चक्रवर्ती राजगोपालाचारिअर यांनी नव्याने ही योजना प्रथमच मांडली, त्यात काँग्रेसने आजवर अनेकदा केलेल्या मागण्याला थोडे सौम्य स्वरूप देऊन मांडली; काँग्रेस कैक वर्षे जे मागत आली होती त्यापेक्षा हे नवे मागणे पुष्कळच कमी होते.  अस्तित्वात असलेल्या कायद्यांची फारशी अडचण न पडता ही नवी योजना लागलीच सुरू करण्यासारखी होती, व या योजनेमुळे देशातील इतर पक्षोपपक्षांची मागणी पुरी करण्याचीही खटपट होण्याचा संभव होता, कारण राष्ट्रीय सरकार स्थापावयाचे झाले तर ते सर्व पक्षांचे संमिश्र असणे अपरिहार्य होते.  हिंदुस्थानात या योजनेप्रमाणे ब्रिटिश राज्यकर्त्यांचे स्थान कोणते हा प्रश्न चमत्कारिक होता, पण त्या प्रश्नाचासुध्दा विचार या योजनेत होता.  ब्रिटिश राज्यकर्त्यांची या योजनेत अशी तरतूद होती की, व्हॉइसरॉय हे अधिकारपद पुढेही चालावयाचे, परंतु राष्ट्रीय मंत्रिमंडळाने काही ठरविले तर व्हॉइसरॉयने त्याला नकार देता कामा नये असे धरून चालावयाचे.  राज्ययंत्राचा युध्दविभाग पुढेही सरसेनापतींच्या हाती राहावयाचा होता, व युध्दविभाग सोडून बाकीचा राज्यकारभार पाहण्याकरिता ब्रिटिशांनी दिवाणी खात्यातून जी अवघड रचना हळूहळू करून ठेवली होती, तीही जशीच्या तशीच ठेवावयाची होती.  काँग्रेसने जे स्थित्यंतर सुचविले त्याचा प्रत्यक्षात पाहू गेले तर मोठा परिणाम, चालू स्थितीत मुख्य फरक एवढाच की त्यामुळे राज्याचा कारभार करणार्‍या अधिकारी व नोकरवर्गाची वृत्ती वेगळी झाली असती, दृष्टी नवी आली असती, युध्दकार्य व देशापुढे उभ्या ठाकलेल्या अनेक बिकट समस्या सोडविण्याचे कार्य, या कामात अधिक उत्साह येऊन जनतेचे वाढते सहकार्य लाभले असते.  अशा प्रकारे नवी घडी आली व हिंदुस्थानला युध्दानंतर संपूर्ण स्वातंत्र्य लाभणार अशी नक्की खात्री पटली म्हणजे देशातील लोकांच्या मनोभावनेची सारी पार्श्वभूमी नवी होऊन युध्दात सर्वांचे मनापासून सहकार्य लाभले असते.

काँग्रेसने पूर्वी जे सारे ठराव केले, जो अनुभव घेतला, तो पाहता ही अशी सूचना करणे काँगेसला सोपे नव्हते.  अशा प्रकारे रचना केलेले व अशा बंधनांनी जखडलेले राष्ट्रीय सरकार निरुपयोगी व दुबळे ठरेल असेही एकवार वाटे.  काँग्रेसमधील बर्‍याच मंडळींचा या सूचनेला विरोध होता.  मी माझी संमती देण्यापूर्वी मला स्वत:लासुध्दा हे कसेबसे पटवून घेताना चिंता लागली होती, खूप विचार करावा लागला होता.  मी अखेर संमती दिली त्याचे मुख्य कारण असे की, आम्ही म्हणत होतो तसे जमले, तर त्याचे अधिक विस्तृत आंतरराष्ट्रीय परिणाम माझ्या दृष्टीसमोर होते.  फॅसिस्ट व नाझी राज्याविरुध्द चालविलेल्या या युध्दांत आपला मान राखून शक्य झाले तर हिंदुस्थान देशाने आत्मीय भावनेने भाग घ्यावा अशी माझी इच्छा होती.

पण आमच्यापुढे या बाकीच्या अडचणींपेक्षा सर्वांत मोठी अडचण होती ती म्हणजे गांधीजींचा विरोध.  हा विरोध सर्वस्वी त्यांच्या अहिंसातत्त्वामुळे आला.  यापूर्वी आम्ही सरकारला युध्दाच्या कामात वेळोवेळी साहाय्य देऊ केले तेव्हा त्यांनी विरोध केला नाही, पण त्यांना तो प्रकार बरा वाटला नाही हे नक्की.  युध्दाला आरंभ झाला तेव्हाच त्यांनी व्हॉइसरॉयना सांगून टाकले होते की, युध्दाच्या कामी काँग्रेसने साहाय्य दिले तर ते केवळ नैतिक साहाय्यच शक्य होणार, पण मागाहून काँग्रेसने त्याबाबत जे ठराव वेळावेळी केले त्यात काँग्रेसची भूमिका तशी नव्हती.  ह्या नव्या सूचनांच्या प्रसंगी, युध्दकार्यातील हिंसामय भागाची जबाबदारी काँग्रेसने पत्करावी हे आपल्याला सर्वस्वी अमान्य आहे असे आपले निश्चित मत त्यांनी प्रसिध्द केले.  त्यांची ही भावना इतकी उलट होती की, त्यापायी त्यांनी आपल्या सहकार्‍यांचेच नव्हे तर काँग्रेस संस्थेशी असलेले आपले संबंधही तोडून टाकले.  त्यांच्याशी संबंध असलेली सारी मंडळी या प्रकराने फार कष्टी झाली, कारण आजची काँग्रेस जी काय होती तिचे श्रेय त्यांना आहे, त्यांनी ती निर्माण केली.  परंतु युध्दपरिस्थितीशी त्यांनी जो अहिंसातत्त्वाचा संबंध जोडला तो मान्य करणे काँग्रेस या संस्थेला शक्य नव्हते व ब्रिटिश सरकारशी तडजोड करण्याची काँग्रेसला इतकी तळमळ लागली होती की, ज्याच्यावर काँग्रेसचे इतके प्रेम, इतकी श्रध्दा होती त्या पुढार्‍याचा संबंधसुध्दा त्यांनी त्या तळमळीपायी सोडून देण्याचा अंतिम मार्ग पत्करला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel