चालू महायुध्दाच्या दृष्टीने पाहिजे तर त्या रणक्षेत्रापासून हिंदुस्थानला सगळ्यात जवळच्या व जेथून या देशावर परचक्र येण्याचा संभव होता त्याच सीमेजवळच्या प्रदेशातच हा दुष्काळ नेमका आला. तसल्या प्रदेशात जिकडे तिकडे दुष्काळ पडला व तेथील अर्थव्यवस्था पार ढासळली तर त्यामुळे संरक्षणाचे व विशेषत: तेथून शत्रूवर उलट चाल करून जाऊ म्हटले तर चढाईचे काम बिकट होऊन बसणार हे नक्कीच. हिंदुस्थान सरकारकडे हिंदुस्थानचे संरक्षण करणे व आक्रमक जपानी सैन्याशी युध्द चालविणे ही कामगिरी आलेली होती, ती त्यांनी अशी पार पाडली. शत्रूला संकट पडावे म्हणून शत्रुसैन्य जेथून येणार त्या प्रदेशातील जनता, दाणागोटा, गुरेढोरे वगैरे सर्व मालमत्ता, दुसरीकडे हालवून नेऊन वाहतुकीची साधने निवार्याच्या जागा मोडूनतोडून जाळूनपोळून उद्ध्वस्त करून प्रदेश बेचिराख करून ठेवण्याचे, 'दग्धभूमी' करून ठेवण्याचे सरकारचे धोरण असावयास पाहिजे होते, त्याऐवजी या महत्त्वाच्या प्रदेशात सरकारी धोरणाच्या खुणा म्हणजे 'दग्धभूमी' च्याऐवजी दुष्काळाने होरपळून निघालेली, उपासमारीने खंगून मोडून गेलेली, जिकडेतिकडे मरून पडलेली दशलक्षावधी प्रजा पसरली होती.
हिंदुस्थानातल्या ठिकठिकाणच्या बिनसरकारी संस्थांकडून या दुष्काळाग्रस्त प्रदेशात खूप साहाय्य मिळाले आणि मानवजातीची भेदभाव न करता दक्षपणे सेवा करण्याचे व्रत पाळणार्या नोकर पंथाच्या इंग्लंडमधील लोकांनीही खूप मदत केली. हिंदुस्थान सरकार व प्रांतिक सरकारे हीही अखेर जागी होऊन त्यांना हा प्रसंग किती आणीबाणीचा आला आहे याची जाणीव एकदाची आली आणि अखेर त्यांनी दुष्काळग्रस्तांना साहाय्य देण्याकरिता लष्कराची योजना केली. दुष्काळ पसरू नये व दुष्काळाच्या पाठोपाठ येणारी आपत्ती टळावी म्हणून तात्पुरती थोडीफार खटपट झाली खरी, पण ती त्या वेळेपुरतीच होती आणि दुष्काळानंतर येणारी रोगराईची वगैरे आपत्ती अद्यापही सुरूच आहे, आला होता त्यापेक्षाही भीषण दुष्काळ पुन्हा केव्हा अचानक येऊन उभा राहील त्याचा नेम नाही झालेल्या प्रकारामुळे बंगाल अगदी खिळखिळा होऊ गेला आहे आणि तेथील सामाजिक व आर्थिक व्यवस्था पार मोडून पडली आहे, या दुष्काळाच्या संकटातून वाचलेली नवी पिढी अगदी दुबळी झाली आहे.
असा उग्र दुष्काळ त्या प्रांतात थैमान घालीत असताना व कलकत्ता शहराच्या रस्त्यावर ठिकठिकाणी प्रेते पडलेली असताना कलकत्ता शहराच्या समाजातील अगदी वरच्या श्रीमंत सत्ताधारी दहा हजार लोकांच्या नेहमीच्या सामाजिक जीवनात काही एक फरक पडला नव्हता. नृत्याचे कार्यक्रम, भोजनाचे समारंभ, सुखविलासी जीवनाचे लोकांच्या डोळ्यावर येण्याजोगे उघड प्रकार खुशाल चालले होते, त्या जीवनाच्या रंगात ती मंडळी दंग होती. अन्नधान्याच्या प्रमाणबध्द वाटपाची (रेशनिंगची) व्यवस्थासुध्दा तेव्हा नव्हती, ती त्यानंतर किती तरी उशिरा सुरू करण्यात आली. कलकत्त्याला नेहमीप्रमाणे घोड्यांच्या शर्यती (रेसेस) सुरूच होत्या आणि तेथे नखरेबाज पोशाख व नव्या पध्दतींचे आचार यात गर्क असणार्या मंडळींचे घोळके गर्दी करून वावरतच होते. अन्नधान्ये ठिकठिकाणाहून आणायला वाहतुकीची अडचण येई, पण शर्यतीचे घोडे मात्र आगगाडीला त्यांचे स्वतंत्र डबे जोडून लांबच्या प्रांताप्रांतांतून आणविले जात होते. अशा रंगेल जीवनात दंग असलेल्या मंडळीत इंग्रज व हिंदी ह्या दोन्ही प्रकारच्या लोकांचा भरणा होता, कारण युध्दाचा धंदा करून ह्या मंडळींची मोठी भरभराट झाली होती, त्यांच्या खिशात मुबलक पैसे खुळखुळत होते. ह्यातला काही पैसा तर जे धान्य मिळत नव्हते म्हणून हजारो लोक रोजच्या रोज भुके मरत होते त्या अन्नधान्यावर भरमसाट नफेबाजी करून मिळाला होता.