अमेरिकेपासून कोठेच्या कोठे दूरवर असलेल्या हिंदुस्थानच्या प्रश्नासंबंधी अमेरिकन लोकांना जी काही थोडीफार आस्था होती तेवढ्यापुरते पाहिले तर या प्रश्नासंबंधी इंग्लंडमध्ये जसे वर दिल्याप्रमाणे एकमत होते तसे अमेरिकेत नव्हते.  कारण ब्रिटिश लोकांची जशी आपल्या राज्यकर्त्या वर्गाच्या चांगुलपणाबद्दल खात्री होती तितकी अमेरिकन लोकांची या ब्रिटिश राज्यकर्त्यांबद्दल नव्हती, आणि अमेरिकनांच्या मते (आपले अमेरिकन साम्राज्य वगळून बाकीची) इतर लोकांनी चालविलेली साम्राज्यपध्दती अनिष्ट होती.  हिंदुस्थानातील लोकमत आपल्याला अनुकूल करून घेऊन जपान विरुध्द लढायला हिंदुस्थानातील साधनसामग्रीचा आपल्याला उपयोग करता यावा हीही उत्कंठा अमेरिकेला होतीच.  तरी सुध्दा तेथेही ब्रिटिशांनी चालविलेल्या एकतफी विकृत प्रचारामुळे परिणाम झाला होता आणि एकंदर लोकमत असे झाले होते की, हा हिंदुस्थानचा प्रश्न मोठा गुंतागुंतीचा आहे तो आपल्याकडून सुटणे कठीण, आणि बाकीचे सारे सोडले तरी आपले या युध्दप्रसंगीचे मित्र ब्रिटिश आहेत, त्यांच्या भानगडीत आपण पडलो तर आपल्याला अडचण होणार.

रशियातील राज्यकर्त्यांना किंवा सर्वसामान्य जनतेला हिंदुस्थानबद्दल काय वाटत होते ते सांगणे अशक्य होते.  युध्दपायी अवश्य त्या गोष्टींची तयारी प्रचंड प्रयत्नाने करताकरता व देशात घुसलेल्या शत्रूला देशाबाहेर काढून देतादेता त्यांना इतके सयास पडत होते की, त्यांना त्यांच्याशी तूर्त प्रत्यक्ष संबंध नसलेल्या गोष्टींचा विचार करायला वेळ नव्हता.  पण त्यांना दूरच्या भविष्यकाळाबद्दल आगाऊ विचार करायची सवय होती, तेव्हा आशियाखंडात त्यांच्या सरहद्दीला लागून असलेल्या हिंदुस्थानकडे त्यांचे मुळीच लक्ष गेले नसेल हे संभवत नाही.  भविष्यकाळी हिंदुस्थानबाबत त्यांचे काय धोरण राहील हे तेव्हा कोणालाच सांगता येत नव्हते.  मात्र जे काय धोरण असेल ते त्या वेळच्या प्रत्यक्ष वस्तुस्थितीला धरून असेल व त्यांचा मुख्य उद्देश रशियाची राजकीय व आर्थिक वाढ कशी होईल ते पाहणे, हा असेल एवढे संभवनीय होते.  हिंदुस्थानबद्दल कोठेही काहीही बोलण्याचे त्यांनी कसोशीने टाळले होते.  मात्र सन १९४२ च्या नोव्हेंबर महिन्यात सोविएट राज्यक्रांतीच्या पंचविसाव्या वाढदिवसानिमित्त भाषण करताना स्टालिन यांनी आपले धोरण सर्वसामान्यपणे कसे राहील ते सांगितले होते, ते असे :-''वंशभेदावर आधारलेल्या प्रतिबंधांचे उच्चाटण करणे; सर्व राष्ट्रे समान श्रेणीवर आहेत, व प्रत्येक राष्ट्राला आपला प्रदेश परकीय आक्रमणापासून अबाधित ठेवण्याचा अधिकार आहे, हे मान्य करणे; पारतंत्र्यात सापडलेल्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळवून देऊन स्वत:च्या देशातले राज्य चालविण्याचे संपूर्ण अधिकार त्यांचे त्यंना परत मिळवून देणे; प्रत्येक राष्ट्राचा आपल्या इच्छेनुरूप आपल्या कारभाराची व्यवस्था लावण्याचा अधिकार मान्य करणे; ज्यांना हानी पोचली असेल त्या राष्ट्रांना आर्थिक साहाय्य देणे व त्यांची साधनसंपत्ती वाढून त्यांचे कल्याण होण्याला हातभार लावणे; लोकसत्ताक स्वातंत्र्याची पुन्हा स्थापना करणे; हिटलरशाही राज्यपध्दतीचा नायनाट करणे.''

हिंदुस्थानात राष्ट्रीय चळवळ चाली असताना राष्ट्रीय पक्षाने जे कार्य चालवले होते त्यातील विशिष्ट कृत्यांचा परिणाम चीनमधील जनमतावर जरी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टींबद्दल निराळा होत असला तरी चीनमधील लोकमत एकंदरीने हिंदी स्वातंत्र्याला सर्वस्वी अनुकूल असेच होते.  त्यांना हिंदी लोकांबद्दल सहानुभूती वाटे.  या सहानुभूतीची पाळेमुळे जुन्या इतिहास कालापर्यंत खोलवर गेलेली होतीच, व शिवाय हल्लीच्या काळात देखील चीनमधील लोकांना अशी जाणीव होती की, हिंदुस्थानाला स्वातंत्र्य नसले तर आपलेही स्वातंत्र्य धोक्यात येणार.  हिंदी स्वातंत्र्याचे महत्त्व हिंदुस्थानपुरतेच नसून, इतरत्र जे देश परक्यांचे अंकित, परतंत्र होते त्या सार्‍या देशांच्या स्वातंत्र्यप्राप्तीचे हिंदी स्वातंत्र्य हे प्रतीक आहे, प्रस्तुत काळ चांगला की वाईट हे पाहण्याची ती एकच कसोटी आहे, भावी काळाचे मोजमाप ठरवावयाचा तोच मानदंड आहे, अशी भावना नुसती चीनमध्येच नसून, इजिप्त, मध्यपूर्वेकडील व आशिया खंडातील सार्‍या देशांतून होती.  मि. वेंडेल विल्की आपल्या 'वन वेर्ल्ड' (पृथ्वीवरच्या सार्‍या देशातील लोकांचे मिळून एकराष्ट्र) या पुस्तकात म्हणतात :-''आफ्रिकेपासून अलास्कापर्यंतच्या प्रदेशात ठिकठिकाणी मला जे अनेक लोक भेटले त्यांत स्त्रिया काय किंवा पुरुष काय, प्रत्येकाने मला एक प्रश्न विचारला तो म्हणजे जवळजवळ सर्व आशियाखंडभर एक खुणेचाच प्रश्न होऊन बसला आहे : हिंदुस्थानबद्दल तुम्ही काय म्हणता ?... कैरोहून मी पुढे चाललो तो प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न नेमका येईच.  चीनमधील सर्वांत चाणाक्ष माणसाने मला असे सांगितले.  हिंदुस्थानातील लोकांची स्वातंत्र्याची आकांक्षा सध्या पुरी करता येत नाही, त्याबद्दल पुढे केव्हातरी पाहू असे जेव्हा ग्रेट ब्रिटनने ठरवले तेव्हा अति पूर्वेकडील देशांतून असलेल्या लोकांत या ग्रेट ब्रिटनच्या निर्णयामुळे दुर्लौकिक झाला तो ग्रेट ब्रिटनचा नसून अमेरिकेचा झाला.''

हिंदुस्थानात जे काही घडले त्यामुळे सार्‍या जगाचे लक्ष, जगभर युध्दाची धामधूम सुरू असून, त्यात एवढा निकराचा प्रसंग आलेला असूनही, हिंदुस्थानकडेच वळवणे जगाला प्राप्त झाले.  पौर्वात्य राष्ट्रांच्या मूलभूत प्रश्नांचा विचार करणे जगाला भाग पडले.  हिंदुस्थानात घडलेल्या प्रकारांनी आशियामधील प्रत्येक राष्ट्रात जिकडे तिकडे खळबळ उडाली, तेथील लोकांचे विचारचक्र फिरू लागले, त्यांच्या भावना क्षुब्ध झाल्या.  ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या मगरमिठीपुढे हिंदी जनतेचे काही चालक नाही, ती असाहाय्य आहे असे जरी तात्पुरते दिसले असले तरी त्याबरोबरच एवढेही निश्चित झाले की, हिंदुस्थान स्वतंत्र होईपावेतो हिंदुस्थानात किंवा आशियाखंडात खांतता नांदणे शक्य नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel