समकालीन अडचणी त्या त्या वेळी प्रचंड भासतात, आपले सारे लक्ष तिकडेच गुंतते.  पण जरा दूरवरचा विचार करून आगेमागे पाहून त्या अडचणींचे यथार्थरूप न्याहाळले तर त्या तितक्याशा महत्त्वाच्या वाटत नाहीत.  वरवरच्या ह्या किरकोळ घटनांच्या दर्शनी भागामागे त्यांच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या शक्तींचा कारभार चाललेला असण्याचा संभव आहे.  म्हणून, हिंदुस्थानपुढे हल्ली आलेले हे प्रश्न क्षणभर विसरून जाऊन हिंदुस्थानचा भविष्य-काल काय आहे हे पाहू लागले तर अनेक स्वतंत्र घटकांचा संघ होऊन एक बनलेले, शेजारच्या राज्याशी निकट संबंध जोडलेले, जागतिक कारभारात महत्त्वाचे अधिकार पावलेले, एक संयुक्त, सामर्थ्यशाली राज्य असे हिंदुस्थानचे रूप साकार होऊ लागते.  स्वत:च्या पायावर उभे राहण्याइतकी साधनसंपत्ती व तिचा उपयोग करून घेण्याला पुरेसे बाहुबल व बुध्दिबल असलेले जे काही थोडेच जगात आहेत त्यांपैकी हिंदुस्थान एक आहे.  तसले इतर देश म्हणजे अमेरिकेतील संयुक्त संस्थाने व सोव्हिएट संघ हे दोनच बहुधा ठरतील.  ग्रेट ब्रिटनलाही त्या मालिकेत गणायचे असले तर त्या देशाचे बाहेर जे साम्राज्य पसरले आहे तेही जमेस धरले तरच ते शक्य आहे, आणि त्याही हिशेबाने पाहिले तर इतस्तत: पसरलेल्या व असंतोषाने बुजबुजलेल्या असल्या साम्राज्यापासून ब्रिटनला शक्तिलाभ होण्याऐवजी प्रसंगी शक्तिपात मात्र व्हावया.  देशाची पुरेशी प्रगती करून अमेरिका व रशिया यांच्या मालिकेत गणले जाण्याइतके सुप्त सामर्थ्य चीन व हिंदुस्थान या देशांत आहे.  या दोन्ही देशांपैकी प्रत्येक देश एकसंधी एकजीव आहे, प्रत्येकात नैसर्गिक संपत्ती, मनुष्यबल, बुध्दिबल व पात्रता भरपूर आहे.  खरोखर तसेच पाहू गेले तर आहे याहूनही अधिक वाढ औद्योगिक क्षेत्रात करता येण्याजोगी विविध व विस्तृत साधनसंपत्ती, व देशाला अवश्य वाटेल अशा मालाची आयात करण्याकरिता त्याच्या मोबदल्यात निर्गत करण्याजोगा माल, या बाबतीत चीनपेक्षा हिंदुस्थान सरस ठरेल.  अमेरिका, रशिया, चीन व हिंदुस्थान हे चार देश सोडून जगातला इतर कोणताही देश एकटा घेतला तर, ह्या दृष्टीने तो आज प्रत्यक्षात किंवा पुढे शक्य कोटीतही ह्या तोलाचा नाही.  अर्थात पुढे मागे असे घडण्याचा संभव आहेच की, युरोपात किंवा अन्यत्र, अनेक देशांचे मिळून झालेले संघ किंवा अनेक राष्ट्रांचे मिळून झालेले गट अस्तित्वात येऊन, भिन्नभिन्न राष्ट्रे एकवटून झालेली प्रचंड राज्ये निर्माण होतील.

