मानसिक स्वातंत्र्य, प्रत्यक्ष आचारात कितीही मर्यादित असले तरी निदान विचारापुरते तरी हिंदुस्थानात मान्य असल्यामुळे या देशात नव्या विचारांना बंदी नाही.  जीवनाकडे कोणत्या दृष्टीने पाहावे यासंबंधी अधिक संकुचित व कडवी मते मान्य करणार्‍या इतर देशांच्या मानाने या देशात नवी मते अधिक विचारात घेतली जातात व त्यांना मान्यताही अधिक मिळते.  भारतीय संस्कृतीची मुख्य ध्येये ज्या तत्त्वांच्या आधारावर ठरविली गेली ती तत्त्वे विशाल असल्यामुळे कोणत्याही वाटेत त्या परिस्थितीशी ती ध्येये जुळती करता येतात.  युरोपात एकोणिसाव्या शतकात धर्म व विज्ञान यांच्यात कडवा विरोध येऊन युरोप त्या भांडणांनी हादरून गेला तशी परिस्थिती हिंदुस्थानात प्रत्यक्षात येणे कधीच शक्य नाही.  विज्ञानाच्या योजनेमुळे परिस्थिती पालटली तरी नव्या परिस्थितीचा भारतीय संस्कृतीतील ध्येयाशी विरोध येणार नाही.  अशा प्रकारे परिस्थिती पालटली म्हणजे भारतीय जनमनात खळबळ उडणारच, व ती तशी झालीही आहे, परंतु खळबळ झाली म्हणून नव्याला निकराने विरोध करण्याऐवजी किंवा टाकाऊ म्हणून नवे सोडून देण्याऐवजी आपल्या स्वकीय ध्येयाच्या अनुरोधने नव्याची तेथे सुसंगत व्यवस्था लावण्याची व आपल्या मनोरचनेत ते समाविष्ट करून घेण्याची भारतीय मनोवृत्ती आहे.  नव्याची अशा प्रकारे सुसंगती लावताना व त्याचा समावेश करून घेता घेता भारतीयांच्या जुन्या दृष्टिकोणात पुष्कळच महत्त्वाचे पालट घडून येण्याचा संभव आहे, पण हे पालट अशाच रीतीने घडत गेले म्हणजे ते कोणीतरी परकीयांनी बाहेरून नुसते लादून दिल्यासारखे न वाटता भारतीय जनमनाच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून ते आपोआप नैसर्गिक रीतीने उगवून वाढलेले वाटतील.  हल्लीच्या काळात तर ही नैसर्गिक क्रिया अधिकच अवघड होऊन बसली आहे, कारण जनमनाची वाढ फार काळ पडली आहे, आणि आता वेळ तर अशी आली आहे की, भारतीयाच्या मनोवृत्तीत पालट होणे अगदी निकडीचे झाले आहे आणि ते पालटही मोठेमोठे व प्रकृतिगुणातच व्हावयाला पाहिजेत.

पण हिंदुस्थानातही काही विरोध अपरिहार्य आहे.  मुळच्या प्राचीन भारतीय ध्येयाभोवती त्यांच्या आधाराने जे रान वाढले ते आजही प्रत्यक्षात आहे, त्याची तात समाजाला गळ्याला आवळून लागली आहे, आणि त्या रानाला हात लावायला गेले की त्यापैकी अनेक विषयांवर रण होणार.  हे रान गेलेच पाहिजे, कारण त्यापैकी पुष्कळसे मुळातच वाईट आहे आणि वर्तमानयुगाच्या वृत्तीला ते विरोधी आहे.  ज्यांना हे रान जसेच्या तसे राखण्याची इच्छा आहे त्यांच्या हातून भारतीय संस्कृतीच्या मूळच्या ध्येयांची सेवा घडण्याऐवजी घात मात्र होणार आहे, कारण ते लोक चांगल्याबरोबर वाईट भागही उचलून धरून त्यांची मिसळ करतात व असे केले तर चांगल्या भागाला धोका मात्र उत्पन्न होतो.  चांगल्यातून वाईट तेवढेच निवडून वेगळे काढणे किंवा चांगल्या-वाईटामध्ये काटेकोर रेषा मारणे तितकेसे सोपे नाही, आणि या कामात मतामतांत फार मोठे अंतर पडणार आहे.  पण अशी सिध्दान्तरूप काल्पनिक रेषा काढण्याचेही कारण नाही.  पालटत्या जीवनावरून निघणारी अटळ अनुमाने व कालानुसार घडत जाणार्‍या घटनांची पावले जी रेषा आपोआप पाडतील तीच आपली रेषा ठरणार आहे.  कलाविज्ञानातल्या एखाद्या नव्या शोधाने म्हणा किंवा तत्वज्ञानातल्या एखाद्या नव्या सिध्दान्ताने म्हणा, कोणत्याही रूपाने ज्ञानाचा विकास झाला की प्रत्यक्ष जीवनाशी, समाजाला जे काही अवश्य पाहिजेसे झाले असेल त्याच्याशी, जगातल्या चालू घडामोडीशी त्याचा संबंध जोडावाच लागतो.  असा संबंध जोडला नाही, अलग पडले, तर अंगावर सुस्ती चढून चैतन्याचा व निर्माणशक्तीचा र्‍हास होत जातो.  पण असे संबंध जोडीत गेलो व नवे ग्रहण करण्यात तत्परता राखली तर आपण बहुमोल मानलेले आपले मूळचे वैशिष्ट्य कायम ठेवूनही जीवनातल्या नव्या नव्या वळणाच्या अनुरोधाने स्वत:ला वळण लावणे आपल्याला साधेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel