भारतीय संस्कृतीने जे साध्य ठरविले होते त्यातले पुष्कळच त्या संस्कृतीला साधले, पण तेवढे साधीत असतानाच त्या संस्कृतीतील चेतना लोप पावू लागली, कारण ती इतकी चलनशील आहे की, जेथे लवमात्रही मृदुता नाही अशा रूक्ष कठोर परिस्थितीच्या आवरणात तिचे अस्तित्व फार काळ टिकत नाही.  ज्यांना शाश्वत म्हणतात अशी ती मूलतत्त्वेसुध्दा आयती मिळाली म्हणून गृहीत सत्ये आहेत असे धरले व त्यांचा शोध करण्याची प्रयत्नवृत्ती नाहीशी झाली की त्यांच्यातील नावीन्य व सत्याची प्रचिती येईनाशी होते, त्यांच्यातही टवटवी जाते.  सत्य, सौंदर्य, स्वातंत्र्य, ह्या कल्पनांना बुरशी चढून त्यांचा र्‍हास होऊ लागतो, व हळूहळू संवेदना नाहीशी करणार्‍या व कायम ठशाच्या कर्मकांडाचे आपण बंदिवान होऊन बसतो.

ज्या गुणाची उणीव भारतात पडत होती तोच नेमका गुण आधुनिक पाश्चात्त्यांच्या अंगी होता.  पुरेपूर भरून ओसंडून जाण्याइतका होता.  त्यांची दृष्टी प्रगमगनशील होती, वृत्तीत चळवळ होती.  सतत पालटत जाणार्‍या जगाच्या व्यवहारात जे गढून गेले होते, शाश्वत तत्त्वांकडे, चिरस्थायी विश्वव्यापी तत्त्वांकडे त्यांचे लक्ष मुळीच नव्हते, त्यांची त्यांना क्षिती नव्हती.  मनुष्यमात्राने फेडावयाची ॠणे, त्याकरिता करावे लागणारे कर्तव्य यांच्याकडे त्यांनी फारशी दृष्टी दिली नाही, त्यांचा भर कर्तव्यापेक्षा हक्कावर अधिक होता.  आपल्या जागी स्वस्थ न राहता सारखी धडपड करावी, काही ना काही आगळीक काढून आक्रमण चालवावे, नवेनवे मिळवीत राहावे, काहीही करून सत्ता मिळवून दुसर्‍यावर गाजवावी अशी त्यांची वृत्ता; ते चालू जीवन जगण्यात दंग होते, आपण करतो त्याचे परिणाम पुढे काय होतील तिकडे मुळीच लक्ष देत नव्हते.  हे पाश्चात्त्य जीवन गतिमान होते म्हणून त्याची प्रगती झाली, ते रंगले, पण त्यातली रसरशी ज्वरासारखी होती व तो ज्वर एकसारखा वाढत चालला होता.

भारतीय संस्कृतीचा कल कर्तृत्वाकडून तटस्थतेकडे वळला, ती स्वत:च्या विचारात मग्न झाली व स्वत:चे कौतुक करण्यात दंग राहण्याची विकृती तिला जडली यामुळे ती विस्कळीत झाली असेल, पण या आधुनिक पाश्चात्य संस्कृतीने विविध क्षेत्रांत साधलेले अपूर्व कार्य लक्षात घेऊनही असे म्हणावे लागते की, तिला काही अपूर्व यश लाभलेले नाही, जीवनाचे मूलभूत प्रश्न तिने अद्याप तरी सोडविलेले दिसत नाहीत, त्याची उत्तरे तिला अद्याप तरी सापडली नाहीत.  विरोध हा तिच्या मूळ प्रकृतीतलाच तिचा अंगीभूत धर्म आहे, स्वस्थतेचा काही काळ गेला की तिला आत्मनाशाचा झटका येऊन ती राक्षसी थैमान घालू लागते.  ज्यामुळे संस्कृतीला स्थैर्य यावे, ज्या मूलतत्त्वामुळे मानवी जीवनाचा हेतू, भावार्थ, कळावा असे जे काही असेल ते त्या संस्कृतीत नाही, पण हे न्यून काय आहे ते मला सांगता येत नाही.  पण त्या संस्कृतीतील शक्ती चलत्-स्वरूपाची आहे, तिच्यात चैतन्य भरपूर आहे, व तिच्या वृत्तीत जिज्ञासा आहे, म्हणून तिच्या भाविकालाबद्दल आशा करायला जागा आहे.

हिंदुस्थानला व चीनला पाश्चात्त्यांकडून शिकण्याजोगे असे ज्ञान पुष्कळच आहे, कारण या वर्तमान युगाची मन:प्रवृत्ती काय आहे ते या आधुनिक पाश्चात्त्य संस्कृतीच्या रूपाने प्रतीत होते आहे.  पण पाश्चात्त्यांनीही शिकण्याजोगे असे पुष्कळ शिल्लक राहिले आहे. उद्योगधंद्यांतील व यंत्रशास्त्र, रसायनशास्त्र वगैरे विज्ञानातील तंत्रात त्यांची कितीही प्रगती झाली तरी, ज्या अधिक अगम्य व गहनगूढ जीवनाच्या चिंतनात प्राचीन कालापासून अर्वाचीन कालापर्यंतचे देशोदेशींचे तत्त्ववेत्ते मग्न होते त्या जीवनापासून काही धडे घेतल्याशिवाय व ते ज्ञान थोडेफार आत्मसात केल्याशिवाय ह्या नुसत्या वरवरच्या तांत्रिक प्रगतीने मनाचे खरे समाधान त्यांना लाभणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel