यथार्थतादृष्टी व भौगोलिक-रचनानुवर्ती राजकारणशास्त्र
जागतिक दिग्विजय की जागतिक सहकार्य
संयुक्त अमेरिकन संस्थाने व संयुक्त सोव्हिएट समाजसत्तावादी प्रजाराज्ये


या महायुध्दाचे अखेरचे पर्व युरोपात सुरू झाले आहे, आणि पूर्वेकडून व पश्चिमेकडून दोन्ही बाजूंनी चढाई करून आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सेनांच्यामध्ये सापडलेल्या नाझी राज्याच्या शक्तीचा धुव्वा उडतो आहे.  स्वातंत्र्ययुध्दाशी वारंवार संबंध आल्यामुळे स्वातंत्र्याच्या कल्पनेशी अत्यंत निगडित असलेली रमणीय व मधुराकृती पॅरिस ही नगरी पुन्हा स्वत:स्वतंत्र झाली आहे.  युध्दकालापेक्षाही अधिक अवघड अडचणी शांततेच्या काळात निघतात.  त्या शांतताकालातल्या अडचणींची भुते आताच उभी राहून लोकांना भिववीत आहेत, आणि या भुतांच्या मागे पहिल्या महायुध्दानंतरच्या काळात जगात शांतता कायमची नांदावी म्हणून करण्यात आलेल्या थोर प्रयत्नांना जे मोठे अपयश आले त्याची भेसूर छाया पसरलेली असल्यामुळे लोकांची मने साशंक होत आहेत.  तोंडाने अशा घोषणा चालल्या आहेत की, यापुढे जगात युध्द म्हणून काही होऊ द्यायचेच नाही.  मनात असे आठवते की हीच घोषणा १९१८ सालीही होत होतीच.

पंधरा वर्षांपूर्वी, १९२९ साली, मि. विन्स्टन चर्चिल म्हणाले, ''ही कथा एकंदरीत अशी समाप्त झाली आहे, आता आपली इच्छा असेल तर निदान भविष्यकाळची तरतूद म्हणून त्या कथेतून मिळायचे ते ज्ञान व घ्यायचा तो बोध आपल्याला घेता येईल.  ज्यांच्या वरून राष्ट्राराष्ट्रात युध्दापर्यंत पाळी आली ती भांडणे व त्यांचा सोक्षमोक्ष लावून घेण्याकरिता एकमेकांशी लढताना सोसाव्या लागणार्‍या यातना यांचे विषम प्रमाण; युध्दात पराक्रमाची शर्थ केली तरी त्यामुळे पदरात पडणार्‍या किरकोळ निरुपयोगी लाभांचे क्षुल्लक पारितोषिक; युध्दप्रसंगी क्षणात इकडे तर क्षणात तिकडे झुकणारे चंचल यश; युध्दात झालेली हानी भरून काढण्याकरिता करावे लागणारे दीर्घ व मंदगती प्रयत्न; मोठ्या हिमतीने पत्करून पार केलेल्या कार्यातील धोक्यांचे भीषण स्वरूप; सर्वनाश व्हायची वेळ यावी पण केवळ त्या क्षणी फाशाचे दान सुलटे पडल्याप्रमाणे योगायोगानेच निमिषार्धाच्या अंतराने तो मृत्यूचा क्षण टळावा असे आलेले दैवयोग; या समाप्त झालेल्या कथेतल्या गोष्टी दृष्टीसमोर फिरल्या म्हणजे तरी त्यावरून मनुष्यजातीने असा बोध घ्यावा की, यापुढे जगात महायुध्द म्हणून होऊ द्यायचेच नाही हाच मुख्य उद्योग मनुष्याने चालविला पाहिजे.''

हे उद्‍गार स्वानुभवाचे आहेत, कारण चर्चिलसाहेबांनी युध्दकाळात तशीच शांततेच्या काळातही मोठी महत्त्वाची कामे आपल्या नेतृत्वाखाली पार पाडली आहेत, सर्वनाशाच्या प्रसंगातून व तीव्र यातना सोशीत चाललेल्या त्यांच्या मायभूमीला त्यांनी स्वत: अलौकिक धीर दाखवून पार पाडलेले आहे, आणि विजय प्राप्त झाल्यावर तिच्या वैभवाचे मोठमोठे महत्त्वाकांक्षी विचार त्यांच्या मनात घोळले आहेत.  पहिल्या महायुध्दानंतर हिंदुस्थानच्या सीमेपलीकडचा पश्चिम आशियाचा सारा प्रदेश, इराण, इराक, पॅलेस्टाईन, सिरिया वगैरे देश धरून थेट इस्तंबूलपर्यंतचा सारा मुलूख ब्रिटिश फौजांनी व्यापलेला होता.  त्या वेळी चर्चिलसाहेबांच्या मनश्चक्षूं पुढे सबंध मध्यपूर्व आशियाभर पसरलेल्या एका नव्या ब्रिटिश साम्राज्याचे उज्ज्वल स्वप्न तरळत होते, पण दैवगती काही वेगळीच होती, ते प्रत्यक्षात अवतरले नाही.  आता भविष्यकाळाची कोणती सुखस्वप्ने त्यांच्या मनात घोळत असतील? हल्ली कारावासात पडलेल्या माझ्या एका मोकळ्या वृत्तीच्या माननीय सहकार्‍याने लिहिले आहे, ''युध्द म्हणजे असा एक अजब किमयागार आहे की, त्याच्या प्रयोगशाळांमधून दृष्टीआड चाललेल्या रसक्रियेतून विविध शक्ती व प्रेरणा निघून त्या युध्दात जिंकलेल्या व हरलेल्या, दोन्ही पक्षांचे सारे बेत पार ढासळून पडतात, पहिल्या महायुध्दानंतर भरलेल्या कोणत्याही शांततापरिषदेने असे ठरवले नव्हते की, युरोप व आशियामधील चार बलाढ्य साम्राज्ये-रशिया, जर्मनी, आस्ट्रिया व तुर्कस्तान या देशांची साम्राज्ये-उद्ध्वस्त होऊन मातीत मिळावी.  त्या शांतता परिषदेतील प्रमुख मुत्सद्दी लॉईड जार्ज, क्लेमेंको किंवा विल्सन यांनी असे निश्चित आज्ञापत्र कधीच काढले नव्हते की, रशिया, जर्मनी, तुर्कस्तान या देशांतून त्यानंतर जी प्रचंड राज्यक्रांती झाली ती घडून यावी.'' आताच्या या चालू महायुध्दात जे देश विजयी ठरतील त्यांचे प्रमुख नेते त्यांच्या सार्‍या प्रयत्नावर यशाचा कळस चढला म्हणजे एकत्र जमतील तेव्हा ते कोणते विचार बोलून दाखवतील? भविष्यकाळाचे कोणते स्वरूप त्यांच्या मनात घोळते आहे, त्यांचे आपसात मतैक्य किंवा मतभेद कितपत आहेत? युध्दामुळे चेतलेल्या लोकांच्या प्रक्षुब्ध भावना शांत होऊन, पूर्वीच्या कधीकाळी तरी होता अशासारखा वाटणारा जो शांततेचा काळ, त्या शांततेच्या काळातल्या आपापल्या उद्योगाला लागण्याचा प्रयत्न सारे लोक जेव्हा करू लागतील, तेव्हा त्यामुळे आणखी काय काय प्रक्रिया घडून येतील?  युरोपातील नाना देशांतून जेत्यांचा प्रतिकार करण्याकरिता गुप्त चळवळी चालल्या, व त्यांच्यामुळे त्या देशातून काही वेगवेगळ्या नव्या शक्ती निर्माण झाल्या, त्यांचे काय व्हावयाचे?  युध्दप्रसंगामुळे निर्ढावलेले व वयाच्या मानाने खूपच पोक्त, अनुभवी, विचारी बनलेले लक्षावधी सैनिक आपापल्या घरी आपला जुना आयुष्यक्रम चालवण्याकरिता परतून येतील तेव्हा ते कोणते मनचे विचार बोलून दाखवतील, पुढे काय करतील? ते तिकडे युध्दात गुंतलेले असताना इकडे सतत बदलत गेलेल्या जीवनाशी त्यांचा मेळ कसा घालता येईल?  स्वत्व राखण्यापायी अनन्वित छळ सोसता सोसता उद्ध्वस्त होऊन गेलेल्या युरोपखंडाचे भवितव्य काय? आशिया आणि आफ्रिका यांचे पुढे काय व्हावयाचे? ''आशियामधील कोट्यवधी लोकांच्या स्वातंत्र्याकांक्षा उचंबळून उठलेली प्रक्षोभाची अनिवार लाट'' असे जिचे मि. वेंडेल विल्की यांनी वर्णन केले आहे त्या लाटेचे काय व्हावयाचे? वर दिलेल्या या व यांच्यासारख्या आणखी कितीतरी गोष्टी आहेत त्यांचे पुढे काय व्हावयाचे? आणि या सर्वांच्या डोक्यावरून हात फिरवणारी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेत्यांनी काळजीपूर्वक विचार करून ज्या योजना अगदी निश्चित म्हणून ठरवल्या जे मोठेमोठे बेत रचले त्यांचा खेळखंडोबा करण्याची जी अजब हातचलाखी दैव अनेक वेळा दाखवते तिचा काय हिशेब?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel