स्वसंरक्षणाकरिता अखेर त्यांना निरुपायाने लढावे लागले तेव्हासुध्दा ज्या समाजव्यवस्थेचा, ज्या जागतिक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा एवढा बोजवारा उडाल्यामुळे हा प्रसंग ओढवला तीच पुन्हा प्रस्थापित करण्याकरिता ते लढत होते.  हे युध्द आपल्याला केवळ स्वसंरक्षणाकरिता करावे लागते आहे असे त्यांना स्वत:ला वाटे, व इतरांनाही त्याचे स्वरूप स्वसंरक्षणाकरिता युध्द असेच ते दाखवीत, आणि त्यांचे म्हणणे एक प्रकारे खरेही होते, पण या युध्दाचे दुसरेही एक, म्हणजे नैतिक स्वरूप होते.  त्या दृष्टीने पाहिले तर ह्या युध्दाची व्याप्ती सैन्यबलाने काही उद्दिष्ट साधावे या उद्देशाच्या पलीकडे जात होती, फॅसिस्ट तत्त्वे व मनोवृत्ती यावर आक्रमक चढाईचे स्वरूप या युध्दाला येत होते.  याचे प्रत्यंतर हे की, जगातील आसुरी प्रवृत्तींचा पराभव करून सार्‍या राष्ट्रांच्या सदसव्दिवेकबुध्दीचे प्राण वाचवावे, जगात सत्प्रवृत्ती नांदावी एवढ्याकरिता आम्ही हे युध्द चालवले आहे, असे ही लोकशाही राष्ट्रे त्या वेळी म्हणत होती.  स्थित्यंतराची बीजे या युध्दात सामावलेली होती, व ते स्थित्यंतर नुसत्या फॅसिस्ट राष्ट्रापुरते मर्यादित नसून त्यामुळे संयुक्त राष्ट्रांतही अंतर्गत घडामोडी होणार होत्या.  नैतिक दृष्ट्या पाहिले तर ह्या युध्दाचे जे हे दृश्य दिसण्यासारखे होते ते युध्दाबाबत या संयुक्त राष्ट्रांनी चालविलेल्या भडक प्रचाराने झाकले गेले होते आणि भविष्यकाळात जगात काही नवी व्यवस्था नांदावी म्हणून हे युध्द चालले आहे असे न दिसता आतापर्यंत जगाची जी व्यवस्था चालत आली तिचे समर्थन करण्यावर व तीच व्यवस्था पुढे यावर चंद्रदिवाकरौ जशीच्या तशीच राहावी यावरच प्रचाराचा भर दिसत होता.  या युध्दातील नैतिक मूल्यावर ज्यांची विशेष श्रध्दा आहे असे लोक या पाश्चात्य राष्ट्रांतून अनेक होते, त्यांच्या मते हे युध्द म्हणजे चालू समाजव्यवस्था अगदी निकामी झाल्याचे लक्षण होते व तसा प्रसंग पुन्हा येऊ नये याची शाश्वती येण्याकरिता मानवी समाजाची एक नवी घडी बसवावी अशी त्यांची इच्छा होती.  ह्या महायुध्दामुळे जगाचे तसे काही स्थित्यंतर घडवून आणता येईल अशी मोघम स्वरूपाची पण बळकट आशा वाटणारे लोक सार्‍या देशातून सर्वत्र, व विशेषत: युध्दात प्रत्यक्ष लढून प्राण अर्पण करणार्‍या सैन्यात होते, व त्यांची संख्या अवाढव्य होती.  याखेरीज युरोपात व अमेरिकेत आणि विशेषत: आशिया आणि आफ्रिका खंडांतील देशांतून आपल्या हक्काला मुकलेले, लबाडीने राबविले जात असलेले, वंशभेदाच्या नावावर अन्याय व अपमानाच्या फेर्‍यात सापडलेले असे, शतकोटींच्या शतकोटी संख्या भरेल इतके लोक होतेच, मागे त्यांच्यावर जे काही पक्की आठवण राहील असे प्रसंग ओढवले होते व हल्ली त्यांना जे काही कष्ट व यातना भोगाव्या लागत होत्या त्यापेक्षा ही लढाई म्हणजे काही वेगळी आहे अशी जाणीव त्यांना होणे शक्य नव्हते, त्यांना एवढीच एक वेडी आशा लागली होती की, या लढाईपायी काहीतरी उलटापालट होऊन आपल्या डोक्यावरचे, आपल्याला चिरडून टाकणारे हे ओझे खाली उतरेल.

परंतु संयुक्त राष्ट्रांचे जे नेते होते त्यांची दृष्टी तिसरीकडेच लागली होती, त्यांना भविष्यकाळचे नवे नको होते, त्यांना भूतकाळातला जुना जमाना पाहिजे होता.  आपल्या देशातील जनतेच्या मनातली तळमळ शांत करण्याकरिता मधून मधून ते रम्य भविष्यकाळाचे वर्णन मोठ्या रसाळ वाणीने करीत, पण त्यांच्या धोरणात त्यांच्या सुंदर वक्तृत्वातले वाक्यही प्रत्यक्षात उतरत नव्हते.  मिस्टर विन्स्टन चर्चिल यांच्या मते आपण पुन्हा पूर्वस्थळावर यावे एवढाच या युध्दाचा उद्देश होता, त्यापलीकडे त्यांची दृष्टी जात नव्हती, त्यांच्या मते इंग्लंडातील समाजव्यवस्था व बाहेरच्या साम्राज्यातील राज्यव्यवस्था, फार तर किरकोळ फरक इकडे तिकडे करून जशीच्या तशी पुढेही चालू ठेवली पाहिजे.  प्रेसिडेंट रूझवेल्ट यांची भाषा अधिक आशादायक होती, पण त्यांचे धोरण मि. चर्चिल यांच्यापेक्षा फारसे वेगळे दिसले नाही.  पण सार्‍या जगभर अनेक लोकांना प्रेसिडेंट रूझवेल्ट म्हणजे उदात्त विचार व विशाल कल्पना असलेले मोठे मुत्सद्दी थोरे पुरुष म्हणून त्यांच्याकडून काही कार्य होईल अशी आशा वाटे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel