आला तो दुष्काळ युध्दपरिस्थितीमुळे आला व तो टाळता येणे शक्य होते हे जरी खरे असले तरी ज्या मुळे धोरणापायी हिंदुस्थान सारखा कंगाल बनत चालला होता व हिंदुस्थानातले लखावधी लोक उपासमारीच्या काठावर येऊन कसेतरी जगत होते त्या धोरणातच त्या दुष्काळाची खोलवर गेलेली कारणपरंपरा दडली होती हेही तितकेच खरे आहे.  मेजर जनरल सर जॉन मेगॉ हे इंडियन मेडिकल सर्व्हिस (हिंदुस्थान सरकारचे डॉक्टरी खाते) चे डायरेक्टर-जनरल (सर्वाधिकार प्रमुख) होते.  त्यांनी हिंदुस्थानातील सार्वजनिक आरोग्याविषयी सरकारकडे रीतसर वृत्तान्त पाठविताना सन १९३३ च्या वृत्तान्तात म्हटले आहे की— ''ठिकठिकाणच्या दवाखान्यांतील डॉक्टरांच्या माहितीवरून सबंध हिंदुस्थान देशात सरासरी काढली तर पुरेसे अन्न मिळून शरीराचे पोषण कोणाचे कितपत आहे याची आकडेवारी पाहता शेकडा ३९ टक्के लोक नीट पोषण मिळालेले, शेकडा ४१ टक्के थोडे पोषणा झालेले व शेकडा २० टक्के अत्यंत वाईट स्थिती असलेले आढळतात.  परंतु या सवा्रंत निराशाजनक स्थिती आढळते ती बंगालमधील डॉक्टरांनी काढलेल्या आढाव्यात.  त्यांच्या मते त्या प्रांतातील फक्त २२ टक्के लोकांची शरीरे नीट पोषण मिळालेली, आणि ३१ टक्के लोक अत्यंत वाईट स्थिती असलेले आढळतात.''

बंगालची घडलेली ही करुण कथा व ओरिसा, मलबार व इतर ठिकाणी आलेले दुष्काळ हेच हिंदुस्थानवरील ब्रिटिश सत्तेचे गुणदोष-विवेचन करून परमोच्च न्यायदेवतेने दिलेले अभिप्राय आहेत.  ब्रिटिश लोक नक्कीच हिंदुस्थान सोडून जाणार, आणि तसे झाल्यावर हिंदुस्थानवर त्यांचे साम्राज्य एकेकाळी होते याची नुसती एक आठवण काय ती येथे राहील.  पण त्यांना अखेर हिंदुस्थान सोडून जावे लागेल तेव्हा ते येथे मागे काय ठेवून जाणार ? ते चित्र टागोर मृत्युशय्येवर पडलेले असताना त्यांच्या मनश्चक्षूंसमोर तीन वर्षांपूर्वी उभे राहिले होते.  ''पण ते जाताना मागे जो हिंदुस्थान सोडून जातील तो कसा असेल, त्याला किती कठोर दैन्यावस्था आलेली असेल? शतकानुशतके वाहत आलेला त्यांच्या राज्यकारभाराचा ओघ आटून जाईल तेव्हा उघड्या पडलेल्या त्या पात्रात जिकडे तिकडे नुसता चिखल व ओंगळ घाण किती विस्तीर्ण पसरलेली आढळेल?''

हिंदुस्थानाची प्रचंड कार्यशक्ती
मुळातच विसंगतींनी भरलेली ही सृष्टिसरिता, हा जीवनाचा ओघ, दुष्काळ येवो की युध्दे चालोत, त्यांची पर्वा न करता सारखा वाहतच असतो, या आपत्तींच्या पाठोपाठ आलेल्या परस्परविरोधी घटनांमधून व अनर्थामधून सुध्दा हा जीवनाचा ओघ काहीतरी भर स्वत:ला घेतच असतो.  निसर्ग पुन्हा नव्याने जसाच्या तसा होतो आहे.  कालची रणभूमी आज हिरव्याचार गवताच्या रंगीबेरंगी फुलांच्या गालिचाने झाकली जात आहे, कालच्या रणात सांडलेल्या रक्ताने पायाखालच्या भूमीला जीवनरस मिळून नव्या जीवाला जोम चढतो आहे, रंग भरतो आहे.  स्मृती हा असामान्य गुणधर्म अंगी वसत असलेली मानवप्राण्यांची जात, कथारूपाने लोकांच्या आठवणीत राहिलेल्या भूतकालातच मनाने वावरत असते आणि नवा दिवस उजाडला की नवे रूप धारण करणार्‍या ह्या भोवतालच्या जगातल्या नव्या वर्तमानापर्यंत ते मन क्वचितच येऊन पोचते.  आणि त्या वर्तमानाची जाणीव मनाला होते न होते तोच कालचक्रावर फिरणारा पट्टा फिरून, वर्तमान भूतकालात सरकून जाते; कालच्या दिवसातून निधालेल्या आजच्या दिवसाला स्वत:च्या अपत्याकरिता म्हणजे उद्याच्या दिवसाकरिता जागा मोकळी करून द्यावी लागते.  पंख उभारून आकाशात भरारी मारायला निघालेल्या जयश्रीची इतिश्री रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर होते, आणि ज्या घटनेला पराजय समजून अंतरात्मा कष्टी होऊन मोठमोठी संकटे सोशीत असतो त्या संकटांतून तावून-सुलाखून निघताना त्याच अंतरात्म्याला नवे बळ, नवी विशालतर दृष्टी यांचा लाभ झालेला असतो.  ज्यांच्या अंगात धमक नाही ते संकटे आली की त्या परीक्षेत गळून पडतात, पण ज्यांच्यात तेज आहे ते ही मानवी परंपरेची अखंड ज्योत तेवती राखून पुढे चालवतात व भविष्यकालाची ध्वजा धारण करणार्‍या पुढच्या पिढीकडे ती सोपवतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel