वेगवेगळ्या देशविभागाचे प्रतिनिधी म्हणून प्रादेशिक तत्त्वावर जे प्रतिनिधी निवडावयाचे त्याखेरीज अशा तर्‍हेने शेतीच्या व उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात चालविलेल्या सामुदायिक स्वामित्वपध्दतीच्या व सहकारी पध्दतीच्या गटांनाही आपले प्रत्यक्ष प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार ठेवावा.  तसे केले म्हणजे लोकशाही स्वरूपाच्या त्या राज्यसंस्थेत वेगवेगळ्या देशविभागांच्या प्रतिनिधींच्या जोडीला वेगवेगळ्या धंद्यांचेही प्रतिनिधी येतील व त्या राज्यव्यवस्थेत प्रादेशिक स्वायत्तताही साधेल.  निवडणुकीत अशा तर्‍हेची काही व्यवस्था करता आली तर ती हिंदुस्थानच्या पूर्वपरंपरेशी जुळती राहील आणि हल्लीच्या काळी देशाला जे काही पाहिजे आहे त्याचीही सोय त्यामुळे लागेल.  मधल्या काळातल्या ब्रिटिश राजवटीतील परिस्थिती सोडली तर इतर कोणत्याही जुन्या परिस्थितीत एकदम उलटापालट झाली असे लोकांना वाटणार नाही, आणि हिंदुस्थानच्या ज्या गतकालीन परिस्थितीची लोकांना अद्यापही आठवण राहिली आहे, जे गतकालाचे चित्र लोक मोठ्या आवडीने आपल्या मनात बाळगतात, त्या परिस्थितीची पुढची पायरी, त्या चित्रांचाच आणखी विकास ह्या नव्या योजनेत आहे असे जनमनाला वाद्वन, लोक ही नवी योजना मनापासून स्वीकारतील.

हिंदुस्थानात अशी उत्क्रांती घडून आली तर ती राजकीय व आर्थिक दृष्ट्या आंतरराष्ट्रीयत्वाच्या कल्पनेशी जुळती अशीच होईल.  त्यामुळे इतर राष्ट्रांबरोबर तंटे होणार नाहीत व आशिया खंडात व जगात शांतता राखण्याच्या कामीही अशी उत्क्रांती फार प्रभावी ठरेल. जगातील सार्‍या राष्ट्रांतल्या लोकांच्या उत्कट मनोविकारामुळे लोकांची कितीही दिशाभूल होत असली, आणि त्यांच्या बुध्दीला तो कितीही अगम्य वाटला, तरी सारी राष्ट्रे जागतिक एकराष्ट्रीयत्वाच्या कल्पनेकडे अपरिहार्य रीतीने हाकलली जात आहेत.  ती कल्पना प्रत्यक्ष मूर्त स्वरूपात आणण्याच्या कार्यातही ह्या उत्क्रांतीचे मोठे साहाय्य होईल.  दडपशाहीचा धाक व निराशेतला कडूपणा या भीषण भावनांचे पाश तुटून पडल्यामुळे स्वतंत्र झालेल्या भारतीय जनतेला पुन्हा थोरवी प्राप्त होईल, भारतीय जनमत विशाल होऊन त्यातील संकुचित स्वरूपाची राष्ट्रीय वृत्ती आणि जगापासून अलग एकलकोंडेपणाने राहण्याच्या प्रवृत्ती मावळेल.  आपल्या प्राचीन परंपरेचा अभिमान बाळगून भारतीय जनता इतर देशांतील लोकांशी, इतर राष्ट्रांशी, मनमोकळेपणाने वागू लागेल आणि या विशाल व चित्ताकर्षक जगाचे नागरिक झालेले भारतीय, ज्या प्राचीन ध्येयाकडे अखिल मानववंशाने आपला साहसपूर्ण प्रवास आरंभला, ज्या प्रवासाची धुरा अग्रेसर होऊन भारतीयांच्या पूर्वजांनी वाहिली, त्या ध्येयाकडे, त्या प्रवासात, इतर राष्ट्रांना बरोबर घेऊन पुढचा प्रवास चालवतील.

हिंदुस्थान : देशाची फाळणी व्हावी, का देशात एक राष्ट्रीय समर्थ राज्यसंस्था असावी, का राष्ट्रीयत्वातील राज्यसंस्थेचे एक केंद्र स्थापावे?

काही गोष्टी घडून येण्याची मनाला आशा, तर काही गोष्टी घडतील की काय अशा मनाला भीती, असे हेलकावे खाताना तोल संभाळणे किंवा आपल्या बुध्दीने विचार चालवताना आपल्या मनाच्या आशाकांक्षांचा रंग त्या विचारात येऊ न देणे, हे काम कठीण आहे.  आपल्या आकांक्षांना पोषक कारणे मन धुंडाळून शोधीत असते, व त्यांच्या विरुध्द जाणार्‍या प्रत्यक्षातल्या घटना व युक्तिवाद दृष्टिआड करण्याकडे मनाची प्रवृत्ती असते असा तोल साधण्याचा, आवडते तेच नेमके निवडून नावडते दृष्टिआड करण्याची प्रवृत्ती होऊ न देण्याचा प्रयत्न मी करतो आहे, तो अशाकरिता की पुढे काय करायचे ते मला ठरवता यावे, त्या कार्याला नीट खरा आधार मला शोधून काढता यावा. पण मी हेही जाणतो की, माझा मनोविकास होत असताना ज्या अनेक विचारांची व भावनांची भर पडून मी हा आहे असा झालो आहे, ज्या विविध विचारांच्या व भावनांच्या अदृश्य प्रतिबंधांनी मला सगळीकडून घेरलेले आहे, ते विचार व भावना मला टाळता येत नाहीत, मी मुळीच स्वतंत्र नाही.  ही माझी, तीच इतरांचीही अवस्था होत असेल, वेगवेगळ्या दिशेने तेही चुकत असतील.  हिंदुस्थान म्हणजे काय आहे, व त्याचे जगात स्थान काय आहे याविषयी एखाद्या हिंदी मनुष्याचे व इंग्रज मनुष्याचे विचार वेगवेगळ्या दिशेने चालणारे, वेगवेगळे असणारच, कारण त्यांच्या वैयक्तिक व राष्ट्रीय जीवनात पूर्वी जे काही घडले त्याचे संस्कार वेगळे व त्यामुळे त्यांच्या मनोभूमिकाही वेगळ्याच होणार.  व्यक्ती व राष्ट्ररूपाने वावरणारे मानवसमूह आपापले भवितव्य आपापल्या कृत्यांनी घडवीत असतात; त्यांनी पूर्वी जे केले त्यामुळे हल्लीचे घडते, व आज ते जे काय करतील तोच पाया ठरून त्याच्यावर त्यांच्या उद्याची बांधणी होते.  ह्या कार्यकारण नियमाला आपण मागे जे काही केले असेल त्यावरून ठरणार्‍या ह्या प्रारब्धयोगाला हिंदुस्थानात कर्म हे नाव फार प्राचीन कालापासून लोक देत आले आहेत.  हा प्रारब्धयोग अटळ मानलेला नाही,  मनुष्याने जे काही स्वत: मागे केले असेल त्याशिवाय इतर अनेक कारणेही त्यात प्रभावी मानलेली आहेत, इच्छा-स्वातंत्र्यालाही त्यात काही वाव आहे असे मानलेले आहे.  आपल्या भूतकालात आपण जे काही केले असेल त्याच्या परिणामात काही फेरफार करण्याचे हे इच्छास्वातंत्र्य नसते, तर मग मात्र अटळ दैवाच्या मगरमिठीत सापडलेल्या कळसूत्री भोवतालच्या स्थितीला पोचण्याचा प्रसंग आपणा सार्‍यांवर आला असता.  इच्छास्वातंत्र्य तर आहेच, पण तरी सुध्दा व्यक्ती किंवा राष्ट्र यांचे प्रारब्ध निश्चित होताना त्यात, त्यांनी मागे जे काय केले असेल त्या त्यांच्या कर्माचा प्रभाव विशेष असतो.  राष्ट्रीयत्व हेच मुळी त्या कर्माची, त्या कर्माच्या गतकालीन बर्‍यावाईट स्मृतींची छाया आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel