आणि हिंदुस्थानात पाहिले तर काय दिसत होते ? चालू स्थितीचा लोकांना मनापासून वीट आलेला दिसे व भविष्यकाळही त्यांना तितकाच काळाकुट्ट, भयाण दिसे.  स्वदेशप्रीतीमुळे अंगात उत्साह संचरून युध्दकार्याची मोठी हौस वाटावी असे काहीएक न होता देशावर परचक्र येऊन आहे त्यापेक्षाही अधिक भीषण भवितव्य आपल्या नशिबी येऊ नये म्हणून जेमतेम आपला बचाव व्हावा एवढीच इच्छा लोकांना आहे असे दिसे.  काही थोड्या लोकांच्या मनात आंतरराष्ट्रीय विचारही घोळत होते, त्यांना इतर देशांचेही काही वाटे.  एक परकीय साम्राज्यसत्ता हुकुमाच्या जोरावर आपल्याला इकडून तिकडे चालवते आहे, दडपशाही करते आहे, हरतर्‍हेने आपल्याला पिळून काढते आहे याबद्दल रागाची भावनाही या इतर विचारांच्या बरोबरीने लोकांच्या मनात आढळे.  एका अरेरावी सुलतानाच्या लहरीवर व मजावर सारे अवलंबून असावे ही राज्यकारभाराची तर्‍हा मुळातच अन्यायाची होती.  स्वातंत्र्य सर्वांनाच प्रिय असते, परंतु ज्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेलेले असते किंवा ज्यांचे स्वातंत्र्य जाण्याचा धोका आलेला असतो त्यांना तर ते विशेषच प्रिय असते.  आधुनिक जगात स्वातंत्र्याला अनेक मर्यादा पडतात, अनेक अटी पाळाव्या लागतात.  पण ज्यांना ते स्वातंत्र्य नसते त्यांना या मर्यादांची व या अटींची जाणीव होत नाही.  स्वातंत्र्याचे विचार मनात घोळता घोळता त्या स्वातंत्र्याचे रूप उपाधिरहित कल्पनारम्य होते, मग त्यावाचून दुसरे काहीही सुचेनासे होते, मग त्याच विचारात पुरते गढून तोच एक विचार जिवाला सारखा जाळीत राहतो. स्वातंत्र्याच्या ह्या अतृत्प वांच्छेआड काही आले, तिच्याशी जुळते नसलेले किंवा विरुध्द असलेले काही निघाले तर हे स्वातंत्र्यलोलुप मन खवळते व त्याआड येणार्‍या वस्तुमात्रावर त्या रागाचा वचपा निघतो हे निश्चितच आहे.  ज्या स्वातंत्र्याकरिता हिंदुस्थानात अनेकांनी कष्ट केले, यातना सोसल्या, त्याला शह बसला एवढेच नव्हे तर ते मिळण्याची आशा कोठल्या एका लांबवरच्या अस्पष्ट भविष्यकाळापर्यंत दुरावली गेली होती.  स्वातंत्र्याकरिता चढलेल्या या उन्मादाचा उपयोग करून घेऊन हा लोकांना आलेला आवेग प्रस्तुत जागतिक युध्दाला जोडून द्यावा, खवळून उठलेला हा लोकक्षोभाचा शक्तिसंचय हिंदुस्थानच्याच नव्हे तर जगातल्या सार्‍या राष्ट्रांच्या स्वातंत्र्यप्राप्तीकरिता उपयोगात आणावा, ते करायचे सोडून तो लोकक्षोभ चालू युध्दापासून अलग पाडण्यात आला, या युध्दाच्या जयापजयाशी हिंदी स्वातंत्र्याचा संबंध जोडला गेला नाही.  कोठल्याही राष्ट्रातील लोकांना, शत्रूंना सुध्दा निव्वळ निराशा त्यांच्यापुढे वाढून बसवून ठेवणे हे अंती कधीही शहाणपणाचे ठरत नाही.

या युध्दात गुंतलेल्या वेगवेगळ्या देशांतील मुत्सद्दी मंडळींच्या क्षुद्र महत्त्वाकांक्षेपलीकडचा काही एक अधिक महत्त्वाचा व अधिक विशाल अर्थ या युध्दाला आहे असे मानणारे काही थोडे लोक हिंदुस्थानात होतेच.  त्यांना अंतर्यामी या युध्दाची क्रांतिगर्भ सूचकता कळत होती, या युध्दाचा निर्णय व त्यापासून होणारे पुढचे परिणाम यामुळे सशस्त्र सेनेने युध्दात मिळविलेले जय व मुत्सद्दयांनी आपसात केलेले तहनामे व उघडपणे केलेली वक्तव्ये  यांच्या कितीतरी पलीकडे जग पुढे गेलेले असेल याचीही त्या थोड्या लोकांना जाणीव होती.  पण असे जाणते लोक फार थोडे असणार, आणि इतर देशांप्रमाणे हिंदुस्थानातील बहुसंख्या लोकांचीही दृष्टी यापेक्षा मर्यादित होती, तिला ते स्वत: व्यवहारी वास्तववादाची दृष्टी म्हणत.  या स्वत:ला व्यवहारी, वास्तववादी समजणार्‍या लोकांना तूर्त प्रस्तुत काळाच्या दृष्टीने आपला लाभ वा हानी कशात आहे तेवढे पाहणे महत्त्वाचे वाटे व ते त्या धोरणाने चालत.  हिंदुस्थानात काही लोक संधिसाधू वृत्तीचे होते.  त्यांनी ब्रिटिशांच्या धोरणाशी जुळते घेऊन आपला जम बसवून घेतला.  नाहीतरी ब्रिटिश नसले तर इतर कोणत्याही सत्ताधार्‍यांच्या कसल्याही धोरणाबाबत त्यांनी हेच केले असते, त्यांचे सहकार्य ठरलेलेच होते.  काही लोकांच्या मते ब्रिटिशांचे ह धोरण अत्यंत अन्यायाचे व चुकीचे आहे.  त्या धोरणापुढे निमूटपणे नमते घेणे म्हणजे हिंदुस्थानचाच नव्हे तर जगाचा सुध्दा विश्वासघात होणार आहे.  बहुतेक लोक स्वत: होऊन काहीएक हालचाल न करता स्वस्थ बसावे, जे जे होईल ते ते शांतपणे पाहावे अशा विचाराने निष्क्रिय, निश्चल व स्वस्थ झाले होते.  ती त्यांची खोड जुनीच होती, ती घालवावी म्हणून तर आम्ही इतके दिवस धडपड चालविली होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel