच्या स्वातंत्र्याकरता व हिंदुस्थानात स्वतंत्र लोकशाही राज्यपध्दतीची स्थापना करण्याकरता हिंदी जनतेने नुकत्याच लोटलेल्या काळात गंभीर संकटांना तोंड दिले आहे, स्वसंतोषाने मोठा त्याग केला आहे, तेव्हा लोकशाही व स्वातंत्र्याच्या पक्षाबद्दल त्यांना संपूर्ण सहानुभूती वाटते.  परंतु तेच लोकशाही स्वातंत्र्य हिंदुस्थानला मिळू न देता उलट आहे नाही तेही किरकोळ स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असताना ह्या लोकशाही स्वातंत्र्याचे नाममात्र निमित्त करून आरंभलेल्या युध्दात हिंदुस्थानने भाग घेणे शक्य नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel