चीनचे सरसेनापती चांग कै शेक व त्यांच्या पत्नी मादाग चांग कै शेक ही दोघेही त्या सुमारास हिंदुस्थानात येऊन गेली.  त्यांच्या त्या भेटीचे महत्त्व विशेष होते. अधिकारीवर्गाने पाळावयाचे ठरलेले रीतिरिवाज व हिंदुस्थान सरकारची इच्छा तशी होती म्हणून त्यांना मोकळेपणाने हिंदुस्थानातील बिनसरकारी लोकांत मिळून व मिसळून वावरता आले नाही, पण ह्या संकटप्रसंगी ते हिंदुस्थानातच आली व त्यांची हिंदी स्वातंत्र्याबद्दलची सहानुभूती उघड दिसली एवढ्यामुळेसुध्दा केवळ आपल्या राष्ट्रीय वृत्तीने प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याची इकडल्या लोकांची कूपमंडूक दृष्टी कमी होऊन कोणत्या आंतरराष्ट्रीय वादावरून हे रण पेटले आहे, या राष्ट्राराष्ट्रांच्या स्पर्धेत कोणती तत्त्वे पणाला लागली आहेत याची अधिक जाणीव येथील लोकांत पसरली.  ह्या भेटीमुळे ह्या दोन देशांमधील परस्परसंबंध वाढले व दोघांच्या व इतर त्यांच्यासारख्या राष्ट्रांच्या शत्रूविरुध्द लढा द्यायला त्यांच्या जोडीने उभे राहावे अशी इच्छाही बळावत चालली.  हिंदुस्थानावर जे संकट येऊ पाहात होते त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ह्या दोन्ही वृत्ती निकट येण्याला सोपे झाले, त्यांच्यामध्ये ब्रिटिश सरकारचे हिंदुस्थानासंबंधीचे राजकीय धोरण काय ते आडवे राहिले.

जवळ जवळ येत चाललेल्या संकटांची जाणीव हिंदुस्थान सरकारला चांगलीच झाली होती, हे निश्चित; त्यांना मोठी चिंता लागली असणार, तातडीने काहीतरी लवकर उपाय केला पाहिजे असे त्यांना वाटत असेलच.  परंतु हिंदुस्थानातल्या ब्रिटिशांच्या राज्याची वहिवाट अशी काही रूढीने बांधलेली होती, त्यांच्या त्या ठरीव चाकोर्‍यात ते असे काही अडकले होते, त्यांच्या नोकरशाहीच्या कारभारात निरर्थक शिस्तीची अशी काही लांबण लागे, की त्यांच्या विचारात किंवा प्रत्यक्ष आचारात या नव्या आलेल्या प्रसंगाला साजेल असा काडीमात्रसुध्दा फरक दिसत नव्हता.  काही तडफ दाखवून कोणी झपाट्याने काम करतो आहे, कोणाला कशाची चिंता लागली आहे, काही कामे उरकून हातावेगळी केली पाहिजेत अशी कोणी धडपड करतो आहे, असा प्रकार कोठे दिसतच नव्हता.  ज्या राज्यव्यवस्थेचे हे अधिकारी प्रतिनिधी होते ती दुसर्‍याच एका जुन्या काळाकरिता ठरवली गेली होती, तिचे उद्देश वेगळे होते.  ब्रिटिश राज्याचा किंवा सैन्याचा कारभार हिंदुस्थानात चालविण्याची जी पध्दत ठरवली गेली होती तिचा उद्देश हिंदुस्थान ब्रिटिशांच्या ताब्यात राहावा, हिंदी लोकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरता काही धडपड केली तर त्यांना दडपता यावे एवढाच होता.  त्या दृष्टीने राज्याचा किंवा सैन्याचा कारभार चोख चालेल अशी ती व्यवस्था होती, पण कोणाची गय न करणार्‍या बलाढ्य शत्रूशी आधुनिक-तंत्राने युध्द करणे ही गोष्ट अगदी वेगळी, त्यामुळे चालू व्यवस्थेत रुळलेल्या अधिकार्‍यांना या नव्या प्रसंगानुरूप स्वत:ची तयारी करणे मोठे जड जाऊ लागले.  त्यांच्या बुध्दीची, वृत्तीची, ठेवण अगदी वेगळी पडली, आणि त्यांचा उत्साह हिंदुस्थानातील राष्ट्रीय जागृती स्वातंत्र्याच्या चळवळी दडपून टाकण्याकडेच खर्ची पडू लागला.  या नव्या प्रकारच्या अडचणींना तोंड देताना ब्रह्मदेश व मलायामधील राज्ययंत्र ढासळून पडलेले पाहूनही त्याचा प्रकाश येथील राज्यकर्त्यांच्या डोक्यात काहीच पडला नाही, त्या घटनेचा अर्थच त्यांना समजला नाही, ते काहीच धडा घेईनात.  हिंदुस्थानात ज्या प्रकारची नोकरशाही होती तसल्याच पध्दतीने ब्रह्मदेशाच्या राज्यकारभारातही नोकरशाही तयार करण्यात आली होती.  वस्तुत: काही वर्षांपूर्वी ब्रह्मदेशाचा राज्यकारभार हिंदुस्थान सरकारकडेच होता, दोन्ही देशांचे एकच सरकार होते.  तिकडचा राज्यकारभार थेट इकडच्यासारखाच होता, व ब्रह्मदेशात त्या कारभाराचा जो धुव्वा उडाला त्यावरून ती राज्यपध्दती किती मरणोन्मुख झालेली होती हे स्पष्टच सिध्द झाले होते.  तथापि हिंदुस्थानात तीच जुनी पध्दत तशीच्या तशी चालू राहिली, व व्हॉइसरॉय आणि त्यांचे बडे अधिकारी त्याच रीतीने पूर्वीप्रमाणे कामकाज करीत राहिले.  ब्रह्मदेशात प्रसंग आला तेव्हा जे अगदी नालायक ठरले अशा तिकडच्या अनेक बड्या अधिकार्‍यांची इकडे अधिक भरती झाली, सिमल्याच्या थंड हवेच्या गिरिशिखरावर आणखी एक जादा नेक नामदार गव्हर्नर साहेबबहादूर येऊन बसले.  शत्रूपुढे पळ काढून, आपला देश शत्रूंच्या ताब्यात गेलेला असताना, त्या देशाचा कारभार लंडनमध्ये बसून चालविणारी जशी अनेक सरकारे लंडनमध्ये विराजमान होती, तसेच शत्रूपुढे वसाहतींची राज्ये सोडून पळालेल्या बड्या बड्या वसाहती अधिकार्‍यांचा पाहूणचार करण्याचा मान हिंदुस्थानला लाभला होता.  येथील ब्रिटिश राज्याच्या डोलार्‍यात त्यांची आसने अगदी बेमालूम बसायला काहीच अडत नव्हते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel