देशातील उत्तर व मध्य प्रदेशात शेकडो मैल एकसारखा सपाट पसरलेला मैदानी मुलूख वेगळा, तर ठिकठिकाणी डोंगर व पर्वत आल्यामुळे तुटक बनलेला दख्खनचा चित्रविचित्र मुलूख वेगळा.  या वेगवेगळ्या भूरचनेमुळे त्या त्या भागातील लोकांचे स्वभाव, त्यांचे गुणविशेष, वेगवेगळे बनले.  इतिहासाचा ओघ उत्तरेकडील भागात ज्या दिशेने वाहात गेला ती दिशा दक्षिणेत बदलून गेली.  परंतु पुष्कळ प्रसंगी दोन्हीकडचे ओघ एकत्र येऊन जोडीने चालले.  हिंदुस्थानच्या उत्तर भागात रशियाप्रमाणेच जमीन सपाट व मोकळा मैदानी मुलूख अफाट पसरलेला असल्यामुळे बाहेरून येणार्‍या शत्रूंच्या टोळधाडीपासून लोकांचे रक्षण करण्याकरिता सगळीकडे राज्याचा कारभार एकसूत्री चालविणारी बळकट मध्यवर्ती राज्यशासनाची पध्दती आवश्य होती.  साम्राज्ये उत्तरेत भरभराटीला आली तशी दक्षिणेतही झाली, परंतु साम्राज्यांचे केंद्र वस्तुत: उत्तरेतच राहिले व पुष्कळ प्रसंगी दक्षिण प्रदेशावर उत्तरेचीच सत्ता चालली.  पूर्वीच्या त्या जुन्या काळात एकसूत्री मध्यवर्ती राज्यशासन म्हणजे एका व्यक्तीचा कारभार होऊन जाई.  मोगल साम्राज्य अनेक कारणांमुळे मोडून पडले त्यातले एक कारण मराठे हेही झाले ते केवळ योगायोगाने नव्हे. दख्खनचा डोंगराळ कडेपठाराचा मुलूख ही मराठ्यांची मायभूमी ; उत्तरेच्या सपाट मुलखातील बहुतेक सारे लोक जो येईल त्याच्यापुढे लोटांगण घालणारे शेळपट बनले तरी मराठ्यांनी आपले स्वातंत्र्य, कोणापुढे नमते न घेण्याचा आपला बाणा, बव्हंशी कायम राखला.  बंगालमध्ये राज्य स्थापताना ब्रिटिशांना युध्दात फारसा त्रास न पडता विजय मिळाला आणि तेथील सुपीक सपाट मैदानी मुलुखातील जनतेने ब्रिटिश राज्याचे जोखड मानेवर ठेवले जात असताना जो आज्ञाधारकपणा दाखवलातो काही विशेषच होता.  ब्रिटिशांचे बंगाल्यात बस्तान नीट बसल्यावर ते देशातील इतर भागातही पसरू लागले. 

कोणत्याही देशाबाबत विचार केला तर त्या देशाची भौगोलिक मांडणी कशी आहे याला अजूनही महत्त्व आले व पुढेही ते राहणारच, परंतु हल्लीच्या काळात ह्या निसर्गरचनेखरीज इतर काही गोष्टींना त्यापेक्षाही अधिक महत्त्व आलेले आहे.  पर्वत किंवा समुद्र आता पूर्वीसारखे दुर्लंघ्य राहिलेले नाहीत, परंतु त्या देशातील लोकांत काही विशिष्ट गुणदोष निर्माण होऊन त्या लोकांना एखादे विशिष्ट वळण लागण्यात, तसेच राजकीय व आर्थिक दृष्ट्या जगात त्या देशाचे स्थान ठरण्याच्या कामात, ह्या भौगोलिक परिस्थितीला अखेर महत्त्व येतेच.  देश एकमेकापासून अलग करणे किंवा देशाचे तुकडे पाडणे किंवा ते पुन्हा जोडणे याबद्दल काही नव्या योजना करावयाच्या झाल्या तर पर्वत व समुद्र, वगैरेंची तेथील निसर्गरचना विचारात घेतल्यावाचून चालत नाही.

हिंदुस्थान देश व तेथील जनतेचे गांधीजींना असलेले ज्ञान फार खोल आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांच्या वृत्तान्ताबद्दल, केवळ इतिहास म्हणून इतिहासाबद्दल त्यांना विशेष कुतूहल नाही, आणि काही लोकांच्या अंगी जी एक सहज ऐतिहासिक दृष्टी आलेली असते ती गांधीजींच्या अंगी नसेलही, परंतु भारतीय जनतेचा उगम किती प्राचीन आहे, इतिहासात तिचे मूळ स्वरूप काय आढळते त्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे व सूक्ष्म माहितीही आहे.  हिंदुस्थानासंबंधी हल्ली जे अवघड प्रश्न उभे आहेत तिकडे त्यांचे विशेष लक्ष लागणे अपरिहार्य आहे.  परंतु अन्यत्र काय काय घडते आहो याची त्यांना उत्तम माहिती आहे व तूर्त काय चालले आहे याची अद्ययावत बातमी आपल्याला असावी याबद्दल ते दक्ष आहेत.  कोणत्याही प्रश्नातील किंवा घटनेतील अवांतर गोष्टी टाळून नेमके मर्म निवडून काढण्याची हातोटी त्यांना साधली आहे.  प्रत्येक गोष्टीचा विचार करताना त्यांच्या मते ती नैतिकदृष्ट्या कशी काय आहे ते पाहिले पाहिजे.  ही नैतिक कसोटी ते प्रत्येक प्रश्नाला लावीत असल्यामुळे त्या प्रश्नावरही त्यांची पकडे कधी ढिली पडत नाही व त्या प्रश्नांकडे ते त्यांच्या ह्या विशिष्ट दृष्टिकोणातून पाहात असल्यामुळे चालू प्रश्नाच्या आगेमागे काय आहे हे त्यांना अधिक दूरवर पाहता येते.  बर्नार्ड शॉ याने म्हटले आहे की, ते (गांधी) तात्पुरत्या डावपेचात त्यांच्या हातून अनंत चुका होत असतील, पण आपली शक्ती किती आहे ते जोखून तिचा अधिकात अधिक उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने केलेली त्यांची व्यूहरचना वेळोवेळी बिनचूक ठरत आली आहे.  परंतु पुढची चिंता आजच कशाला करा अशीच वृत्ती बहुतेक लोकांची असते.  पुढचे पुढे, पण आजच्या प्रसंगी तात्पुरते डावपेच करून काय मिळते ते पाहण्याकडेच बहुतेकांची दृष्टी विशेष लागलेली असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel