सध्या ब्रिटन ज्या काही विशेषच परिस्थितीत सापडले आहे ती पाहिली म्हणजे आपल्या राज्यसंघात व साम्राज्यात असलेल्या देशांत परस्पर संघटन वाढून ते अधिक एकजीव व्हावेत असे ध्येय ठेवून ब्रिटिशांनी आपले धोरण का आखले आहे हे समजते.  त्यांचे ध्येय व ते साध्य करण्याकरिता असलेले धोरण साहजिक आहे, पण जगातली स्पष्ट वस्तुस्थिती, जगातील लोकप्रवृत्ती, या विरुध्द आहेत.  साम्राज्यांतर्गत परंतु बव्हंशी स्वतंत्र राज्यपध्दती असलेल्या 'डोमीनिअन' वर्गातील देशांतून होत असलेली राष्ट्रीय भावनेची वाढ, आणि साम्राज्यातील वेगवेगळ्या अंकित स्वरूपाच्या वसाहती देशांतून बळावत चाललेला साम्राज्याबाहेर निघण्याची प्रवृत्ती, हीही त्याविरूध्दच आहेत.  जुना पाया तोच ठेवून त्यावर नवी व्यवस्था उभारू पाहणे, जे कोणे एकेकाळी होते पण आज नाही, ते जमेस धरून त्या हिशेबी विचार चालवणे, अद्यापही साम्राज्याचे आणि जगभर सगळीकडे व्यापारात आपला सक्तासुभा राखण्याचे, स्वप्न मनात घोळून तोंडाने तीच भाषा बोलत राहणे, इतर राष्ट्रांपेक्षाही विशेषत: ब्रिटनला असमंजसपणाचे व अदूरदर्शित्वाचे द्योतक आहे.  कारण राजकीय, औद्योगिक व आर्थिक क्षेत्रांत एक बलाढ्य सत्ताधारी राष्ट्र ही पदवी ज्यामुळे ब्रिटनला प्राप्त झाली होती ते सारे नाहीसे झाले आहे.  पण धीरवृत्ती, राष्ट्रकार्याचा भार सगळ्यांनी मिळून एकाविचाराने वाहण्याचा निश्चय, विज्ञानशास्त्रात चालणारी कुशाग्र बुध्दी, संघटनाचातुर्य, परिस्थितीशी जुळते घेण्याची मनाची तयारी, असे नाव घेण्याजोगे अनेक उज्ज्वल गुण ब्रिटिश लोकांत पूर्वी होते व आजही आहेत.  त्यांच्या अंगी असलेले इतर अनेक गुण व हे उज्ज्वल सद्‍गुण असे आहेत की, त्यांच्याच बळावर राष्ट्राला थोरवी प्राप्त होते, राष्ट्रावर ओढवलेल्या आपत्तीतून, संकटप्रसंगी यात गुणांच्या बळावर राष्ट्राचा विजय होतो, आणि म्हणून त्यांनी आपली जुनी अर्थव्यवहार पध्दती सोडून नवी, अधिक समतोल अशी अर्थव्यवस्था स्वीकारली तर आज त्यांच्या राष्ट्रापुढे असलेल्या अगदी निकडीच्या, जीवनमरणाच्या प्रश्नांना तोंड देणे त्यांना शक्य होईल पण त्यांनी पूर्वीप्रमाणेच आताही साम्राज्य कसेतरी बांधून घेऊन त्याच्या बळावर आपली पूर्वीचीच वाट धरण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांना त्यांच्यावर आलेल्या प्रसंगातून निभावणे कठीण दिसते.

अर्थात, रशिया व अमेरिका यांचे जे काय धोरण राहिले त्यावर, आणि ब्रिटनशी व एकमेकांशी त्यांचे कितपत जुळते किंवा बिनसते त्यावर पुढचे सारे अवलंबून आहे.  जगात शांतता नांदावी, सर्व राष्ट्रांनी सहकार्याचे चालावे एवढ्याकरिता या 'श्रेष्ठत्रयी'ने एकविचाराने चालणे अवश्य आहे अशी भाषा जिकडेतिकडे मोठ्यामोठ्याने बोलली जाते खरी, पण हे महायुध्द चाललेले असतानादेखील, एवढ्यातच, प्रत्येक पावलागणिक मतभेद दिसत आहेत, त्यांच्या एकविचाराला तडे गेलेले दिसत आहेत.  भविष्यकाळी काय व्हायचे ते होवो, पण आज असे स्पष्ट दिसते आहे की, युध्दोत्तर कालात अमेरिकेची अर्थव्यवहारपध्दती आपल्या स्वत:च्या सत्तेचा विस्तार झपाट्याने व्हावा अशा धोरणाची असणार, आणि परिणामी त्यामुळे भडका उडण्याचा संभव फार राहणार.  एकूण अखेर काही एका नव्याच प्रकारची साम्राज्यशाही अस्तित्वात येणार की काय? तसे झाले तर ही अखेर मोठी शोकपर्यवसायी होणार, कारण आज अमेरिकेने भविष्यकाळाकरिता इतरांना मार्ग दाखवून आपले उदाहरण घालून द्यायचे मनात आणले तर तसे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी आहे आणि त्यांना तसे करण्याची संधीही मिळाली आहे.

सोव्हिएट युनियनचे भावी धोरण काय आहे ते एक पडद्याआडचे गूढच आहे, पण त्याचे जे काय ओझरते दर्शन अधूनमधून घडते ते मोठे उद्‍बोधक आहे.  त्या धोरणाचा रोख असा दिसतो की, आपल्या राज्याच्या सीमेवर आसपास शक्य तितके मित्रदेश आणि आपल्यावर थोडेफार अवलंबून राहणारे किंवा संपूर्ण आपले आश्रित असलेले देश करून ठेवावे.  काहीएक जागतिक संघटना स्थापावी म्हणून इतर सत्ताधारी राष्ट्रांबरोबर रशियाही सहकार्य करते, पण त्यांचा विशेष भरवसा आपले स्वत:चे सामर्थ्य पक्क्या आधारावर हळूहळू वाढवीत राहण्यावर आहे.  अर्थातच इतर राष्ट्रेही जो तो आपल्यापरीने तेच करतो आहे.  पण पुढे जागतिक सहकार्य करून दाखवायचे असले तर त्या कार्याला ही नांदी काही मोठी आशादायक वाटत नाही.  आपल्या निर्गत मालाला गिर्‍हाईक म्हणून व्यापारपेठा गाठून ठेवण्याच्या कामात अमेरिका व ब्रिटन यांच्यामध्ये जी चुरस आहे तीच रशिया व इतर देशांमध्ये नाही, पण त्यांचे मतभेद त्यापेक्षाही खेलवरचे आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या दृष्टिकोणामधील अंतर फारच मोठे आहे, आणि या युध्दाच्या कामी एकविचाराने झटूनही त्यांचे आपसातले संशय, एकमेकांची भीती कमी झालेली नाही.  हे मतभेद असेच वाढत गेले तर रशिया व त्यांच्या गटातील राष्ट्रे यांच्याविरूध्द अमेरिका व ब्रिटन यांची प्रवृत्ती एकमेकांना अधिक जवळचे होऊन एकमेकांचा आधार घेण्याकडे राहील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel