हिंदुस्थानात घडलेले परिणाम
एखाद्या सुसंस्कृत समाजावर परकीयांचे राज्य चालले तर राज्यकर्त्यांना अनेक अडचणी सोसाव्या लागतात व परकीय राज्याच्या पाठोपाठ अनेक अनिष्ट प्रकारही येतात.  राज्यकर्त्यांना सोसाव्या लागणार्‍या अडचणींपैकी एक अडचण अशी की, प्रजेपैकी त्यातल्या त्यात अनिष्ट लोकांवर अवलंबून राहणे राज्यकर्त्यांना भाग पडते.  ध्येयवादी, मानी, बर्‍यावाइटाची काही चाड बाळगणारे, आपला लौकिक संभाळणारे, ज्यांना स्वातंत्र्याचे काही मोल आहे, परकीय सत्तेपुढे निरुपाय म्हणून मान तुकविण्यात ज्यांना अपमान वाटतो असे जे कोणी प्रजेपैकी असतील ते राज्यकर्त्यांशी फटकून असतात, राज्यकर्त्यांशी त्यांचा सबंध आला तर दोघांमध्ये विरोध उत्पन्न होतो.  स्वतंत्र देशापेक्षा परतंत्र देशात स्वत:चे नशीब काढायला निघालेले स्वार्थी व संधिसाधू लोकांचा भरणा अधषाक असतो.  स्वतंत्र देशात सुध्दा राज्यकारभाराची पध्दत एकतंत्री असली तर भल्याबुर्‍याची विशेष चाड ठेवणार्‍या अनेक लोकांना राज्यकर्त्यांना त्यांच्या कारभारात साहाय्य करणे शक्य नसते अशा एकतंत्री कारभारात नवी बुध्दी सांगणार्‍या माणसांना अवसर मिळत नाही.

परकीयांचे राज्य म्हटले की ते आपले तेच खरे करून दाखविण्याच्या पध्दतीने चालवणे राज्यकर्त्यांना भाग पडते.  आणि त्यामुळे असल्या राज्यात वर वर्णन केलेले सारे दोष तर असतातच, शिवाय त्या दोशांत आणखी भर पडत जाते, कारण तेथे प्रजेचा विरोध व सरकारची दडपशाही हे प्रकार नेहमीचेच चालतात.  अशा राज्यात राज्यकर्त्यांची व प्रजेची एकमेकांबद्दलची भावना मुख्यत: भयाचीच होऊन बसते, व तेथे सरकारी अधिकार्‍यांपैकी पोलिस व गुप्तहेर यांचे महत्त्व विशेष असते.

राज्यकर्ते व प्रजा यांचा एकमेकांशी प्रत्यक्ष लढा चालू असला म्हणजे सामान्यत: जे लोक अनिष्ट म्हणून गणले जावेत त्याच लोकांवर अवलंबून राहण्याची व त्यांना उत्तेजन देण्याची प्रवृत्ती विशेषच दिसून येते.  अर्थात बर्‍यावाइटाची चाड बाळगणार्‍या वृत्तीच्या लोकांपैकी सुध्दा पुष्कळांना परिस्थितीपुढे निरुपाय म्हणून, त्यांची इच्छा असो वा नसो, राज्यशासनसंस्थेच्या चौकटीत निमुटपणे आपले काम करीत राहणे भाग असते.  पण त्यातल्या त्यात राष्ट्रीय स्वातंत्र्याला विशेष विरोध, राज्यकर्त्यांच्या छंदाने चालून त्याच्या उपयोगी पडण्याची तयारी, आपल्या देशबांधवांना ठेचून काढून त्यांची मानखंडना करण्यात विशेष तत्परता जे कोणी दाखवतील त्यांनाच नेमके निवडून राज्यकर्ते त्यांना वर चढवतात व त्यांच्यावर मोठमोठी कामे सोपवितात.  वैयक्तिक स्पर्धेच्या भरी पडून, किंवा आपल्याला पाहिजे तो मोठेपणा मिळत नाही म्हणून का असेना, पण बहुसंख्य प्रजेच्या मनाविरुध्द, भावनेविरुध्द चालणे, हा राज्यकर्त्यांच्या दृष्टीने माणसातला मोठ्यात मोठा गुण ठरतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel