बुध्दिप्रामाण्याच्या व विज्ञानशास्त्राच्या ह्या मर्यादा ध्यानात ठेवून, आपण आटोकाट प्रयत्न करून त्यांचाच आधार घेत राहिले पाहिजे.  तो सोडून आपले चालणार नाही. कारण ह्या जोडीच्या पार्श्वभूमीवाचून व तिचा भक्कम आधार घेतल्याशिवाय सत्य व शाश्वताच्या कोणत्याच भागावर आपली कसलीही पकड राहणे शक्य नाही.  त्या अनंत सत्याला एखादा लहानसा भागच का होईना पण तेवढा तरी नीट समजून घेऊन त्याचा उपयोग आपल्या जीवनात करावा हा मार्ग, चैतन्यांचे गुढ भेदून जाण्याचा व्यर्थ खटाटोप करता करता काहीच उलगडा न होता असाहाय्यपणे गटांगळ्या खात बसण्यापेक्षा केव्हाही अधिक श्रेयस्कर आहे.  विज्ञानशास्त्राचा नाना प्रकारे उपयोग करून घेणे हल्लीच्या काळी सर्वच देशांना, सर्वच लोकांना अपरिहार्य आहे, त्यांनी टाळू म्हटले तरी ते टळत नाही.  पण त्या शास्त्राने जे काही उपलब्ध करून दिले आहे त्याचा उपयोग करून घेण्यापलीकडचे त्या शास्त्रात आणखी जे काही आहे त्याचा उपयोग करून घेणे अवश्य आहे.  कोणत्याही प्रश्नाचा विचार करताना त्या शास्त्रात ठेवलेला दृष्टिकोण, धाडसी पण चौकस वृत्ती, खरे काय आहे ते पाहण्याकरिता व नवे नवे ज्ञान मिळविण्याकरिता त्या शास्त्राने चालविलेला अविरत शोध, प्रत्यक्ष प्रयोग करून चाचणी घेतल्याखेरीज कोणतीही गोष्ट मान्य करावयाची नाही हा आग्रह, काही सिध्दान्तांच्या बाबतीत नवा पुरावा पुढे आला तर त्या सिध्दान्तात फेरफार करण्याची तयारी, अनुमानावरून काही मत निश्चित करून त्यावर विसंबून राहणे हा प्रकार न करता कोणत्याही बाबतीत प्रत्यक्ष निरीक्षणाने जेवढे काही निश्चित होत असेल तेवढेच गृहीत धरण्याची काटेकोर सवय, व मनाला त्या शास्त्राने लावलेली कडक शिस्त, या सार्‍या गुणांचा आपण अवलंब करणे अवश्य आहे, आणि तेही केवळ विज्ञानशास्त्राचा उपयोग करून घेण्यापुरतेच नव्हे, तर मानवी जीवनात हे गुण उपयोगात आणण्याच्या दृष्टीने व त्या जीवनातल्या नानाविध समस्या सोडविण्याकरिता अवश्य आहे.  हल्ली स्थिती अशी आहे की, विज्ञानशास्त्र-पध्दतीवर पूर्ण विश्वास असलेले, पण आपापल्या विशिष्ट विषयापलीकडे बाकीच्या सार्‍या विषयांत त्या शास्त्रातले हे महत्त्वाचे गुण पार विसरून जाणारे विद्वान फार झालेले आहेत.  विज्ञानशास्त्रीय दृष्टिकोण व वृत्ती म्हणजे एक विशिष्ट प्रकारची वर्तणूक, विचार करण्याची एक विशिष्ट पध्दत, आपल्या भोवतालच्या माणसाशी वागण्याची, त्यांच्याशी मिळून मिसळून चालण्याची एक विशिष्ट तर्‍हा आहे, निदान ती तशी व्हायला पाहिजे.  अर्थात ही अपेक्षा पूर्ण होणे कठीण आहे, कारण हे सारे साधणे दूरच राहिले, पण आपल्यापैकी फारच थोड्या लोकांना आपापले कार्य करताना ह्यातला निदान अंश तरी साधता येईल की नाही याची शंकाच आहे.  पण हे सारे गुणदोष-विवेचन तत्त्वज्ञान व धर्मंसंप्रदाय यांत ठरवून दिलेल्या विधिनिषेधांचा विचार करताना तितकेच किंवा अधिकच उपयुक्त आहे.  मानवाने कोणत्या रीतीने वागावे याचे दिग्दर्शन ही विज्ञानशास्त्रीय प्रवृत्ती करते.  इच्छास्वातंत्र्य मानणार्‍या माणसाची ही वृत्ती आहे.  आपण हल्ली विज्ञानशास्त्राच्या युगात वावरतो आहोत, निदान लोक आपल्याला तसे सांगतात तरी खास, पण लोकांची काय किंवा त्यांच्या पुढार्‍यांची काय, ही वृत्ती असल्याचे फारसे प्रत्यंतर येत नाही.

प्रत्यक्ष-प्रमाणांच्या आधारावर उपलब्ध झालेले प्रत्यक्ष ज्ञान हे विज्ञानशास्त्राचे क्षेत्र आहे पण त्या शास्त्रामुळे जी वृत्ती अंगी बाणावी तिचे क्षेत्र मात्र त्या शास्त्रापुरते मयोदित नाही. ज्ञान मिळवणे, सत्याची प्रचीती करून घेणे, सात्त्विता व सौंदर्य यांचे महत्त्व ओळखून त्यांचे रसग्रहण करणे ही मानवाची अंतिम उद्दिष्टे असावी असे म्हणायला प्रत्यवाय नाही.  या सार्‍या विषयांतून विज्ञानशास्त्राची वस्तुनिष्ठ अन्वेषणपध्दती चालवून काही उपयोग होत नाही, आणि या विषयाबाहेरचे परंतु जीवनाला अत्यंत महत्त्वाचे असे आणखी पुष्कळच विषय असे आहेत की ते या अन्वेषणपध्दतीच्या क्षेत्रात येत नाहीत.  काव्याने किंवा कलेने तत्काळ उचंबळून येणारी रसिकवृत्ती, सौंदर्याच्या दर्शनाने जागी होणारी भावना, जे काही चांगले आढळेल त्यातला मांगल्याला मान्यता देण्याची सहजस्फूर्त वृत्ती असल्या अनेक विषयांत ही अन्वेषणपध्दती निरुपयोगी आहे.  वनस्पतिशास्त्र किंवा प्राणिशास्त्र यांत पारंगत असलेल्या विद्वानांना निसर्गातील सौंदर्य व लालित्य यांची प्रचीती येईलच असे नाही, कोणी एखादा समाजशास्त्र असा आढळेल की त्याला मानवी प्राण्याबद्दल तितकेसे प्रेम वाटत नसेल, पण ह्या विज्ञानशास्त्रीय पध्दतीच्या आटोक्याबाहेरच्या, तिला अगम्य असलेल्या प्रांतात आपण गेलो आणि तत्त्वज्ञानाने जेथे उत्तुंग गिरिशिखरावर आश्रम उभारला आहे तेथेपर्यंत जाऊन त्या दर्शनाने आपल्या मनात गहन गंभीर विचारांची गर्दी उसळली किंवा तेवढ्या उंचीवर चढून गेल्यामुळे त्या शिखरांच्या पलीकडे पसरलेल्या अफाट अनंत प्रदेशाकडे आपण अनिमिष दृष्टीने टकमक पाहात राहिलो, तरी विज्ञानशास्त्रातला दृष्टिकोण व वृत्ती आपण सतत मनात बाळगले अवश्य आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel