राष्ट्रीयत्व ह्या कल्पनेचे महत्त्व : हिंदुस्थानात अवश्य ते फेरफार
भूतकालावर अंधश्रध्दा ठेवण्याची वृत्ती वाईट आहे तशीच भूतकालाचा तिरस्कार करण्याची वृत्तीही वाईट आहे, कारण ह्यातील कोणत्याही वृत्तीवर भविष्यकालाची उभारणी होणे शक्य नाही.  भूतकालात जे काही घडले त्यातूनच वर्तमानकालातले निघणार व त्यातून भविष्यकालातले निघणार व म्हणून भूतकालाचा परिणाम वर्तमान व भविष्यकालावर होणे अटळ आहे.  हा अटळ क्रम लक्षात न घेता काही करायला गेले तर पाया न घेता बांधकाम उभारण्याची ती व्यर्थ खटपट ठरेल, राष्ट्राची वाढ करायला जाऊन राष्ट्राची मुळे कापून टाकल्यासारखे मात्र होईल.  भूतकालात काही अर्थ नाही अशी वृत्तीने त्या कालाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जनमनावर अत्यंत प्रभाव पाडणार्‍या एका मोठ्या शक्तीचा जाणूनबुजुन अव्हेर करणे आहे.  राष्ट्रीयत्व, राष्ट्रप्रेम, म्हणजे त्या राष्ट्रातील लोकांनी भूतकालात जी काही मोठमोठी कामे पार पाडली असतील, जे पराक्रम गाजविले असतील, अनेक प्रसंगी जे अनेक अनुभव घेतले असतील, त्यांच्या आचारविचारांत ज्या काही विशिष्ट परंपरा ते पाळीत आलेले असतील, त्या सर्वांची त्या लोकांना असलेली आठवण, त्या सर्वांची मिळून सामूहिक स्मृती.  पुष्कळ लोकांना असे वाटत होते की, या राष्ट्रीयत्वाच्या वृत्तीचा, या राष्ट्रप्रेमीवृत्तीचा काळ संपला आहे.  आधुनिक जगात जी आंतरराष्ट्रीय जागतिक प्रेमाची ऊर्मी आलेली आहे ती आता ह्या जुन्या राष्ट्रप्रेमाची जागा घेणार.  राष्ट्रीय संस्कृती, राष्ट्राभिमान, म्हणजे कुजून झिजत चाललेल्या मध्यमवर्गाशी निगडित संबंध असलेले एक थोतांड आहे, असा उपहास श्रमजीवी कामकरी वर्गाची पार्श्वभूमी घेतलेल्या समाजसत्तावादाच्या पुरस्कर्त्यांनी चालवला.  वेगवेगळ्या देशांतील व्यापारातले श्रेष्ठी व त्यांनी चालविलेली व्यापारमंडळे यांनी देशोदेशींच्या मालाची घाऊक देवघेव करताना आपल्या मालाच्या किंमती चढ राहाव्या या उद्देशाने केलेले आंतरराष्ट्रीय संघ, व आपापले भांडवल एकत्रित करून त्या भांडवलाच्या जोरावर वेगवेगळ्या व्यापारधंद्यांचे नियंत्रण आपल्या हाती राहावे म्हणून ह्या धनिक श्रेष्ठींनी, व व्यापारमंडळांनी केलेली एकजूट, यामुळे खुद्द भांडवलशाहीसुध्दा उत्तरोत्तर आंतरराष्ट्रामध्ये भेदभाव उरला नाही.  देशोदेशींच्या मालाची सर्व देशांतून चाललेली घाऊक व किरकोळ खरेदीविक्री, वाहतुकीत आलेली सुलभता व माणसांच्या व मालांच्या वाहनांचा वाढलेला वेग, रेडिओ, सिनेमा, या सार्‍या गोष्टींमुळे जगभर आंतरराष्ट्रीय वृत्ती निर्माण होऊ लागली, आणि लोकांत असा एक भ्रम पसरला की, आता यापुढे राष्ट्रीयतेच्या, राष्ट्रप्रेमाच्या भावनेचा, अंत होणार हे निश्चित, तिचा शेवट आता जवळ येऊन ठेपला आहे.

पण हा भ्रमच आहे, कारण इतके सगळे काही असले तरी कोणताही आणीबाणीचा प्रसंग उद्‍भवला म्हणजे देशात पुन्हा राष्ट्रीय भावनेचाच उदय उत्तरोत्तर होतो आहे, त्या प्रसंगी तीच भावना सर्वात अधिक प्रभावी ठरते आहे, आणि आपल्या मनाला सुखसमाधान वाटावे, धीर यावा, म्हणून लोक आपापल्या जुन्या परंपरेचा, आपले राष्ट्र या भावनेचाच आश्रय घेत आहेत.  हल्लीच्या काळात ज्या काही विशेष लक्षात येण्याजोग्या गोष्टी दिसू लागल्या आहेत त्यांपैकी एक अशी की, लोक आपल्या राष्ट्राची, आपल्या पूर्वेतिहासाची ओळख काढू लागले आहेत.  आपल्या राष्ट्रीय परंपरेकडे परत धाव घेण्याची ही प्रवृत्ती, कोणतीही चळवळ करायची झाली तर ती आंतरराष्ट्रीय, दृष्टीने चालवली पाहिजे या तत्त्वाचे ज्यांना खंदे पुरस्कर्ते मानले जाते त्या श्रमजीवी कामगारवर्गातील सर्वात खालच्या सामान्यश्रेणीतील लोकांत, विशेषच दिसून येते.  युध्द आले; किंवा देशावर तसाच काही प्रसंग आला की या लोकांची ती आंतरराष्ट्रीय वृत्ती पार वितळते, आणि समाजातील इतर कोणत्याही वर्गांपेक्षा हा वर्ग प्रत्येक बाबतीत स्वराष्ट्रप्रीतीच्या अनुराधाने भय किंवा द्वेष या भावनांच्या आहारी विशेष जातो.  ह्याचे अगदी ठळक उदाहरण म्हणजे रशियाच्या सोव्हिएट संघात नुकतेच अलीकडे जे काही घडले ते होय.  तेथील आर्थिक व सामाजिक व्यवस्था जी काही ठरली तिच्यात त्यांनी काहीही महत्त्वाचे फेरफार केले नाहीत, पण तरी सुध्दा त्यांच्यात राष्ट्रीय वृत्ती पूर्वीपेक्षा अधिक झाली आहे, आणि तेथील लोकांना सार्‍या जगभरच्या श्रमजीवी कामगारवर्गापेक्षा आपल्या स्वत:च्या पितृदेशाचाच जिव्हाळा अधिक वाटू लागला आहे.  त्यांच्या राष्ट्राच्या इतिहासातील प्रख्यात व्यक्तींची पुन्हा नव्याने प्राणप्रतिष्ठा झाली आहे, आणि सोव्हिएट जनता त्यांना आदर्श राष्ट्रपुरुष, त्या इतिहासातील कथांचे नायक मानू लागली आहे.  या महायुध्दात सोव्हिएट जनतेने बजावलेली स्फूर्तिदायक कामगिरी, त्यांनी दाखविलेली धैर्य व त्यांनी एकजूट या सर्वांचे श्रेय त्यांच्या समाजाच्या विशिष्ट आर्थिक व सामाजिक रचनेला दिले पाहिजे.  या विशिष्ट समाजरचनेमुळे त्यांची सर्वांगीण प्रगती झाली, मालाचे उत्पादन व खप करण्याच्या योजना ठरवून पार पाडता आल्या, विज्ञानशास्त्राचा विकास करून त्याचा उपयोग नव्या नव्या प्रकारे करून घेता आला, पुढारी होण्याची पात्रता व चातुर्य अंगी असलेले लोक निवडून घ्यायला नवे क्षेत्र मिळाले, आणि नेतृत्वात वेळोवेळी चमकही झळकली पण कदाचित या यशाचे निदान अंशत: तरी श्रेय तेथील जनतेमध्ये त्यांच्या राष्ट्रीय स्मृतींचे व परंपरेचे जे पुनरुज्जीवन झाले, राष्ट्राच्या पूर्वेतिहासाची जी जाणीव नव्याने पुन्हा लोकांना आली आणि आपल्या राष्ट्राचा चालू इतिहास म्हणजे राष्ट्राच्या इतिहासातले एक पूर्वेतिहासाच्या पुढचे पान आहे, जे पूर्वी आपण करून दाखवले ते आजही करून दाखवू या भावनेने लोक भारले गेले, या गोष्टींनाही असणे शक्य आहे.  पण याचा अर्थ, सोव्हिएट जनतेत ही जी राष्ट्रीय वृत्ती आली ती म्हणजे त्यांच्या जुन्या राष्ट्राभिमानाची केवळ पुनरावृत्ती, एवढाच करणे चुकीचे ठरेल.  त्याचा अर्थ तसा नाही हे निश्चित.  तेथे झालेली राज्यक्रांती व त्यानंतर जे जे काही घडत गेले त्याचा विसर लोकांना पडणे शक्य नाही, त्या सर्व प्रकारांमुळे समाजरचनेत जी स्थित्यंतरे झाली व त्यांच्याशी जुळती जी नवी मनोवृत्ती आली ती टिकून राहणारच.  ती समाजरचनाच अशी आहे की, तिच्यामुळे एक प्रकारची आंतरराष्ट्रीय दृष्टी येणारच.  पण राष्ट्रीय वृत्ती पुन्हा तेथील लोकांत आली आहे हे निश्चित, मात्र तिला रूप असे आले आहे की, ते नव्या परिस्थितीशी जुळते राहावे, व तिच्यामुळे जनतेचे सामर्थ्य वाढावे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel