खरोखर वस्तुस्थिती अशी आहे की, कोणीतरी सबंध जग जिंकून जगभर एकच सत्ता चालवावी किंवा जगातील वेगवेगळ्या राज्यांनी एकमेकांशी सहकार्य करून एकविचाराने चालावे याखेरीज तिसरा पर्यायच दिसत नाही, मधला काही तिसरा मार्गच उपलब्ध नाही. जगाचे पडलेले जुने विभाग आणि त्यांचे शक्तिसाधनेकरिता चालणारे ते राजकारण यांना आता काही अर्थच उरलेला नाही, त्या मार्गांचा आजच्या परिस्थितीशी काही मेळ बसत नाही. तरी पुन्हा तेच ते चाललेच आहे. प्रत्येक राष्ट्राच्या राज्याचे हितसंबंध व त्यांचे कार्यक्षेत्र त्यांच्या भौगोलिक सीमेच्या पलीकडे पसरलेले आहेत व आता तर ते जगभर जिकडे तिकडे पसरलेले आहेत. अशी परिस्थिती असल्याने कोणत्याही राष्ट्राला इतरांशी फटकून अलग राहता येत नाही. इतर राष्ट्रांच्यावर आलेल्या आर्थिक किंवा राजकीय प्रसंगांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. राष्ट्राराष्ट्रांमध्ये सहकार्य नसले तर संघर्षाचे प्रसंग येणारच आणि त्याचे व्हायचे ते परिणामही ओढवणार. सहकार्य करायचे झाले तर त्याकरिता उभयतांनी एकमेकांना समान लेखून चालले पाहिजे, दोघांच्याही मनात दोघांचेही भले व्हावे अशी सदिच्छा पाहिजे, त्याकरिता मागासलेली राष्ट्रे किंवा लोकसमाज यांना पुढारलेल्या इतरांनी साहाय्य करून सर्वानाच सुस्थिती व समान सांस्कृतिक श्रेणी येईल अशी खटपट केली पाहिजे. वंशश्रेष्ठत्वाची स्वार्थी, संकुचित, गर्विष्ठ वृत्ती व इतरांवर अधिकार गाजविण्याची लालसा मनातून काढून टाकली पाहिजे. परक्याकडून अन्यायाने होणारी पिळवणूक सोसायला, त्याची पिळवणुकीला, त्या अरेरावीला दुसरे कसले तरी अधिक गोंडस नाव दिले तरी तयार नाहीत; आणि जगातल्या इतर देशांची भरभराट चालली असताना आपल्याला मात्र दैन्य-दारिद्र्य भोगावे लागते आहे याचे त्यांना काहीच वाटू नये ही स्थिती यापुढे राहणार नाही. जगात दुसरीकडे काय चालले आहे हे जेव्हा लोकांना कळत नव्हते तेव्हाची गोष्ट वेगळी होती, ती त्या काळी काय ती शक्य होती.
हे सारे विचार कोणालाही सहज सुचावे इतके स्पष्ट दिसतात, पण जगात आतापर्यंत जे काही घडत आले त्याचा प्रदीर्घ इतिहास तर असे दिसते की, वर्तमानकाळी जे काही घडत असते त्याच्या मागे कोठे तरी मानवी मन रेंगाळत असते, वर्तमानाशी मनोवृत्ती जुळवून घेण्याची मानसिक क्रिया मंदपणे चालते. भावी कालात आपल्यावर अनर्थ ओढवू नये, इतर राष्ट्रांचे स्वातंत्र्य मान्य करून आपले स्वत:चे स्वतंत्र राष्ट्रीय जीवन निर्बंध चालवता यावे, म्हणून निदान स्वार्थदृष्टीने तरी प्रत्येक राष्ट्राला इतर राष्ट्रांशी सहकार्य करण्याची निकड लागावी. पण प्रत्यक्षात पाहू गेले तर या 'वास्तववादी' विचारवंतांचा स्वार्थ, भूतकाळातल्या कल्पित कथा आणि ठरीव ठशाची सूत्रवाक्ये यातच अडकून पडला आहे; त्या त्या काळापुरते अनुरूप असे विचार व तेव्हाची समाजव्यवस्था हेच मानवी स्वभावातले नैसर्गिक, निरंतरचे, त्रिकालाबाधित घटक आहेत असे त्यांना वाटते. माणसांच्या मनोवृत्ती, मनुष्यसमाज यांच्यात जितका पालट होत असतो तितका दुसर्या कशातही होत नसेल, याचा या विचारवंतांना विसर पडलेला दिसतो. धार्मिक विधी व धर्मसमजुतींची रूपे कायम ठशाची होऊन बसतात; समाजसंस्थेतील जिवंतपणा जाऊन तिच्या अंगोपांगांतून बधिरपणा येऊन तिला कालांतराने पाषाणासारखे अचलत्व येते; सशस्त्रयुध्द हे प्राणिशास्त्रदृष्ट्या मानवी उत्क्रांतीचा अवश्य घटक मानले जाऊ लागते; जे राष्ट्र आपला विस्तार वाढवील, साम्राज्य मिळवील त्यातले लोक पुरोगामी आहेत, त्यांच्यात चैतन्य खेळते आहे, त्यांना तसे करण्याचा विशेष अधिकारच आहे, अशा समजुती प्रचलित होतात, परस्पराशी व्यवहार करताना त्यातून आपल्याला अधिकात अधिक लाभ, स्वत:पुरता स्वार्थी लाभ हेतू हाच त्या व्यवहाराचा मुख्य भाग गणला जातो; आणि आपली स्वत:ची मानववंशशाखा इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे व म्हणून आपण श्रेष्ठ आहोत या कल्पनेला कडव्या अंधश्रध्देचे रूप प्राप्त होते, तो प्रत्यक्ष उघड बोलून दाखवली जात नसली तरी एक निर्विवाद सिध्दान्त म्हणून ती मनोमनी मानली जाते. ह्या असल्या नाना कल्पना, हे विचार पौर्वात्याप्रमाणेच पाश्चात्त्यांतही पुष्कळसे प्रचलित होते, व त्यातूनच पुढे नाझी व फॅसिस्ट तत्त्वप्रणाली निघाल्या. नीतिदृष्ट्या पाहिले तर हे विचार व फॅसिस्ट तत्त्वप्रणाली यांत फारसे अंतर नाहीच, पण मानवी जीव व अखिल मानवजात तेवढी सारी एक आहे असे समजून तिच्या कल्याणाकरिता जपले पाहिजे ह्या तत्वावर आधारलेले सारे विचार म्हणजे क:पदार्थ लेखण्यात फॅसिस्ट तत्त्वप्रणालीने खूपच पुढे मजल मारली आहे. खरोखरच पाहिले तर दिसते की, युरोपमधील लोकांच्या विचारसरणीत अखिल मानवजातीविषयी जो जिव्हाळा आज अनेक वर्षे परंपरागत दिसून येत होता त्या परंपरेचा तेथे हळूहळू लोप होतो आहे. पाश्चात्त्यांच्या राजकीय व आर्थिक व्यवस्थेत फॅसिस्ट तत्त्वे बीजरूपाने होतीच. ही सारी जुनी, मागे पडलेली, तत्त्वप्रणाली सोडून दिली नाही, तर युध्दात जय मिळूनही काही मोठेसे स्थित्यंतर होत नाही. ती जुनी तत्त्वप्रणाली सुटली नाही की लोकांच्या मनात तीच जुनी, केवळ कल्पनेतही सृष्टी घोळत राहते, त्यांचे ते जुने छंद सुटत नाहीत, आणि मग त्यामुळे चढलेल्या त्या धुंदीच्या नशेत तीच ती जुनी अक्राळविक्राळ भुते पूर्वीप्रमाणेच पाठीशी उभी राहिल्यामुळे जग त्याच त्या जुन्या रंगणात गिरक्या मारू लागते.