जगाच्या व्यवहाराची सुत्रे ज्या केंद्रामधून हालविली जातात त्या केंद्रांचा मध्य आतापावेतो अटलांटिक महासागरात होता तो भविष्यकाळी प्रशांत महासागरात बहुधा येईल असे दिसते.  हिंदुस्थान जरी प्रशांत महासागराला टेकलेला नसला तरी तेथील व्यवहारावर हिंदुस्थानचा प्रभाव पडणे अपरिहार्य आहे.  तसेच हिंदी महासागराभोवतीच्या प्रदेशात आशियामधील आग्नेय टोकाला असलेल्या देशांत, व मध्यपूर्वेकडील देशांत ज्या राजकीय व आर्थिक घडामोडी चालतील त्यांचे केंद्र म्हणून हिंदुस्थानला अधिक महत्त्व चढत जाईल.  यापुढे जगाच्या ज्या भागाची स्थिती झपाट्याने सुधारत जाऊन त्याची खूप प्रगती होणार असे दिसते आहे, त्या भागात हिंदुस्थानचे स्थानच असे आहे की, या देशाला आर्थिक दृष्ट्या व अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेला देश म्हणून मोठे महत्त्व आहे.  हिंदुस्थानच्या पूर्वेला व पश्चिमेला हिंदी महासागराला लागून असलेले इतर देश-इराण, इराक, अफगाणिस्तान, सिलोन, ब्रह्मदेश, मलाया, श्यामदेश (सयाम), यवद्वीप (जावा) व स्वत: हिंदुस्थान या सर्व देशांचा मिळून प्रादेशिक संघ झाला तर आज निघाले आहेत ते अल्पसंख्याकांचे प्रश्न नाहीसे होतील, किंवा ते पार नाहीसे झाले नाहीत तरी निदान त्याचा विचार अगदीच वेगळ्या अर्थाने करणे भाग होईल.

मिस्टर जी. डी. एच. कोल या ग्रंथकाराच्या मते एकट्या हिंदुस्थानच्या प्रदेशातच अनेक राष्ट्रे आज आहेत.  उत्तरेला सोव्हिएट संघराज्य आणि पूर्वेला चीन व जपान मिळून एकच समाजसत्तावादी प्रजासत्ताक राज्य, ह्यांना टेकून असलेले, व पश्चिमेला कदाचित इजिप्त, अरबस्तान व तुर्कस्तान मिळून होणारे एक राज्य सोडले, तर मध्यपूर्वेकडील इतर सारे देश व हिंदुस्थान मिळून होणारे एक अनेकराष्ट्रीय परंतु एकच राज्यसंस्थेचे अधिराज्य असणारे असे एक बलाढ्य राज्य भविष्यकाळात बर्‍याच काळानंतर परंतु नक्कीच होईल, व त्या राज्याचे केंद्र हिंदुस्थानातच राहील, हिंदुस्थानाचा तो योग अटळ आहे, असेही त्याचे मत आहे, अर्थात, भाविकालात काय घडेल याबद्दल त्यांचा हा एक केवळ अजमास आहे एवढेच, अशा प्रकारच्या काही घटना कधीकाळी तरी घडतीलच अशी खात्री कोणालाच देता यायची नाही.  माझ्या स्वत:पुरते बोलायचे झाले तर, सामान्यपणे प्रत्येक राष्ट्राचे स्वतंत्र राज्य असावयाचे ही आजपावेतोची कल्पना सोडून देऊन, जगात ठिकठिकाणी अनेक राष्ट्रे मिळून एकच राज्य असलेली, अवाढव्य विस्ताराची काही मोजकी व प्रचंड राज्ये अस्तित्वात यावी ही घटना, त्या राज्यांचा एकमेकांशी कलह न होऊ देता त्यांना एकत्र बांधून ठेवण्याचे सामर्थ्य अंगी असलेले एखादे तितके बलिष्ठ जागतिक बंधनही त्याबरोबरच अस्तित्वात आल्याखेरीज, मला स्वत:ला मान्य नाही. पण जगातले लोक, जगभर एकोपा राखून काही एखादी जागतिक संघटना निर्माण करण्याचे काम, जर वेडेपणा करून टाळूच लागले, तर अनेक राष्ट्रे मिळून झालेली, अवाढव्य विस्ताराची व प्रत्येक राष्ट्राची स्वायत्तता अबाधित ठेवून सर्वांचे मिळून एक राज्य असलेली प्रचंड राज्यमंडले पुढे अस्तित्वात येण्याचा फार संभव आहे.  कारण प्रत्येक राष्ट्राचे स्वतंत्र राज्य असलेल्या लहान-सहान राज्यांना यापुढे निभाव लागणार नाही, त्यांचा अंत अटळ आहे.  स्वत:ची स्वतंत्र संस्कृती असणारा एक स्वायत्त प्रदेश एवढ्याच स्वरूपात ही असली लहान राष्ट्रे पुढेही कदाचित टिकतील, परंतु राजकीय क्षेत्रात एक स्वतंत्र घटक हे त्यांचे रूप राहणार नाही.

भविष्यकाळी घटना कशाही घडोत, एवढे खरे की हिंदुस्थानला जगात काही प्रतिष्ठा मिळवता आली तर ते जगाच्या कल्याणाचेच ठरेल, कारण हिंदुस्थानच्या अंगी जी काही कर्तृत्वशक्ती असेल ती नेहमीच शांतता व सहकार्याच्या पक्षाचे व आक्रमकांविरूध्द कार्य करीत राहील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel