आशाभंग

क्रिप्स यांनी चालविलेली मध्यस्थी अचानक बंद होऊन ते एकदम हिंदुस्थानातून निघून गेले तेव्हा तो अनपेक्षित प्रकार पाहून आम्हाला आश्चर्य वाटले.  आजच्या घटकेला ताबडतोब काय मिळते आहे हे पाहू गेले तर पूर्वी कितीदा तरी बोलबोलून पांचट झालेल्या त्याच त्या शब्दांची पुनरावृती करणारी ही असली पोचट योजना आमच्यापुढे करायला का, ब्रिटिश युध्दमंडळातला हा खास मंत्री एवढा लांबचा प्रवास करून इकडे आला ? का अमेरिकेतील लोकमतापुढे आपली टिमकी वाजवण्यापुरते हे एक सोंग उभे केले होते ?  हा झालेला प्रकार इकडच्या लोकांना फार झोंबला, लोकमत कडू झाले.

इकडे आमची बोलणी चालली होती तर तिकडे हिंदुस्थानावर परचक्र येण्याचे भय अधिकाधिक वाढत होते, हिंदुस्थानात आसरा शोधायला पूर्वेकडून उपाशीतापाशी हिंदी निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे पूर्व सरहद्दीतून इकडे लोटतच होते.  स्वारीच्या धास्तीने घाबरून जाऊन उडालेल्या गोंधळात पूर्व बंगालातील नद्यांवर चालणार्‍या हजारो नावा मोडूनतोडून टाकण्यात आल्या.  (सरकारतर्फे मागाहून असे सांगण्यात आले की, एका सरकारी हुकमाचा अर्थ चुकीचा केला गेल्यामुळे हा अनर्थ घडला.) पूर्व बंगालच्या त्या विस्तीर्ण प्रदेशात जिकडे तिकडे जलमार्ग होते व तिकडच्या रहदारीला ह्या नावांखेरीज दुसरे वाहन शक्य नव्हते. ह्या नावाच मोडूनतोडून त्या प्रांतातील वस्तीचे मोठमोठे भाग एकमेकापासून अलग पडले, तेथील लोकांचे रहदारीचे व निर्वाहाचे हे साधन नाहीसे झाले व पुढे बंगालात जो दुपकाळ पडला त्याला हेही एक कारण झाले.  बंगालमधून मोठ्या प्रमाणावर माघार घेऊन दुसरीकडे जाण्याची तयारी करण्यात आली, व रंगून आणि दक्षिण ब्रह्मदेशातून ब्रिटिशांनी माघार घेताना जे घडले तेच सारे पुन्हा येथेही घडणार असा रंग दिसू लागला.  जपानी आरमार येते आहे अशी एक मोघम, निराधार (व शेवटी खोटी ठरलेली) हूल मद्रास शहरात उठल्याबरोबर सरकारच्या बड्या बड्या अधिकार्‍यांच्या खाशा स्वार्‍या मद्रास शहरातून दुसरीकडे अचानक रवाना झाल्या व बंदरात जहाजांच्या सोयीसाठी जी साधनसामग्री ठेवलेली होती तिच्यात काही मोडतोड मुद्दाम करून ठेवण्यात आली.  हिंदुस्थानचा मुलकी राज्यकारभार पाहणार्‍या पोलादी चौकटीत कोठेतरी बिघाड झाला होता. कशाची तरी धास्ती घेतल्याने प्रकृती ढासळली होती.  देशातील राष्ट्रीय वृत्ती राष्ट्रीय चळवळ दडपून टाकावयाची असली तर तेवढ्यापुरते मात्र हे मोठे खंबीर. यांची प्रकृती तेव्हा अगदी धडधाकट.

आम्ही काय करावे ?  हिंदुस्थानातल्या कोणत्याही भागाने परचक्र आले तर सुकाट्याने त्याला शरण जावे हे आम्हाला सहन होण्यासारखे नव्हते. सशस्त्र प्रतिकाराची बाब पाहिली तर ते काम जे काही सैन्य, विमानदल होते, त्यांचे होते. अमेरिकेकडून मदतीचा पूर, विशेषत: विमानांच्या रूपाने, हिंदुस्थान लोटत होता व त्यामुळे लढाईचा रंग हळूहळू पालटत होता.  परचक्र आले तर देशाचे संरक्षण करण्यात हातभार लावायला आम्हाला एकच मार्ग होता तो म्हणजे या युध्दाबाबत देशातील सार्‍या जनतेची वृत्तीच आमूलाग्र पालटून शत्रूचा प्रतिकार आपले सर्वस्व पणाला लावून करण्याची तीव्र ईर्षा जनतेत निर्माण करणे, व त्याकरिता नागरिकांचे सैन्य, गृहरक्षक दले इत्यादी उभारणे. पण ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे तोही मार्ग आम्हाला मोठा अडचणीचा होऊन बसला होता.  शत्रुसैन्य देशाच्या सीमेवर येऊन पोचले होते तरीही सरकारी सैन्याव्यतिरिक्त कोणाही हिंदी माणसाच्या हातात बंदूक देण्याइतपत त्याच्यावर विश्वास टाकण्याची सरकारची तयारी नव्हती, इतकेच नव्हे तर खेड्यापाड्यांतून बिनहत्यारी स्वसंरक्षणदले स्थापण्याचा आम्ही उपक्रम केला तो सुध्दा राज्यकर्त्यांना आवडला नाही व तो त्यांनी काही ठिकाणी दडपून टाकला.  जनतेची प्रतिकारशक्ती पध्दतशीरपणे स्वत: काही योजना करणे हे तर बाजूलाच राहिले, उलट सरकारच्या ब्रिटिश अधिकार्‍यांना तसल्या उपक्रमाची भीती वाटे, कारण, जनतेला स्वसंरक्षणाचे शिक्षण पध्दतशीरपणे देण्याचा कोणताही उपक्रम असला तर तो राजद्रोह आहे, ब्रिटिश सत्तेला तो धोका आणतो असे समजण्याची सवय त्यांना फार दिवसांपासून लागलेली होती.  त्यांना हे आपले जुने धोरण पुढे चालविणे प्राप्तच होते, कारण ते नाही तर त्याला पर्याय म्हणजे जनतेवर विश्वास टाकून त्या जनतेला स्वसंरक्षणाची शिस्त लावणारे, त्या जनतेचे स्वत:चे राष्ट्रीय सरकार असावे असे मान्य करणे, एवढाच होता.  हा पर्याय तर त्यांनी धुडकावून लावला होताच, आणि या दोन मार्गांच्या मधला काही मार्ग नव्हता किंवा यापैकी कोणत्याही मार्गाने चालले तर मधेच थांबण्याची सोय नव्हती.  याचा परिणाम व्हायचा तोच होऊन हे अधिकारी प्रजेला आपल्या मालकीच्या मालमत्तेप्रमाणे वागवू लागले.  प्रजेने आपण होऊन काही करू म्हटले तर हे धनी करू दईनात, हे धनी ज्या कामाला लावतील ते करावे, ते नेतील तिकडे जावे, अशी प्रजेची स्थिती झाली.  सन १९४२ च्या एप्रिल अखेर भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीने असा ठराव केला की, अधिकार्‍यांच्या या धोरणाचा व प्रजेशी त्यांनी चालविलेल्या वर्तनाचा समितीला तीव्र संताप येत आहे, परकीय सत्तेचे गुलाम म्हणून राबविण्याची पाळी प्रजेवर आली आहे, ही स्थिती आम्ही कधीही मान्य करणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel